मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!

4 मिनिट वाचन

आज जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या ८०% हून अधिक हास अ‍ॅव्होकॅडोचा शोध रुडॉल्फ हास नावाच्या साध्या पोस्टमनने कसा लावला?

शेअर करा:
जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोच्या मागे एका पोस्टमनची 'ही' १०० वर्ष जुनी गोष्ट दडलेली आहे

आज जगभरात विकल्या जाणाऱ्या अ‍ॅव्होकॅडो पैकी ८० टक्क्यांहून अधिक फळांचा उगम हा केवळ एकाच झाडापासून झाला आहे. एका सामान्य पोस्टमनने आपल्या परसात लावलेल्या त्या एका झाडाने आज अब्जावधी डॉलर्सची जागतिक बाजारपेठ व्यापली आहे.

एखाद्या मॉलमध्ये अ‍ॅव्होकॅडो खरेदी करताना त्याच्यावरचं लेबल पहा.(आपल्याकडे भय्याजी जे अवकाडू विकतात त्यावर लेबल नसतं.) त्यावर बहुतेक वेळा 'Hass' (हास) असं लिहिलेलं असतं. हे नाव एका माणसाचं आहे— रुडॉल्फ हास. कॅलिफोर्नियामध्ये राहणारा हा माणूस व्यवसायाने साधा पोस्टमन होता. याच पोस्टमनच्या नकळतपणे एका अ‍ॅव्होकॅडोची निर्मिती झाली, ज्याने जगाची चवच बदलून टाकली.

त्या काळी अ‍ॅव्होकॅडो हे आजच्यासारखं लोकप्रिय नव्हतं. ते फक्त श्रीमंतांच्या ताटाला सजवणारं एक 'लक्झरी' फळ होतं. चवीला ते जेमतेमच होतं आणि त्यात आजच्यासारखा मलाईदारपणा किंवा फॅट्स नव्हते.

एक दिवशी टपाल वाटत असताना रुडॉल्फच्या हातात एक मॅगझिन लागलं.त्यात अ‍ॅव्होकॅडो शेतीतून बक्कळ पैसा मिळवण्याची जाहिरात होती. 'झाडावर पैसे उगवतात' या कल्पनेने भारावून जाऊन रुडॉल्फने आपल्या घरच्या परसात अ‍ॅव्होकॅडोच्या बिया लावल्या.रुडॉल्फने लावलेल्या झाडांपैकी एक झाड फारच विचित्र वागू लागलं. त्याची वाढ नीट होत नव्हती, पानं वेगळी होती. रुडॉल्फला वाटलं हे झाड काही कामाचं नाही, तो ते कुऱ्हाडीने तोडायलाच निघाला होता. पण त्याच्या मुलांनी हट्ट धरला की हे झाड राहू द्या. केवळ मुलांच्या प्रेमाखातर त्याने ते झाड तसंच ठेवलं.

जेव्हा त्या झाडाला फळं आली, तेव्हा रुडॉल्फ चकितच झाला. ती फळं आकाराने वेगळी होती, त्यांची त्वचा जाड आणि काळपट होती. पण जेव्हा त्याने ते फळ कापलं, तेव्हा आतून जे निघालं ते अद्भूत होतं. ते फळ अत्यंत मलाईदार, लोण्यासारखं मऊ आणि चवीला अप्रतिम होतं. हेच ते 'हास अ‍ॅव्होकॅडो' जे आज आपण खातो.

आपण आज जे अ‍ॅव्होकॅडो खातो, ते त्या मूळ झाडाचं फळ नसून त्याचा 'क्लोन' आहे.विज्ञानाची ही कमाल समजून घेण्यासारखी आहे. अ‍ॅव्होकॅडोच्या बिया पेरल्या तर त्यातून प्रत्येक वेळी वेगळ्याच चवीचं फळ येतं. त्यामुळे रुडॉल्फच्या त्या लाखों में एक झाडाची चव टिकवण्यासाठी 'ग्राफ्टिंग' (कलम करणे) या तंत्राचा वापर सुरू झाला.

मूळ झाडाची एक फांदी कापून दुसऱ्या झाडाला जोडली जाते. यालाच आपण प्लांट क्लोनिंग म्हणतो. आज जगात जिथे कुठे हास अ‍ॅव्होकॅडो मिळतं, ते त्या एकाच झाडाचं डीएनए घेऊन वाढलेलं असतं. गेल्या १०० वर्षांपासून आपण एकाच झाडाच्या क्लोनचे क्लोन बनवून ते खातोय.

त्याकाळी रुडॉल्फने या झाडाचं पेटंट घेतलं होतं. ठरल्याप्रमाणे त्याला प्रत्येक विकल्या गेलेल्या कलमामागे १ डॉलर मिळणार होता. हिशोब केला तर तो आज करोडपती असायला हवा होता.

पण झालं बघा काय, लोक रुडॉल्फकडून एक झाड विकत घ्यायचं आणि मग स्वतःच चोरून त्याची हजारो कलमं तयार करायचे. या चोरीला रोखणं रुडॉल्फला शक्यच नव्हतं.ज्या फळाने जगाला श्रीमंत केलं, त्या फळाच्या निर्मात्याला आयुष्याच्या शेवटी फक्त ४००० डॉलर्स मिळाले.

जगाची भूक भागवणाऱ्या आणि शेकडो कंपन्यांना गर्भश्रीमंत करणाऱ्या या फळाची ही गोष्ट जितकी विस्मयकारक आहे, तितकीच ती एका साध्या माणसाच्या दुर्दैवाची साक्ष देते. एका पोस्टमनने अनावधानाने दिलेली ही 'भेट' आज आपल्या नाश्त्याच्या टेबलावर आहे, पण त्याचं नाव मात्र फक्त त्या छोट्याशा लेबलपुरतं मर्यादित राहिलंय.

हासची कथा वाचल्यावर वाटतं की आजही अनेक यशस्वी ब्रॅंड्सच्या मागे अशा कितीतरी पोस्टमनच्या नशिबाच्या गोष्टी दडलेल्या असतील.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!
लाइफस्टाइल

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आणि सरदार गृहातील अखेरच्या क्षणांची भावूक कहाणी.

१ ऑगस्ट, २०२६

संन्याशांच्या तलवारीतून जन्मलेल्या पहिल्या क्रांतीची थरारक गाथा: आनंदमठ
लाइफस्टाइल

संन्याशांच्या तलवारीतून जन्मलेल्या पहिल्या क्रांतीची थरारक गाथा: आनंदमठ

१७७० चा संन्यासी उठाव आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'आनंदमठ' कादंबरीमागील रक्तरंजित सत्य इतिहास.

१५ ऑगस्ट, २०२६

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह
लाइफस्टाइल

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह

एका धाडसी पायलटच्या प्रसंगावधानामुळे आकाशातच हायजॅकर्सचा डाव उलथवून लावणारी एल अल फ्लाईट २१९ ची थरारक कथा.

१८ ऑगस्ट, २०२६