मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

व्हॉट्सअ‍ॅपची कमान आता भारतीयाच्या हाती: कुणाल शाह यांची मोठी झेप!

3 मिनिट वाचन

मेटाने क्रेडमध्ये मोठी गुंतवणूक करत व्हॉट्सअ‍ॅपच्या जागतिक प्रमुखपदी भारतीय उद्योजक कुणाल शाह यांची नियुक्ती केल्याची घोषणा.

शेअर करा:
व्हॉट्सअ‍ॅपची कमान आता भारतीयाच्या हाती: कुणाल शाह यांची मोठी झेप!

२२ जून २०२६ हा दिवस जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय वर्चस्वाचा नवा अध्याय म्हणून नोंदवला जाईल. मेटा प्लॅटफॉर्म्सने आज अधिकृत घोषणा केली की, व्हॉट्सअ‍ॅपचे विद्यमान प्रमुख विल कॅथकार्ट आता निवृत्त होत असून, त्यांची जागा 'क्रेड'चे संस्थापक कुणाल शाह घेणार आहेत. ही केवळ एका पदाची बदली नाही, तर मेटाने क्रेडमध्ये तब्बल ९०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ८,५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४.५ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब केले आहे.

मार्क झुकरबर्गने आता व्हॉट्सअ‍ॅपच्या भविष्याची चावी एका भारतीय 'बिल्डर'च्या खिशात दिली आहे. "कुणालने क्रेडला भारतातील सर्वात महत्त्वाच्या टेक कंपन्यांपैकी एक बनवले आहे. त्यांच्याकडे जागतिक दृष्टिकोन आणि काहीतरी नवे घडवण्याची जिद्द आहे," अशा शब्दांत झुकरबर्गने कुणाल शाह यांचे स्वागत केले. अब्जावधी लोक आणि लाखो व्यवसायांसाठी व्हॉट्सअ‍ॅपला अधिक सक्षम बनवण्याची जबाबदारी आता एका मराठी मातीतल्या तरुणावर आहे.

(कुणाल शाह यांचा उल्लेख 'मराठी मातीतला तरुण'करण्याचे कारण असे की ते मुंबईच्या विल्सन कॉलेजचे आणि नंतर मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेजचे विद्यार्थी आहेत)

व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ मेसेजिंग अ‍ॅप उरलेले नाही. ते पेमेंट, ई-कॉमर्स आणि बिझनेस कम्युनिकेशनचे केंद्र बनू पाहत आहे. कुणाल शाह यांनी क्रेडच्या माध्यमातून भारतातील 'प्रीमियम' ग्राहकांचा जो डेटा आणि विश्वास कमावला आहे, त्याचा फायदा मेटाला जागतिक स्तरावर करून घ्यायचा आहे. यामागचं कारण म्हणजे, भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे ५० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत आणि इथली बाजारपेठ मेटासाठी सर्वात महत्त्वाची आहे.

कुणाल शाह यांचा प्रवास थक्क करणारा आहे. फ्रीचार्जपासून सुरू झालेला हा प्रवास आता व्हॉट्सअ‍ॅपच्या जागतिक नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. क्रेडमधील ८,५५० कोटींची ही गुंतवणूक भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी एक मोठा बूस्टर डोस ठरणार आहे. ४.५ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन हे सिद्ध करते की, भारतीय बुद्धिमत्तेला आता जागतिक स्तरावर तोड नाही.

विश्लेषकांच्या मते, कुणाल शाह यांची नियुक्ती ही व्हॉट्सअ‍ॅपच्या 'सुपर अ‍ॅप' बनण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. ज्याप्रमाणे चीनमध्ये 'वी-चॅट' चालते, त्याच धर्तीवर व्हॉट्सअ‍ॅपला आर्थिक व्यवहारांचे केंद्र बनवण्याचा मेटाचा मानस आहे. कुणाल शाह यांचा फिनटेक क्षेत्रातील अनुभव या प्रक्रियेला वेग देईल, यात शंका नाही.

आपल्या महाराष्ट्रात आणि देशात स्टार्टअप सुरू करणाऱ्या हजारो तरुणांसाठी कुणाल शाह हे आता केवळ एक उद्योजक उरलेले नाहीत, तर ते एक जागतिक आयकॉन बनले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरून सुरू झालेला हा विचार आता कॅलिफोर्नियाच्या बोर्डरूममध्ये निर्णय घेणार आहे. ही झेप केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीचे प्रतीक आहे.एका भारतीयाने जगाला जोडणाऱ्या सर्वात मोठ्या व्यासपीठाचे नेतृत्व करणे, ही बाब तंत्रज्ञानाच्या इतिहासात भारताचे वजन किती वाढले आहे हे अधोरेखित करते.

मार्क झुकरबर्ग आणि कुणाल शाह यांची ही युती जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेला कोणत्या वळणावर नेऊन ठेवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख