यवतमाळच्या तरुणाने केला व्हिएतनामी मुलासोबत समलिंगी विवाह!!
मंडळी सध्या देशात समलैंगिक संबंधावरून विविध वाद सुरू असतानाच यवतमाळच्या एका तरुणानं चक्क एका व्हिएतनामी तरुणाशी समलिंगी विवाह केलाय! हा वेगळ्या प्रकारचा विवाह गोपनीय पध्दतीने झाला असला तरी त्याबद्दल बरीच माहिती समोर येत आहे.
यवतमाळमधील प्रसिध्द पुस्तक विक्रेत्यांचा मुलगा असलेला हा तरुण कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर काम करतो. तिथेच तो स्थायिकही झाला आहे आणि तिथेच त्याचं या व्हिएतनामी तरुणावर प्रेमही बसलं.
कुटुंबिय यवतमाळमध्ये असल्याने या जोडीने लग्नही यवतमाळमध्येच उरकायचं ठरवलं. ३० डिसेंबर रोजी यवतमाळच्या एक आलिशान हॉटेल 'गेट टूगेदर' च्या नावाखाली बुक करून या जोडप्याचा वैदिक पध्दतीने विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लावण्यात आला. विशेष म्हणजे या लग्नाला अमेरिकेमधून आलेले मित्रमंडळी आणि काही समलिंगी जोडपीही उपस्थित होती. त्याचबरोबर यवतमाळमधल्याही बर्याच मंडळीनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
काही बातम्यांमध्ये सांगण्यात येत होतं की या लग्नाला तरुणाच्या आईचा विरोध होता, पण खरंतर तरुणाच्या आईनेच पुढाकार घेऊन हे लग्न लावलेलं आहे.
असा हा विचित्र विवाह उरकून हे नवदाम्पत्य 'मधुचंद्राला' निघूनही गेलं मंडळी. पण यवतमाळकरांना या लग्नाचं विशेष अप्रूप वाटलं असेल हे नक्की!!