आपल्या प्रियजनांच्या शरीराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याची गुन्हेगारी का थांबत नाही ?
शरीराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याची गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही ! कसे नाव घेईल?
कारण गुन्हेगाराचे डोकेच बिघडलेले असते ना ! हा बिघाड नेमका कशात असतो याचा शोध मेंदू वैज्ञानिकांनी अथकपणे परिश्रमपूर्वक घेतला आहे.
हे गुन्हे करणारी ही मंडळी "लिटरली मॅड" असतात. त्यांना भ्रम आणि भास होत असतात. यांचे विचारभ्रम तर पराकोटीचे असतात.त्यामुळे त्यांच्या विवेकी क्षमता संपून जातात. आणि मेंदूत या क्षमताच नसल्याने त्यांचा सहज, नैसर्गिक वागण्यावरील कंट्रोल हा नाहीसा होतो आणि विचार विकृती उद्भवते.
या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती घडत असेल तर त्यांच्या मनात ममत्व, आपुलकी नष्ट झालेली असते.
अशा प्रकारचे क्रूर गुन्हे केलेल्या खुन्यांचे मेंदू तपासण्यात आले आहेत.यांना सायकोपॅथ म्हणतात.पी.ई.टी आणि एमआरआय या मेंदूचे चित्र घेणाऱ्या यंत्रांमार्फत जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा जसे संस्कार कारणीभूत ठरतात तसेच आणि तेवढेच मेंदूचे रोगटपण देखील कारणीभूत ठरते असे आढळून आले आहे!
जवळपास ४१ खुन्यांवर संशोधन करण्यात आले तेव्हा असे आढळले की खुन्यांच्या मेंदूतील अनेक भागात ग्लुकोज किंवा साखरेचा अभाव आढळून आला.मेंदूचे इंजिन चालवणारे इंधन असते. साखर! थोडक्यात त्या भागात या इंधनाचा अभाव निर्माण झाल्यामुळे ते नीट काम करू शकत नाहीत असे दिसून आलेय.
यापैकी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कपाळाच्या मागील मेंदूचा जो फ्रंटल काॅर्टेक्स नावाचा भाग आहे तेथे मोठा बिघाड दिसून आला. ज्याला 'रिड्युसड ग्लुकोज मेटाबोलिझम इन प्री फ्रंटल काॅर्टेक्स' असे म्हणतात. जेव्हा असे घडते तेव्हा अशा व्यक्ती या सणकी माथ्याच्या बनतात. त्यांचे वर्तन अतिशय बालिश पद्धतीचे राहते. रागीटपणा व आक्रमकपणा हा पराकोटीचा बनतो. आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची त्यांची क्षमता नाहीशी होते.
असेही आढळून आले की सामान्यपणे चांगल्या कुटुंबात जेथे फारसे वादविवाद नाहीत तेथे लहानाचे मोठे झालेल्या अनेक व्यक्ती पुढे गुन्हेगारी क्षेत्रात शिरल्या आणि अट्टल क्रूर गुन्हेगार बनल्या. त्याचे कारण मेंदूतील असलेला हा बिघाड होय. याला 'प्रिफ्रंटल डेफिसिट' म्हणतात.उंदरांमध्ये या संदर्भात एक प्रयोग करण्यात आलेला होता त्या प्रयोगाच्या अभ्यासात असे दिसून आले की ज्या उंदरांना जन्मल्यानंतर त्यांच्या मातेने कमी प्रमाणात व कमी काळासाठी कुरवाळले किंवा चाटले त्या उंदरांच्या मेंदूतील साखरेचे कार्य नीट चालविणाऱ्या जीन्स किंवा जनुकांना, चेतना व प्रेरणा मिळाली नाही.साधारणपणे हे जीन्स हिप्पोकॅम्पस नावाच्या मेंदूच्या भागात आढळतात. त्यामुळे घडते असे की ही उंदरे पुढे आयुष्यात साधा ताण देखील सहन करू शकत नाहीत.ती आक्रमक बनतात.
ज्यांनी पूर्वी कधी एकही गुन्हा केला नाही अशा नवीन गुन्हेगारांवर देखील संशोधन करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूतील उजव्या आणि डाव्या भागातील ज्या जोडण्या असतात त्या जोडण्यांमध्ये बदल झालेले आढळून आलेले आहेत.अशा प्रकारच्या गुन्हेगारांना समाज विघातक व्यक्तिमत्व विकार जडलेला असतो.ज्याला इंग्रजीमध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात त्यांच्या मेंदूतील कपाळामागील भागात जवळपास ११% घनतेची घट झालेली असते. यातून सद्सद्विवेक बुद्धीला सोडचिठ्ठी दिली जाते.कोणत्याही परिस्थितीत एखाद्या घटनेला प्रतिक्रिया देताना त्यांच्या जाणीवा या मंदावलेल्या असतात आणि भीती ही उरलेली नसते.
या जनुकीय दोषातून घडते असे की या जनुकांमधून जे रसायन निर्माण होते त्याच्यातही बिघाड होतो. या रसायनाचे नाव आहे मोनो अमाईन ऑक्सिडेज.या बिघाडाची किंमत मोठे होत असताना वयात आल्यानंतर मुलांना चुकवावी लागते.कारण जर त्यांना कोणी मारहाण केली किंवा त्यांच्यावर अत्याचार केले तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चटकन वळतात आणि प्रसंगी खून करतात. साधारणपणे सात ते बारा वर्षाच्या मुलांच्या वर्तनात हा वाईट बदल मोठ्या प्रमाणात घडतो.
ताणतणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे हार्मोन किंवा संप्रेरक जे असते त्याला काॅर्टिसाॅल म्हणतात.जेव्हा हे संप्रेरक कमी निर्माण होऊ लागते तेव्हा ते कुठलाही ताण घेत नाही. आणि.. ते बिनधास्त बनतात. 'गोली मार भेजेमे' असे सहजपणे करून मोकळे होतात!जेव्हा बिघडलेल्या मेंदूला बिघडलेले वातावरण खतपाणी घालते तेव्हा क्रूर गुन्हेगार निर्माण होतात.म्हणूनच केवळ घराचेच नव्हे तर देशाचे वातावरण देखील बिघडलेले नसेल तर अशा घटना घडणार नाहीत. अन्यथा.....
- डाॅ. प्रदीप पाटील
लेखकाची ओळख :डॉ.प्रदीप पाटील मानसशास्त्रज्ञ आहेत( Psychotherapist-Counselor at Cognitive Behavioral Therapist)