मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

३३ महिन्यांचा पगार परत करणारे शिक्षक! कारण काय आहे पण?

3 मिनिट वाचन
शेअर करा:
३३ महिन्यांचा पगार परत करणारे शिक्षक! कारण काय आहे पण?

कोरोनामुळे विस्कळीत झालेले सर्वांचे आयुष्य आता कुठे योग्य मार्गावर येऊ लागले आहे. पण गेल्या दोन वर्षांचे प्रतिबिंब पुढे कित्येक वर्ष उमटत राहणार आहेच. दोन वर्ष अनेकांना घरी बसून अभ्यास आणि काम करावे लागले. याचे फायदे आणि तोटे दोन्हीही झाले. 'उठो अनारकली सेमिनार खत्म हो गया है' सारख्या मीम्सना शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही दाद दिली आणि काही लोक त्यातूनही अत्यंत मान लावून शिकले.

या ऑनलाईन शिकण्या-शिकवण्याच्या प्रकरणात सध्या बिहारमधील एक प्राध्यापक मात्र देशभर चर्चेत आले आहेत. मुजफ्फरपूर येथील नितीश्वर कॉलेजला डॉ. ललन कुमार हे प्राध्यापक आहेत. त्यांनी चक्क कोरोना काळात कॉलेज बंद असताना त्यांना मिळालेला पगार परत केला आहे. ही रक्कम तब्बल २३ लाख आहे. जिथे कोणी एक रुपया सोडत नाही तिथे इतका मोठा त्याग केल्यावर चर्चा होणे साहजिक आहे.

 

३३ महिन्यांचा पगार परत करणारे शिक्षक! कारण काय आहे पण? – चित्र 1

डॉ. ललन कुमार यांनी आपला ३३ महिन्यांचा पगार परत करताना, "या काळात आपल्याला समाधानकारक शिक्षण देता आले नाही, ऑनलाईन लेक्चरवेळी देखील विद्यार्थी उपस्थित नसत." असे म्हटले आहे.

डॉ. ललन कुमार यांनी शिक्षण देखील तगडे घेतले आहे. जेएनयूमधून मास्टर्स, दिल्ली विद्यापीठात पीएचडी आणि एमफिल पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्याला चांगली रँक मिळूनही नितीश्वर कॉलेज देण्यात आले आणि तिथे शिकविण्यासाठी विशेष वाव नाही असा आरोप केला आहे. त्यांचे गाऱ्हाणे हे आपल्याला जिथे चांगले शिक्षण देता येईल असे कॉलेज मिळावे हा आहे. यासाठी त्यांनी पदव्युत्तर वर्गांना शिकवता यावे असा अर्ज देखील केला आहे.

आपण जर ५ वर्ष असाच विनाकामाचा पगार घेत राहिलो तर आपल्या अकॅडमिक्सचे ते मरण असेल असेही त्यांनी नमूद केले आहे. एकीकडे जिथे काम कमी तिथे पोस्टिंग मिळावी म्हणून प्रयत्न होण्याचे उदाहरणे आपण शेकड्याने बघितले आहेत. पण इथे मात्र काम कमी आहे म्हणून मला पगारच नको म्हणणारे ललन कुमार उठून दिसत आहेत.

३३ महिन्यांचा पगार परत करणारे शिक्षक! कारण काय आहे पण? – चित्र 2

ललन कुमार उलट चांगले शिकवता यावे यासाठी ते सातत्याने बदलीचा अर्ज करत आहेत. निदान यानिमित्ताने तरी त्यांचे गाऱ्हाणे ऐकले जाऊन त्यांना शिकवण्यासाठी चांगले कॉलेज मिळू शकते अशी अपेक्षा करता येईल. डॉ कुमार यांनी उचललेले पाऊल देशभर त्यांना कौतुक मिळवून देत आहे.

अनेक लोकांनी या घटनेबद्दल बोलताना असे शिक्षक समाजात वाढले तर समाजाचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उदय पाटील

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख