जेव्हा जेव्हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग स्पर्धेचा उल्लेख होतो, त्या यादीत इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सर्वोच्च स्थानी असते. या स्पर्धेची लोकप्रियता जगभर पसरली आहे. या स्पर्धेमुळेच अनेक खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीला वेगळे वळण लागले. तसेच असेही काही दिग्गज खेळाडू होते ज्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र ते पूर्णपणे फ्लॉप ठरले. चला तर पाहूया अशा खेळाडूंची प्लेइंग इलेव्हेन.
१)सौरव गांगुली : या यादीत सर्वोच्च स्थानी आहे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली. आयपीएलच्या पहिल्या ३ हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०११ मध्ये झालेल्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते, परंतु पुणे वॉरियर्स इंडिया संघाने दुखापतग्रस्त असलेल्या आशिष नेहराच्या जागी त्याला आपल्या संघात स्थान दिले होते. यानंतर २०१२ मध्ये त्याने पुणे संघाचे नेतृत्वही केले.
त्याने आयपीएल कारकिर्दीतील ५९ सामन्यांत २५.४५ च्या सरासरीने १३४९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७ अर्धशतक देखील झळकावले होते.
२) व्हीव्हीएस लक्ष्मण :
वेरी वेरी स्पेशल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मणने भारतीय संघाला अनेक वेळा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याला कधीही चांगली कामगिरी करता आली नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला होता आणि यादरम्यान पहिल्या सत्रात तो संघाचा कर्णधारही होता.
व्हीव्हीएस लक्ष्मणने आयपीएल स्पर्धेत २० सामने खेळले. यादरम्यान त्याने १४.८२ च्या सरासरीने २८२ धावा केल्या होत्या.
३) केविन पीटरसन : आयपीएल २००९ मध्ये केविन पीटरसनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विकत घेतले होते आणि तो या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू देखील होता. आरसीबी व्यतिरिक्त पीटरसन दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) कडूनही खेळला होता. पीटरसनने आयपीएलमध्ये ३६ सामने खेळले आणि ३७.०७ च्या सरासरीने १००१ धावा केल्या होत्या. त्याने या स्पर्धेत एकूण ४ अर्धशतक आणि १ शतकही झळकावले होते. परंतु त्याला ज्या उद्देशाने संघात स्थान देण्यात आले होते, तशी कामगिरी करता आली नाही.
४) रॉस टेलर : न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर याने आयपीएल स्पर्धेत ४ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) या संघांचा समावेश आहे. परंतु २०१४ नंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही.
रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु आयपीएल स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने आयपीएल कारकिर्दीत एकूण ५५ सामने खेळले. ज्यामध्ये त्याला २५.४२ च्या सरासरीने १०१७ धावा केल्या.
५) मोहम्मद कैफ : भारतीय संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद कैफ याने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याने एकूण २९ सामने खेळले, ज्यामध्ये त्याला १४.३८ च्या सरासरीने अवघ्या २५९ धावा करता आल्या होत्या. तसेच २०१२ चे आयपीएल हंगाम हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचे हंगाम ठरले.
६) अँजेलो मॅथ्यूज : श्रीलंका संघाचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने २०१७ मध्ये या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळला होता. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, ४९ सामन्यांमध्ये ७२४ धावा केल्या होत्या.
७) नमन ओझा : नमन ओझाने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११३ सामन्यात २०.७२ च्या सरासरीने १५५४ धावा केल्या होत्या.
८) टिम साउदी :न्यूझीलंडचे कर्णधारपद भूषवणाऱ्या टीम साऊदीकडे अनुभवाची कमतरता नाहीये परंतु आयपीएलमधील त्याची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, त्याने ४० सामन्यांत ८.७३ च्या महागड्या इकॉनॉमी रेटने केवळ २८ गडी बाद केले आहेत.
९) रमेश पोवार : भारतीय महिला संघाचा माजी प्रशिक्षक रमेश पोवारने आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उजव्या हाताच्या ऑफ स्पिनरने २०१२ मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्याने आयपीएल कारकिर्दीत २७ सामने खेळले आणि ७.४२ च्या इकॉनॉमी रेटने केवळ १३ गडी बाद केले.
१०) मुरली कार्तिक :भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू मुरली कार्तिक याने आयपीएल स्पर्धेत अनेक संघाचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा समावेश आहे. तो २०१४ शेवटचा आयपीएल सामना खेळताना दिसला होता. कार्तिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ५६ सामने खेळले ज्यामध्ये त्याने ७.२४ च्या इकॉनॉमी रेटने ३१ बळी घेतले.
११) अशोक डींडा : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अशोक डींडा याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आयपीएल कारकिर्दीत एकूण ७८ सामने खेळले ज्यामध्ये त्याने ८.२२ च्या महागड्या इकॉनॉमी रेटने ६८ गडी बाद केले होते.






