मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

सिकल सेल: एका जनुकीय आजाराशी भारताचं 'सायलेंट' युद्ध आणि २०४७ चं मिशन

3 मिनिट वाचन

भारतात दरवर्षी हजारो बालकांना ग्रासणारा सिकल सेल अ‍ॅनिमिया आजार, त्याची लक्षणे आणि सरकारच्या निर्मूलन मोहिमेविषयी सविस्तर.

शेअर करा:
सिकल सेल: एका जनुकीय आजाराशी भारताचं 'सायलेंट' युद्ध आणि २०४७ चं मिशन

भारतात दरवर्षी ३० ते ४० हजार मुलं सिकल सेल अ‍ॅनिमिया या गंभीर अनुवांशिक आजारासह जन्माला येतात.ही आकडेवारी केवळ भीतीदायक नाही, तर ती एका मोठ्या सार्वजनिक आरोग्य संकटाची नांदी आहे. १९ जून रोजी साजरा होणाऱ्या 'जागतिक सिकल सेल जनजागृती दिना'च्या निमित्ताने ही आकडेवारी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

सिकल सेल हा रक्ताचा असा विकार आहे जो पिढ्यानपिढ्या चालत राहतो. आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार गोल आणि लवचिक असतो, ज्यामुळे त्या रक्तवाहिन्यांतून सहज वाहतात. मात्र, या आजारात या पेशींचा आकार 'विळ्यासारखा' (Sickle shape) होतो. या कडक आणि चिकट पेशी प्राणवायू वाहून नेण्यास असमर्थ ठरतात आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतात.सिकल सेल केवळ रक्तापुरता मर्यादित राहत नाही. 'सिकल सेल रेटिनोपॅथी'मुळे रुग्णांच्या दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो,असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.रक्ताच्या गाठी डोळ्यांच्या नसांमध्ये अडकल्यामुळे अंधत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे केवळ सांधेदुखी किंवा थकवा हीच लक्षणं नसून, डोळ्यांची तपासणीही तितकीच महत्त्वाची ठरते.

भारताने २०४७ पर्यंत या आजाराचं समूळ उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जून २०२६ पर्यंत देशभरात ६.८ कोटींहून अधिक लोकांची तपासणी (Screening) पूर्ण झाली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २.३७ लाख रुग्ण आणि सुमारे १९ लाख 'कॅरिअर्स' (वाहक) ओळखले गेले आहेत.

महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकट्या महाराष्ट्रात आतापर्यंत १.०८ कोटी लोकांची तपासणी झाली असून, त्यात २९ हजार ६८६ रुग्ण आढळले आहेत. गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हा आजार घराघरात पोहोचला आहे.
यामागचं मुख्य कारण म्हणजे रक्तातील जनुकीय दोष. जर आई आणि वडील दोन्ही 'कॅरिअर' असतील, तर मुलाला हा आजार होण्याचा धोका २५ टक्के असतो. म्हणूनच सध्या डॉक्टर लग्नापूर्वी 'जेनेटिक कुंडली' तपासण्याचा सल्ला देत आहेत. तुमची सिकल सेल स्थिती काय आहे, हे माहित असणं हाच या साखळीला तोडण्याचा एकमेव मार्ग आहे.

नुकतेच'Casgevy' सारख्या जनुकीय उपचारांचे (Gene Therapy) नवे निष्कर्ष समोर आले आहेत. ५ ते ११ वयोगटातील मुलांवर या उपचारांचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत. मात्र, हे उपचार अत्यंत महागडे असल्याने सर्वसामान्यांसाठी आजही जनजागृती आणि वेळेवर निदान हेच प्रभावी शस्त्र आहे.

भविष्यात काय होणार? तंत्रज्ञानाची प्रगती आणि सरकारी मोहिमेमुळे आपण रुग्णांची ओळख पटवण्यात यशस्वी होत आहोत. पण जोपर्यंत समाज लग्नापूर्वी सिकल सेल कार्ड तपासण्याला प्राधान्य देत नाही, तोपर्यंत ही साखळी तुटणं कठीण आहे. विळखा घातलेल्या या पेशींपासून मुक्त होण्यासाठी विज्ञानासोबतच सामाजिक जाणीवेची गरज आहे. तुमच्या रक्ताची स्थिती तुम्हाला माहित आहे का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अल्बिनिझम: गोऱ्या रंगामागील संघर्ष आणि बदलण्याची गरज असलेला दृष्टिकोन
आरोग्य

अल्बिनिझम: गोऱ्या रंगामागील संघर्ष आणि बदलण्याची गरज असलेला दृष्टिकोन

मेलेनिनच्या अभावामुळे होणारा अल्बिनिझम हा आजार नसून जनुकीय बदल आहे; जाणून घ्या या धवल व्यक्तींचा संघर्ष आणि वास्तव.

१३ जून, २०२६

लाखो मातांचे प्राण वाचवणारी ती 'तलवार': डेटॉलच्या जन्माची रंजक गोष्ट
आरोग्य

लाखो मातांचे प्राण वाचवणारी ती 'तलवार': डेटॉलच्या जन्माची रंजक गोष्ट

१९३० च्या दशकात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या संसर्गावर मात करण्यासाठी जन्मलेल्या डेटॉल अँटीसेप्टिक द्रवाची रंजक कहाणी.

७ जुलै, २०२६

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?
आरोग्य

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?

वजन कमी होण्याआधीच रक्तातील साखर कशी नियंत्रणात येते? जाणून घ्या रू-एन-वाय गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेमागील हार्मोनल विज्ञान.

२४ सप्टेंबर, २०२६

विंचवांशी मैत्री करणारा डॉक्टर
आरोग्य

विंचवांशी मैत्री करणारा डॉक्टर

घरात शेकडो विंचू पाळून त्यांच्या विषाने रुग्णांवर उपचार करण्याचा दावा करणारे अफगाणिस्तानचे डॉ. अमीन शिरझाद आणि या उपचारपद्धतीमागील सत्य.

४ ऑक्टोबर, २०२६