मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

लाखो मातांचे प्राण वाचवणारी ती 'तलवार': डेटॉलच्या जन्माची रंजक गोष्ट

3 मिनिट वाचन

१९३० च्या दशकात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या संसर्गावर मात करण्यासाठी जन्मलेल्या डेटॉल अँटीसेप्टिक द्रवाची रंजक कहाणी.

शेअर करा:
लाखो मातांचे प्राण वाचवणारी ती 'तलवार': डेटॉलच्या जन्माची रंजक गोष्ट

लाखो मातांचे प्राण वाचवणारी ती 'तलवार': डेटॉलच्या जन्माची रंजक गोष्ट-त्या एका विशिष्ट वासाने आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या मनात 'स्वच्छता आणि सुरक्षा' या दोन शब्दांची पक्की गाठ बांधली आहे.

१९३० च्या दशकात लंडनच्या प्रसूती कक्षात जाणाऱ्या मातांपैकी जवळपास ५० टक्के महिलांचा मृत्यू केवळ 'सेप्सिस' नावाच्या रक्ताच्या विषबाधेमुळे होत असे. दवाखान्यात बाळंतपणासाठी जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत पाऊल ठेवण्यासारखं होतं. आज आपण ज्याला एक साधं 'अँटीसेप्टिक' म्हणून ओळखतो, त्या एका द्रवाने ही मृत्यूची आकडेवारी निम्म्यावर आणली होती.('सेप्सिस'किती धोकादायक असतं हे समजून घायचंअसेल तर स्मिता पाटील यांचा मृत्यू आठवा.)

त्या काळी जखमा स्वच्छ करण्यासाठी जे पदार्थ वापरले जायचे, ते जंतूंना मारण्यासोबतच माणसाच्या त्वचेलाही जाळून टाकायचे. ते इतके जहाल असायचे की जखम बरी होण्याऐवजी अधिकच चिघळायची. अशा एका वैद्यकीय आणीबाणीच्या काळात डॉ. विल्यम कोलब्रूक रेनॉल्ड्स नावाचा एक बॅक्टेरियोलॉजिस्ट प्रयोगशाळेत काहीतरी वेगळं शोधत होता. त्याला असं काहीतरी हवं होतं जे जंतूंवर तर वार करेल, पण मानवी त्वचेसाठी मात्र कोमल असेल.

१९३३ मध्ये या संशोधनातून जन्म झाला एका सोनेरी रंगाच्या द्रवाचा, ज्याला आपण आज 'डेटॉल' म्हणून ओळखतो. लंडनच्या 'क्वीन शार्लोट्स हॉस्पिटल'मध्ये जेव्हा याचे पहिले क्लिनिकल ट्रायल्स झाले, तेव्हा एक चमत्कारच घडला. बाळंतपणाच्या साहित्यासाठी डेटॉलचा वापर सुरू केल्यावर 'प्युर्पेरल सेप्सिस'मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण एका झटक्यात ५० टक्क्यांनी कमी झाले. एका बाटलीने हजारो मातांना आपल्या बाळाचं तोंड पाहण्यासाठी जिवंत ठेवलं होतं.

डेटॉल सुरुवातीला फक्त डॉक्टरांच्या वापरासाठी होतं. पण त्याची उपयुक्तता इतकी वाढली की, दवाखान्यातून ते थेट लोकांच्या घराघरात पोहोचलं. १९३५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि १९३६ मध्ये हे भारतात दाखल झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर ब्रिटीश सरकारने याला 'अत्यावश्यक वस्तू' म्हणून घोषित केलं होतं. रणांगणावर जखमी सैनिकांसाठी हे एक वरदान ठरलं.

तुम्ही कधी डेटॉलच्या बाटलीवरची ती 'तलवार' नीट पाहिली आहे का? ती तलवार केवळ एक लोगो नाही. ती जंतूंचा संहार करणाऱ्या शक्तीचं प्रतीक आहे. डेटॉल पाण्यात टाकल्यावर त्याचा रंग दुधाळ पांढरा होतो, ही प्रक्रिया आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असते. त्या विशिष्ट वासाने आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या मनात 'स्वच्छता आणि सुरक्षा' या दोन शब्दांची पक्की गाठ बांधली आहे.

बघा काय होतं, काळ बदलला तरी या ब्रँडची गरज संपली नाही. अगदी गेल्या आठवड्यातलीच गोष्ट घ्या (जून २०२६). रेकिट (Reckitt) कंपनीने भारतात एक मोठी घोषणा केली आहे. डेटॉलच्या सर्व लिक्विड बाटल्या आता १०० टक्के रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवल्या जाणार आहेत. पर्यावरणाचे रक्षण करतानाच आरोग्याची सुरक्षा जपण्याचा हा त्यांचा नवीन टप्पा आहे. तसेच, १ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, आशियात पसरणाऱ्या नवीन फ्लूच्या विषाणूंवरही डेटॉलचे नवीन फॉर्म्युला प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

ज्या द्रवाने १९३३ मध्ये मातांचे प्राण वाचवले, तोच द्रव आजही आपल्या मुलाच्या खरचटलेल्या गुडघ्यावर फुंकर घालताना आईच्या हातात असतो. रेनॉल्ड्स यांनी बनवलेली ती तलवार आजही सूक्ष्म जंतूंशी तितक्याच जोमाने लढते आहे.जगातील सर्वात शक्तिशाली औषधं कदाचित लॅबमध्ये बनत असतील, पण विश्वासाचं सर्वात मोठं रसायन हे केवळ सातत्य आणि सुरक्षिततेच्या जोरावरच तयार होतं.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

८२ वर्षांच्या आजीच्या पोटातला 'दगड' एक लिटर कोका-कोलाचा एनिमा देऊन फोडण्याचा अजब प्रयोग!
आरोग्य

८२ वर्षांच्या आजीच्या पोटातला 'दगड' एक लिटर कोका-कोलाचा एनिमा देऊन फोडण्याचा अजब प्रयोग!

८२ वर्षांच्या महिलेच्या पोटातील कडक झालेली विष्ठा फोडण्यासाठी डॉक्टरांनी कोका-कोलाच्या एनिमाचा अनोखा आणि यशस्वी प्रयोग केला.

३० जुलै, २०२६

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?
आरोग्य

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?

वजन कमी होण्याआधीच रक्तातील साखर कशी नियंत्रणात येते? जाणून घ्या रू-एन-वाय गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेमागील हार्मोनल विज्ञान.

२४ सप्टेंबर, २०२६

आंतरराष्ट्रीय योग दिन: संयुक्त राष्ट्रांच्या ठरावापासून जागतिक चळवळीपर्यंत प्रवास
लाइफस्टाइल

आंतरराष्ट्रीय योग दिन: संयुक्त राष्ट्रांच्या ठरावापासून जागतिक चळवळीपर्यंत प्रवास

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली आणि भारताचा हा वारसा जागतिक स्तरावर कसा पोहोचला?

२१ जून, २०२६

फळांचा 'गोड' धोका: जांभूळ राजा की आंबा? आरोग्याचा नवा हिशोब!
आरोग्य

फळांचा 'गोड' धोका: जांभूळ राजा की आंबा? आरोग्याचा नवा हिशोब!

फळे आरोग्यासाठी उत्तम असली तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर वेगाने वाढवणारी कोणती फळे आहेत, याचे वैज्ञानिक विश्लेषण.

२८ जुलै, २०२६