मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

टाटांचा '५०१' साबण: स्वदेशी ब्रँडचा उदय आणि अस्ताची रंजक गोष्ट

3 मिनिट वाचन

टाटा ऑइल मिल्सचा '५०१' साबण कसा घराघरात पोहोचला आणि नंतर विदेशी कंपनीच्या ताब्यात गेला, या ब्रँड युद्धाचा रंजक इतिहास.

शेअर करा:
टाटांचा '५०१' साबण: स्वदेशी ब्रँडचा उदय आणि अस्ताची रंजक गोष्ट

माणसाची कमाई आणि कपडा - माणसाची ऐपत आणि कपडा - माणसाची इभ्रत आणि कपडा याची घट्ट सांगड कपडय़ाच्या शुभ्रतेशी जोडल्याने,‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’चे मूल्य वाढल्याने गेल्या शतकात अनेक साबणाचे ब्रँड आले आणि गेले.निरमाने लिव्हरची मक्तेदारी संपवली.मग ससा आला आणि पळालाही.Tideला बाजारात टिकून राहण्यासाठी मूळ फॉर्म्युलात कमीत कमी २० वेळा बदल करावा लागला.इतकी सगळी धडपड कशासाठी,तर शुभ्र कपडय़ाचे स्वप्न विकायची हिस्सेदारी आपल्या वाटय़ास जास्तीत जास्त यावी म्हणून !

साबणाच्या बाजारातली ही स्पर्धा आजच आहे असं नाही.स्पर्घेची सुरुवात झाली फ्रेंच ५०० विरुध्द टॉमको या सामन्यानी ! त्याकाळी फ्रेंच ५०० नावाचा एकच साबण बाजारात होता.टॉमको म्हणजे टाटा ऑइल मिल्सने त्यांचा साबण मार्केटमध्ये आणला.ही एका अर्थाने देशी विरुध्द विदेशी अशी लढाई होती.टॉमकोचे मुख्य अधिकारी जाल नवरोजी हे देशप्रेमाने भारलेले गृहस्थ होते. त्यांना ही प्रेरणा मिळाली होती त्यांच्या आजोबांकडून म्हणजे दादाभाई नवरोजींकडून ! विदेशी साबणाचे नाव होते विदेशी फ्रेंच ५००च्या 'एक पाऊल पुढे' अशा विचारानी टाटांनी त्यांच्या नव्या साबणाचे नाव ठेवले - ५०१ !

५०१ घरोघरी पोहचला- सर्वसामान्यांचा देशी ब्रँड म्हणून त्याला मान्यता मिळाली.बायका बालटीभर धुणं पाचशे एकच्या बारनी धोका आपटत धुवायच्या आणि मग घामानी थबथबलेल्या कपाळावर ओघळलेल्या दरबार गंधाची खूण नेटकी करून पुन्हा खाकी पावडर लावून कामाला लागायच्या असा सिन घरोघरी दिसायला लागला.आणि थोड्याच काळात लिव्हरने एक पाऊल पुढे टाकत सनलाईट साबण बाजारात आणला.लिव्हरचा सनलाईट महाग होता पण नव्याने नोकरीला लागलेल्या लोकांना तो 'स्टेटस ब्रँड 'वाटायचा.या साबणांमुळे घरातल्या सदस्यात वंचित आणि सधन अशी वर्गवारी तयार झाली.नोकरी धंदा असणार्‍या कमावत्यांचे कपडे सनलाईटने धुतले जायचे आणि घरातल्याच इतर लोकांचे ५०१ बारने ! अगदी ५०१ चा बार न परवडणारे जे लोक होते त्यांचा गरीबाचा साबण म्हणजे ' हिरन छाप काला साबण ! हा काळा साबण फॅक्टरीच्या गाळातून तयार व्हायचा.

आर्थिक सुबत्ता वाढत गेली आणि सोबतच कपडे धुण्याची पध्दतही बदलत गेली.साबण घासण्यापेक्षा ' बकेट वॉश'ची सुरुवात झाली.बकेट वॉश म्हणजे चार चमचे पावडर पाण्यात घोळून त्यात कपडे भिजवण्याची प्रोसेस सुरु झाली, सोबतच 'डिटर्जंट वॉर' सुरु झाले हे अजूनही सुरुच आहे.या स्पर्धेत टाटांचा ५०१ टिकणं शक्यच नव्हतं.१९९० साली टाटांनी ५०१ ब्रँड हिंदुस्तान युनिलिव्हरला विकून टाकला आणि एके काळचा एक स्वदेशी ब्रँड आज विदेशी कंपनीच्या अंगणात उभा आहे.रिनचा सब ब्रँड इतकीच आता ५०१ ची ओळख शिल्लक आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!
लाइफस्टाइल

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आणि सरदार गृहातील अखेरच्या क्षणांची भावूक कहाणी.

१ ऑगस्ट, २०२६

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?
लाइफस्टाइल

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.

५ ऑगस्ट, २०२६