AK-47ला तिचं नाव कसं मिळालं? वाचा जगात सर्वाधिक जीव घेणाऱ्या रायफलची गोष्ट-!!
मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाब आठवतोय? त्याच्या हातात असलेली ती ऑटोमॅटिक रायफल? आठवत नसेल असं होणारच नाही.बोभाटा आज त्याच रायफलची जन्मकथा आज घेऊन आले आहे.शीतयुद्धाच्या काळातली ही गोष्ट आहे. सोवियत रशिया आणि अमेरिका हे त्या वेळचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. अजूनही आहेत म्हणा. अशाच एका अनपेक्षित हल्ल्यादरम्यान एक रशियन सैनिक एका तलावात जाऊन पडला. पडल्यावर त्याच्याकडची बंदूक सोडून तो तसाच पळून गेला. कॅम्पमध्ये गेल्यावर तिथल्या नोंदवहीत त्या रायफलची सर्व माहिती त्याने रजिस्टरमध्ये नोंद केली. वीस वर्षानंतर तो तलाव सुकल्यामुळे त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम करताना एक रायफल सापडली. सगळे रेकॉर्ड चेक केल्यानंतर ती बंदूक वीस वर्षांपूर्वी पळून गेलेल्या सैनिकाचीच होती हे लक्षात आले. आश्चर्याची बाब म्हणजे त्या रायफलीतून आहे त्या स्थितीत फायर केले असताना तेव्हा ती पूर्ण क्षमतेने फायर करत होती. वीस वर्षानंतर पाण्यात आणि जमिनीत गाडून राहील्यानंतरही व्यवस्थितपणे फायर करणाऱ्या त्या भन्नाट रायफलचे नाव होते AK-47!!
१९४० साली दुसऱ्या महायुद्धात रशियाचा मिखाईल क्लासिनिकोव्ह नावाचा एक सैनिक सैन्यात टँक कमांडर म्हणून कार्य करत होता. युद्धात खांद्याला गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचा खांदा निकामी झाल्यामुळे त्याला पुन्हा युद्धात सहभागी होता येणार नव्हतं. मग आपल्या देशाच्या सेवेसाठी त्याने घरीच वेगवेगळ्या बंदुंकांची मॉडेल्स बनवायला सुरुवात केली. १९४२ साली सबमशीनगन, १९४३ साली लाईट मशीनगन अशा रायफली त्याने बनवल्या. १९४४ साली एका बंदुकीच्या स्पर्धेत मात्र त्याला एस के एस-45 सिमनोव्ह नावाच्या बंदुकीमुळे हार पत्करावी लागली. या पराभवामुळे त्याने आपल्या पहिल्या सर्व बंदुकांमधल्या चुका शोधून १९४७ मध्ये एक हलक्या वजनाची रायफल बनवली आणि ती १९४९ साली सोवियत सेनेकडे चाचणीसाठी आली. सोवियत सैन्याने तिची क्षमता व उपयोग पाहून तिला लगेच मान्यता दिली व आपल्या सैन्यात त्या बंदुकीचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. या बंदुकीच्या नावात तिच्या जन्माचं रहस्यही दडलंय. AK -47 मध्ये A म्हणजे ऑटोमॅटिक, K म्हणजे ज्याने हे बंदूक बनवली तो मिखाईल क्लासिनिकोव्ह आणि १९४७ साली बनवली म्हणून 47!! अशी ही AK -47 सेवन आजच्या घडीला जगातील १२० देशांतल्या सैनिकांच्या खांद्यावर दिमाखात मिरवत आहे.
असं आणखी काय खास आहे या बंदुकीत?
AK-47 रायफल वजनाने हलकी आहे. तिचं वजन आहे फक्त ४.३ किलोग्रॅम! या रायफलच्या मॅगेझिनमध्ये तीस राऊंडस् बसतात. तिची मारक क्षमता 400 मीटर 'ऍक्युरेट रेंज'मध्ये आहे. ही रायफल सेमी ऑटोमेटेड, गॅस पिस्टन ऑपरेटेड आहे आणि ती सिंगल व बर्स्ट् राऊंड फायर करू शकते. म्हणजे एका वेळेला हवी तर एकच गोळी नाहीतर गोळ्यांचा वर्षाव असं दोन्ही ती करू शकते. एका सेकंदात १० ते १६ व एका मिनिटात ६०० हून अधिक गोळ्या ही बंदूक न थांबता शत्रूंवर फायर करू शकते. 7.62 mm च्या गोळीचा वापर यासाठी केला जातो. ही रायफल खोलण्यासाठी व जोडण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत ही बंदूक व्यवस्थित काम करते. आणि सुरवातीला सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा तर २० वर्षे पाण्याखाली राहूनही ती आहे तशीच काम करते.
हे सर्व पाहिलं तर AK-47 ची विश्वासार्हता व उपयुक्तता पाहिल्यावर या रायफलला तोड देईल अशी रायफल आजमितिला तरी कुठल्याही सैन्याने बनवलेली नाही. अमेरिकेसारखा बलाढ्य देश मात्र आपल्या सैन्यात AK-47चा वापर करत नाही. परंतु या रायफलीचे प्रशिक्षण मात्र अमेरिका आपल्या सैनिकांना देत असते कारण इतर सर्व देश AK-47 चा वापर प्रामुख्याने करतात. AK-47 ची अनेक कॉपी केलेली मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. आज घडीला दहा कोटी AK-47 रायफल्स सर्व देशांच्या सैनिकांकडे आहेत. तसेच जगात जेवढे अतिरेकी आहेत त्यातील बहुतांश अतिरेकी AK-47 रायफलचा वापर करतात. अलीकडेच भारतात पाच लाख AK-47 रायफल्स रशियाच्या मदतीने उत्तर प्रदेशातल्या अमेठीमध्ये बनवण्याचे धोरण सरकारने जाहीर केले आहे.
एकूणच सगळ्यात जास्त जीव घेणारी व कधीही तांत्रिकदृष्ट्या धोका न देणारी, सगळयात घातक, सैनिकांशी इमान राखणारी रायफल म्हणून AK-47 चा उल्लेख केला पाहिजे. मुंबईवर झालेला हल्ल्यात कसाब आणि इतर सर्व अतिरेक्यांनी देखील याच AK-47 रायफलीने निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. आणि हो ज्या मिखाईल क्लासिनिकोव्ह या रायफलीची निर्मिती केली त्याने आपल्या सोवियत या देशाकडून यासाठी एका रुपयाचाही मोबदला घेतला नव्हता
गेली ७५ वर्षे या बंदुकीमुळे अनेक युद्धं जिंकली गेली असतील,अनेक कारवाया यशस्वी झाल्या असतील सोबतच चुकीच्या हाती पडल्यानंतर झालेला रक्तपातही खरा आहे !
लेखकः आनंद जगताप.