मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जेम्स बाँडने चक्क रंग दे बसंतीसाठी ऑडीशन दिली होती? खुद्द दिग्दर्शकाने सांगितलेला हा किस्सा वाचा!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
जेम्स बाँडने चक्क रंग दे बसंतीसाठी ऑडीशन दिली होती? खुद्द दिग्दर्शकाने सांगितलेला हा किस्सा वाचा!!

२००६ मध्ये रिलीज झालेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? आमिर खान, सिद्धार्थ, अतुल कुलकर्णी, सोहा अली खान यांच्यासह आर. माधवन अशी तगडी स्टारकास्ट. ए. आर. रेहमानचे संगीत. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे जबरदस्त दिग्दर्शन. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. सगळी गाणी हिट झाली होती. रुबरु, अपनी तो पाठशाला, रंग दे बसंती ही सगळी गाणी तरुणाईच्या तोंडी होती. फिल्मफेअरसह राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटाने पटकावले. गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अकादमी पुरस्कारांमध्ये भारताने रंग दे बसंती पाठवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटाच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते.

इतक्या वर्षानंतर या चित्रपटाची आठवण काढायचे कारण म्हणजे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटातील स्टारकास्ट विषयी एक नवा खुलासा केला आहे. त्यांच्या 'द स्ट्रेन्जर इन मिरर' या आत्मचरित्रात त्यांनी सांगितले आहे की या चित्रपटासाठी हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगने ऑडिशन दिली होती. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देणार्‍या ब्रिटिश जेलरच्या भूमिकेसाठी डॅनियल क्रेगने ऑडिशन दिली होती. पण त्यावेळी जेम्स बाँड करण्याची संधी चालून आली आणि डॅनियलने रंग दे बसंती नाकारला.

डॅनियल क्रेग म्हणजे बरोबर ओळखलंत..जेम्स बॉण्ड! कॅसिनो रोयाल, क्वांटम ऑफ सोलास, स्कायफॉल आणि स्पेक्टर या ४ चित्रपटांमध्ये जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसणारा डॅशिंग हिरो! २००६ मध्ये म्हणजे रंग दे बसंतीच्या वेळेला डॅनियल क्रेग जेम्स बाँडच्या भूमिकेत कॅसिनो रॉयल या चित्रपटात हिरो म्हणून पुढे आला आणि नंतर हॉलीवूडमध्ये त्याचे करियर टॉपला गेले. डॅनियलचा पुढचा चित्रपट 'नो टाइम टू डाय' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

कलाकारांच्या आयुष्यात असे कलाटणी देणारे अनेक प्रसंग येतात. त्यावेळेला घेतलेला निर्णय योग्य किंवा अयोग्य हे नंतरच कळते. पण सध्या तरी सोशल मीडियावर डॅनियल जर रंग दे बसंती मध्ये दिसला असता तर कसा दिसला असता? अशी गंमतीदार चर्चा चालू आहे.

 

लेखिका:  शीतल दरंदळे

संबंधित लेख