सूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ?
सूर्य पृथ्वीसाठी किती महत्वाचा आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. पृथ्वीवरचे जीवन हे सूर्यामुळेच अस्तित्वात आहे. जर हा सूर्यच अदृश्य झाला तर काय होईल ? आपण किती काळ जगू शकू ? महाप्रलय येईल का?... आणि आणखी काय काय होईल ?
सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत ८ मिनिटांत पोहोचतात. म्हणजे जर सूर्य अचानक अदृश्य झाला, तरी त्याचा प्रकाश संपूर्णपणे नाहीसा होण्यासाठी ८ मिनिटे लागतील. सूर्य आणि पृथ्वीला बांधून ठेवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुत्वाकर्षण. सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण सूर्य नसेल, तर गुरुत्वाकर्षण किती काळ टिकेल ? आईनस्टाईनच्या एका सिद्धांताप्रमाणे सूर्यकिरण आणि गुरुत्वाकर्षण एकाच गतीने प्रवास करतात. त्यामुळे सूर्य अदृश्य झाल्यानंतरही गुरुत्वाकर्षणचा प्रभाव संपायला ८ मिनिटे लागतील.
म्हणजे सूर्य नसला तरी आपण निदान ८ मिनिटे तरी नेहमी सारखंच नीट जगू शकू.
सूर्याचा प्रकाश ८ मिनिटानंतर गेल्यावर रात्रीचा माहौल तयार होईल, आणि त्यानंतर कधीच सकाळ होणार नाही. अंधार झाला तरी पृथ्वीवर असलेल्या विजेच्या साठ्यावर उजेड राहील. पण हे फक्त जोपर्यंत मुबलक वीज साठा असेल किंवा जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी वीज असेल, तोपर्यंतच शक्य आहे. सूर्यप्रकाश नसल्याने प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) बंद पडेल आणि याचा परिणाम म्हणजे पृथ्वीवरील झाडेझुडपे नष्ट होण्याच्या मार्गावर लागतील. यातूनही काही मोठी झाडे जिवंत राहतील, पण फार काळ ती जगू शकणार नाहीत.
माणसाचं काय ? माणूस कधीपर्यंत जगेल ?
एका आठवड्याच्या आत पृथ्वीचं तापमान शून्य डिग्री फॅरेनहाइटपर्यंत कमी होईल. त्यामुळे समुद्र, नद्या गोठ्ण्यास सुरुवात होईल. हवामानाचे अर्थातच बारा वाजतील. पण पृथ्वीला पूर्णपणे फ्रीज म्हणजे गोठण्यासाठी आणखी लाखो वर्ष लागतील. तापमान कमी आणि अन्न साखळी विस्कळीत झाल्याने पृथ्वीवरील जीवन थोड्याच दिवसांमध्ये साफ होण्यास सुरुवात होईल. मानवाला जिवंत राहण्यासाठी उष्णतेची गरज असेल. ती मानवाला आण्विक उर्जेतून मिळवावी लागेल. पण यासाठी धडपड करत असताना बरीच मोठी लोकसंख्या आधीच मेलेली असेल...
...पण, पण, मंडळी काळजी करू नका. असं कधी होणार नाही आणि होऊ शकणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाची मजा लुटा !!
आणखी वाचा :
जगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल ? पहा हा व्हिडीओ !!