computer

एकच इनिंग असलेलं ब्रिटीश राजकारण

कसोटी क्रिकेट मध्ये  दोन इनिंग्स असतात. एकात जमलं नाही तर फलंदाजाला दुसरी संधी असते. अलीकडच्या ब्रिटनच्या राजकारणात मात्र असं दिसतं की पंतप्रधानपद हे एकच इंनिंगपुरतं असतं. एकदा बाद झाल्यावर पुन्हा संधी नाही असा एक अलिखित नियम असावा असं जाणवतं. यापूर्वी पंतप्रधानपद सोडल्यानंतर दुसऱ्या व्यक्तिच्या मंत्रिमंडळात काम करणारे नेते गेल्या शतकात आणि त्याआधीही झाले, पण गेल्या ३०-४० वर्षांमध्ये पंतप्रधानपदा बरोबर राजकारणाचा ही निरोप घेण्याचा प्रघात पडलेला दिसतो. आज हयात असलेल्या ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांच्या जीवनाकडे थोडा दृष्टिक्षेप टाकून या नवीन 'करियर चॉइसेस' चा आपण मागोवा घेऊ या. कदाचित पुढचा पंतप्रधान कोण असेल आणि ते कशा प्रकारे ठरेल याचा जास्त चांगला कयास आपल्याला त्यावरून बांधता येईल.

 

सर जॉन मेजर हे १९९२ ते १९९७ या कालावधीत पंतप्रधान होते. १९९७ सालची निवडणूक हरल्यानंतर काही आठवड्यातच त्यांनी पक्षनेतेपद सोडलं आणि २००१ मध्ये राजकारणच सोडलं. त्यानंतर त्यांनी स्विस आणि कुवेत मधील काही बँकांचा सल्लागार, अमेरिकेतील एका मोठ्या फंडचा आणि २-३ कंपन्यांचा सल्लागार म्हणूनही काम केलं. पंतप्रधानपदापेक्षा या पदांमधली कमाई कितीतरी जास्त असणार यात काही शंकाच नाही. संध्याकाळच्या एका भाषणाचे २५००० पौंड म्हणजे जवळपास २५ लाख रुपये असा त्यांचा 'रन रेट' आहे. अर्थातच पंतप्रधानपदी असताना मिळालेला अनुभव आणि कॉन्टॅक्टस यांचा याकामी भरपूर उपयोग झाला असणारच. याशिवाय त्यांनी क्रिकेटवर पुस्तक लिहिलं, आत्मचरित्र लिहिलं, आणि चॅरिटी संस्थांमध्ये काम  केलं.  

 

नंतरची १० वर्षे २००७ पर्यंत टोनी ब्लेअर हे पंतप्रधान होते.  त्यांनीही पंतप्रधानपदाबरोबर राजकारणही सोडलं. त्यांनतर जे पी मॉर्गन चेस बँक, झुरीक financial या कंपन्यांत लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या (कंत्राटं म्हणा हवं तर) त्यांच्याकडे चालून आल्या. त्यांच्या एका भाषणाचा भाव जगात सर्वात जास्त म्हणजे कधी कधीअडीच लाख पौंड म्हणजेच अडीच कोटी रुपये होता असं म्हणतात. अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष बुश यांच्या सहमतीने त्यांना मध्यपूर्वेतील युनोचा राजदूत हे पदही मिळालं होतं जे काम त्यांनी २०१५ पर्यंत केलं. त्यांची एकूण संपत्ती १० कोटी पौंडांच्या वर (१००० कोटी रुपये) आहे असं मानलं जातं.  सर्वसामान्यपणे ब्रिटिश  राजकारणात देवाधर्माचा फारसा उल्लेख नसतो (अमेरिकेत बक्कळ असतो) पण टोनी ब्लेअर मात्र वैयक्तिक जीवनात बरेच धार्मिक आहेत. राजकारण सोडल्यानंतर त्यांनी अँग्लिकन पंथ सोडून कॅथॉलिक पंथ रीतसर पणे स्वीकारला कारण त्यांची पत्नी कॅथॉलिक आहे. पंतप्रधानपदी असताना हे करणं कदाचित ब्रिटिश जनतेला आवडलं नसतं!

 

यानंतर २०१० पर्यंत गॉर्डन ब्राउन हे पंतप्रधान होते. २०१० सालची निवडणूक हरल्यानंतर यांनी बरेच दिवस राजीनामा द्यायची टाळाटाळ केली, युती सरकार बनवायचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढची पाच वर्षं त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काढली पण त्यानंतर मात्र फारसं देशांतर्गत राजकारण केलं नाही. मात्र जागतिक शिक्षणाचा युनोचा राजदूत, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा सल्लागार अशी 'बिना मोबदल्याची' पदं भूषविली. यांच्या मिळकतीबद्दल फारसं कळत नाही पण त्यांनाही भाषणाबद्दल भरगोस बिदागी मिळते असं एक दोनदा वाचल्याचं आठवतं. पिमको या राष्ट्रीय कर्जरोख्यांत प्रामुख्याने गुंतवणूक करणाऱ्या सर्वात मोठ्या फंडच सल्लागारपद यांच्याकडे २०१५ साली राजकारण सोडतानाच चालून आलं होतं.

 

यानंतरचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन हे स्कॉटलंडमधील कॅमेरॉन या clan किंवा परिवारापैकी, उच्च कुळात जन्मलेल्यांपैकी एक. ब्रिटनने युरोपिअन युनियनशी फारकत घेण्याचं ठरवल्यानंतर यांनी राजीनामा दिला आणि त्याचवेळी राजकारणही सोडलं. यानंतर त्यांनी बऱ्याच खाजगी कंपन्यांकरता काम केलं. यातूनच २०२०-२१ साली यांचं नाव एका घोटाळ्यात गाजलं. यांच्या नेतेपदाच्या काळात लेक्स ग्रीनसिल नावाचा एक असामी सरकारच्या तब्बल  ११ खात्यांचा ' विना मोबदला' सल्लागार होता. २०१६ नंतर ग्रीनसिल कॅपिटल या त्याच्या कंपनीत कॅमेरॉन साहेब सल्लागार होते. २०२० साली ही कंपनी कोसळण्याच्या बेतात असताना कॅमेरॉन यांनी सरकारच्या मागे तगादा लावला की या कंपनीला वाचवा. त्यावेळचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना हा हल्ला झेलावा लागलं पण त्यांनी निक्षून अशी मदत करण्याला नकार दिला.

 

२०१६ ते २०१९ या कालावधीत तेरीसा मे यांनी पंतप्रधानपद सांभाळलं. त्यांचे यजमान एका गुंतवणूक संस्थेत आहेत. त्या अजूनही संसदेच्या सदस्य आहेत आणि मागील बाकांवर बसून राजकारणात भाग घेतात.

यावरून आपल्या एक लक्षात येईल की २१ व्या शतकातील ब्रिटिश होतकरू राजकारण्यांचा कल पंतप्रधानपदाचा विचार सर्वोच्च स्थान असा करण्याऐवजी जास्त पैसे मिळवण्याच्या प्रवासातली एक पायरी असा करण्याकडे आहे. तसे पैसे मिळण्याची इतरत्र व्यवस्था झाली तर यातील कित्येक होतकरू मंडळी आनंदाने त्या दुसऱ्या व्यवस्थेकडे वळतील अशीच शक्यता जास्त आहे. याचा सध्या चालू असलेल्या हुजूर पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीशी संबंध आहे का? तो कशा प्रकारचा आहे? त्याचा परिणाम काय होऊ शकतो? या प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला बऱ्याच घटना जास्त चांगल्या समजतील , आणि काही कशा घडणार आहेत याचा अंदाज पण करता येईल.  

लेखक : डॉ.प्रकाश परांजपे

सबस्क्राईब करा

* indicates required