कॉकटेल सोडा, आता लग्नात पाहुण्यांना चढवलं जातंय सलाईन; 'IV ड्रिप'च्या एका पॅकेजसाठी मोजावे लागतायत दीड लाख रुपये!
एका हाय-प्रोफाइल लग्नाच्या बजेटमध्ये आता ५० हजार ते १.५ लाख रुपये फक्त 'IV ड्रिप' लाउंजसाठी राखून ठेवले जात आहेत. ही आकडेवारी कोणत्याही हॉस्पिटलच्या बिलाची नाही, तर चक्क लग्नातील पाहुण्यांच्या 'वेलनेस' पाहुणचाराची आहे. 'बिग फॅट इंडियन वेडिंग'मध्ये आता कॉकटेल बारच्या शेजारीच 'IV ड्रिप बार' दिसू लागले आहेत.
डेस्टिनेशन वेडिंगमध्ये रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या, नाचगाणी आणि मद्यपानामुळे येणारा थकवा घालवण्यासाठी हा नवा फंडा शोधला गेलाय. पाहुण्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी थेट नसेतून जीवनसत्त्वे आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरवले जात आहेत. हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर आणि लक्झरी वेडिंग सर्कलमध्ये तुफान चर्चेत आहे.
याला 'IV ड्रिप वेडिंग लाउंज' असं नाव देण्यात आलंय. पूर्वी लग्नात फक्त मॉकटेल्स किंवा ज्यूसचे काउंटर असायचे. आता स्विमिंग पूलच्या काठी खास 'वेलनेस लाउंज' उभारले जातात. तिथे प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी पाहुण्यांना सलाईनद्वारे व्हिटॅमिन्सचे डोस देतात.
या ड्रिपच्या मेनूमध्ये व्हिटॅमिन-बी कॉकटेलपासून ते 'हँगओव्हर क्युअर'पर्यंत अनेक पर्याय असतात. नवरीला लग्नाच्या दिवशी खास चमक हवी असेल, तर 'ग्लुटाथिओन' (Glutathione) ड्रिपचा वापर 'ब्रायडल ग्लो'साठी केला जातो. हे सगळं एखाद्या स्पा ट्रीटमेंटसारखं लग्नाच्या मांडवातच पार पडतं.
खर्चाचा आकडा ऐकला तर डोळे पांढरे होतील. एका व्यक्तीसाठी या ड्रिपची किंमत ३,५०० रुपयांपासून सुरू होऊन १२,००० रुपयांपर्यंत जाते. संपूर्ण लग्नासाठी जर असे पॅकेज घेतले, तर त्याची सुरुवात ४५ हजारांपासून होते आणि पाहुण्यांच्या संख्येनुसार ती दीड लाखांच्या पुढे जाते. श्रीमंत वर्गासाठी हा आता स्टेटस सिम्बॉल बनला आहे.
हा ट्रेंड जितका ग्लॅमरस दिसतो, तितकाच तो वादग्रस्तही आहे. डॉक्टर याबद्दल वारंवार धोक्याचा इशारा देत आहेत. आयव्ही थेरपी ही एक 'इन्व्हेसिव्ह' वैद्यकीय प्रक्रिया आहे. ती एखाद्या पार्टीतील करमणूक किंवा 'क्विक फिक्स' उपाय नाही.
थेट नसेतून औषधं सोडल्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. काही वेळा चुकीच्या डोसमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडू शकतं. सुई टोचलेल्या जागी सूज येणं किंवा गंभीर अॅलर्जी होण्याचे प्रकार घडू शकतात. तज्ज्ञांच्या मते, निरोगी माणसाला अशा ड्रिपची अजिबात गरज नसते.
तुम्ही तोंडावाटे घेतलेली जीवनसत्त्वे किंवा लिंबू सरबतही शरीराला तेवढीच ऊर्जा देऊ शकतं. जे पोषक घटक शरीर नैसर्गिकरित्या शोषू शकतं, त्यासाठी थेट रक्ताभिसरणात सुई खुपसणं हे अनाठायी आहे. शरीर जास्तीची जीवनसत्त्वे लघवीवाटे बाहेरच टाकून देतं, त्यामुळे हा फक्त महागडा दिखावा ठरतो.
तरीही ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी 'स्कल्प्टेड बाय कान' (Skulpted by Kan) सारख्या मोबाईल वेलनेस सेवा आता भारतात उपलब्ध आहेत. या सेवा थेट लग्नाच्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ड्रिपची सोय करतात. ही सेवा घेताना वैद्यकीय परवाना आणि सुरक्षिततेची खात्री करणं अनिवार्य आहे.
लग्नाचा आनंद हा आठवणींमध्ये असायला हवा, औषधांच्या बाटल्यांमध्ये नाही. ग्लॅमरच्या नावाखाली आरोग्याशी खेळ करणारा हा ट्रेंड भविष्यात काय वळण घेईल, हे सांगणं कठीण आहे. दिखाव्यासाठी स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवणं ही एक महागडी चूक ठरू शकते.






