बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार आणि स्टार आहेत. त्याचबरोबरीने अनेक वादग्रस्त कलाकारही आहेत. जसे प्रत्येक सिनेमात मसाला टाकण्यासाठी एक साईड हिरो असतो तसे बॉलिवूडमध्ये हे साईड हिरो असतात. या कलाकारांना सिनेमात काम मिळो वा न मिळो, त्यांची कला दिसो वा न दिसो पण तोंडात येईल ते बरळून नाव कमावणे हे त्यांना चांगले जमते. अशा वादाच्या बाबत राखी सावंत ही बॉलीवूडची राणीच म्हणावी लागेल. पण सध्या तिलाही मागे टाकत एक गडी बॉलिवूडला घाम फोडत आहे.
केआरके नावाने प्रसिद्ध असलेला कमाल रशिद खान हंस आपल्या आगळ्या वेगळ्या सिनेपरिक्षणामुळे बॉलिवूड स्टार्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. सिनेपरीक्षण करत असताना तो अतिशय वाईट शब्दांमध्ये बॉलीवुडकरांचा पाणउतारा करत असतो. त्याचवेळी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून किंवा ट्विटरवरूनही खळबळजनक वक्तव्य करतो. लोकांना चटपटीत गोष्टी हव्या असतात आणि त्याच तो पेरत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून देखील चालत नाही. ज्या सेलिब्रिटीजना तो टार्गेट करतो त्यांना आणि त्यांच्या फॅन्सच्या मनात, शिवाय ज्या फिल्म्सना तो नावे ठेवतो त्यांच्या फॅन्सच्या मनात केआरकेबद्दल प्रचंड राग आहे, पण त्याच्याविषयी कुतुहलही आहे. आजच्या लेखातून आपण हे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न करणार आहोत.











