१९५० सालची गोष्ट आहे.अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील एव्हरग्रीन पार्क येथील Little Company of Mary Hospital या छोट्याश्या रुग्णालयात एक वैद्यकीय क्रांती घडली. हे रुग्णालय जगप्रसिद्ध वैद्यकीय संशोधन केंद्र नव्हते. ब्रिटिश नन्स चालवत असलेले हे एक साधे कॅथॉलिक रुग्णालय होते.त्या काळी वैद्यकशास्त्रात इतिहास घडवणारे प्रयोग तर बोस्टन, पॅरिस किंवा मोठ्या विद्यापीठांच्या रुग्णालयांतच होत असत.
पण १७ जून १९५० रोजी याच छोट्याशा रुग्णालयात शल्यविशारद डॉ. रिचर्ड लॉलर यांनी असे काही केले, जे त्याआधी वैद्यकीय इतिहासात कुणीही केले नव्हते. त्यांनी एका मृत महिलेची किडनी काढून ती एका मरणासन्न महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित केली.
ती रुग्ण होती ४४ वर्षांची रुथ टकर, तिची दोन्ही मूत्रपिंडे हळूहळू निकामी होत होती. त्यामागे कारण एक आनुवंशिक आजार होता. त्याच आजाराने तिची आई आणि बहीण यापूर्वीच दगावल्या होत्या. रुथसाठीही वेळ संपत चालली होती अशीच लक्षणं दिसत होती.रुथ तब्बल पाच आठवडे रुग्णालयात पडून मृत्यूची वाट पाहत होती.
आज आपल्याला डायलिसिस, अवयवदान, tissue matching आणि immunosuppressant औषधे सहज उपलब्ध असल्यासारखी वाटतात. पण १९५० मध्ये या सगळ्या गोष्टी वैद्यकीय कल्पनांच्या जगात होत्या.
त्याच वेळी यकृताच्या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तिची किडनी रुथला देता येईल का, याचा विचार डॉ. रिचर्ड लॉलर यांच्या मनात आला.
दोघी महिला होत्या , दोघींचाही रक्तगट एकच होता. वय आणि शरीराचा आकारही साधारण जुळत होता.
त्या काळच्या विज्ञानाकडे विचार करण्यासारखे एवढेच होते. आणि मग डॉ. रिचर्ड लॉलर यांनी ऑपरेशन सुरू केले.
सुमारे ४० डॉक्टर हा अभूतपूर्व प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित होते. डॉ. लॉलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या ४५ मिनिटांत प्रत्यारोपण पूर्ण केले. १९५० मध्ये हा जवळजवळ अकल्पनीय पराक्रम होता.
आणि आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे—
रुथ टकर ३० दिवसांनी स्वतःच्या पायावर रुग्णालयातून बाहेर पडली. पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती. प्रत्यारोपित किडनी काही महिने काम करत राहिली. त्यानंतर रुथच्या शरीरानेच त्या किडनीला 'परकी वस्तू' समजले आणि प्रत्यारोपीत किडनी reject झाली.
आज डॉक्टर अशा वेळी immunosuppressant औषधांच्या मदतीने शरीराची प्रतिकारशक्ती नियंत्रित करू शकतात. पण १९५० मध्ये अशी औषधे नव्हती. अवयव प्रत्यारोपणासाठी आज असलेले शास्त्रीय ज्ञान नव्हते. डॉ. लॉलर अक्षरशः अंधारात हातपाय मारत प्रयोग करत होते. त्यांच्याकडे काही प्राण्यांवरील प्रयोगांचे अनुभव होते आणि त्याहून मोठी गोष्ट होती—धाडस.
पण वैद्यकीय जगाने त्यांचे कौतुक केले नाही. उलट त्यांच्यावर बेफिकिरीचा आरोप झाला. अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशनने अवयव प्रत्यारोपणावर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी केली. काही सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले.
इतका विरोध असूनही या प्रयोगातून एक विलक्षण गोष्ट घडली होती. प्रत्यारोपित किडनी अखेर निकामी झाली, पण रुथच्या शरीरात जन्मतः असलेल्या किडनीने काही प्रमाणात पुन्हा काम सुरू केले. आणि रुथ जगत राहिली.आणखी पाच वर्षे!
तिचा मृत्यू पुन्हा किडनीच्या आजाराने झाला नाही. तिचे आयुष्य हृदयविकाराने संपले. म्हणजेच, तिच्या कुटुंबाच्या असलेल्या आनुवंशिक रोगाने लिहून ठेवलेली मृत्यूची शिक्षा तिने काही काळासाठी तरी मोडून काढली होती.
आणि डॉ. लॉलर? त्यांनी पुन्हा कधीही किडनी प्रत्यारोपण केले नाही. त्यांचे म्हणणे साधे होते—
“हे करता येते, एवढेच मला सिद्ध करायचे होते.”
पुढे त्यांच्या या कामाची दखल घेतली गेली. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी नामांकनही मिळाले. आणि त्या पहिल्या प्रयोगानंतर सुमारे वीस वर्षांनी, त्याच छोट्याशा रुग्णालयात एका समारंभात त्यांचा सत्कार झाला.
या वेळी मात्र दृश्य वेगळे होते. ज्यांनी कधीकाळी त्यांच्यावर टीका केली होती, त्यांच्या जगाने आता उभे राहून टाळ्या वाजवल्या.
आज जगभरात दरवर्षी हजारो किडनी प्रत्यारोपणे केली जातात. अत्याधुनिक tissue matching, immunosuppressant औषधे, अवयवदानाच्या व्यवस्था आणि शस्त्रक्रियेतील प्रचंड प्रगतीमुळे किडनी प्रत्यारोपण हे आता वैद्यकशास्त्रातील वैद्यकीय स्थापित उपचार झाले आहे.पण प्रत्येक मोठ्या वैद्यकीय क्रांतीच्या मागे एक पहिलं पाऊल असतं. कधी कधी ते पाऊल एखाद्या अत्याधुनिक संशोधन केंद्रात पडत नाही.
१७ जून १९५० रोजी छोट्याशा रुग्णालयाच्या साध्याशा ऑपरेशन थिएटरमध्ये घडले.एक डॉक्टर.-एक मरणासन्न स्त्री.-एका मृत महिलेची किडनी.आणि फक्त ४५ मिनिटे.
त्या ४५ मिनिटांत आधुनिक अवयव प्रत्यारोपणाच्या इतिहासातील एक नवे पान लिहिले गेले. आणि त्या वेळी मात्र जगाला त्याचे महत्त्व कळलेले नव्हते.






