अंधत्वावर मात करत प्रांजल पाटील यांची जिल्हाधिकारीपदी उत्तुंग भरारी
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/459484-pranjal.jpg?itok=I34jIiwI)
मुंबईशेजारच्या उल्हासनगरची रहिवासी असलेल्या प्रांजल पाटीलने यू. पी. एस. सी. च्या परिक्षेत ७७३वा क्रमांक मिळवला. सर्वसाधारणपणे अशा स्पर्धा परिक्षांमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी उमेदवार विशेष कोचिंग क्लासेसला पसंती देत असताना अशा कोणत्याही क्लासशिवाय हे उत्तुंग यश मिळवणार्या दृष्टीहीन प्रांजल पाटीलचं उदाहरण कौतुकास्पद आहे.
लहानपणीच एका अपघातामुळे प्रांजलची दृष्टी हळूहळू गेली पण ज्ञानलालसा मात्र उत्तरोत्तर वाढतच गेली. पदवी शिक्षणासाठी त्या उल्हासनगर ते मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या सेंट झेवियर्समध्ये दररोज ६० किलोमीटरचा प्रवास करून जात. लोकलने प्रवास करताना भल्याभल्यांची फे फे उडते. पण प्रांजलने हे ही निभावून नेले. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यालयातून एम. फिल. आणि पी. एच. डी. केली. सोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा त्या पहिल्या प्रयत्नात ७७३व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्या.
आता त्या देशातल्या पहिल्या अंध जिल्हाधिकारी बनणार आहेत. टीम बोभाटा तर्फे त्यांच्या उत्तुंग महत्वाकांक्षेला सलाम आणि त्यांच्या पुढील यशासाठी कोटी कोटी शुभेच्छा!!