मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कोरियाच्या गल्लीबोळात भारतीय आयुर्वेदाचा डंका: हिमालयच्या गोळीने कसं लावलं वेड?

3 मिनिट वाचन

दक्षिण कोरियाच्या २५० दशलक्ष डॉलर्सच्या हँगओव्हर मार्केटमध्ये भारताच्या हिमालय कंपनीच्या 'पार्टी स्मार्ट' गोळीने कशी क्रांती केली?

शेअर करा:
कोरियाच्या गल्लीबोळात भारतीय आयुर्वेदाचा डंका: हिमालयच्या गोळीने कसं लावलं वेड?

कोरियाच्या गल्लीबोळात भारतीय 'जडीबुटी'चा डंका:एका आयुर्वेदिक गोळीने कोरियाला कसं वेड लावलं?

ही गोष्ट आहे एका अशा भारतीय ब्रँडची ज्याने दक्षिण कोरियाच्या औषधांच्या दुकानांवर कब्जा केला आहे. दक्षिण कोरिया हा जगातल्या अशा देशांपैकी एक आहे जिथे लोक अक्षरशः रोज दारू पितात. तिथे ऑफिसनंतर एकत्र बसून पिणं ही एक संस्कृती आहे. आता एवढं प्यायल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर कसं जायचं? याच प्रश्नातून तिथे 'हँगओव्हर क्युअर'चा एक अवाढव्य मार्केट तयार झालं आहे.

२०२२ च्या आकडेवारीनुसार, कोरियात हँगओव्हर उतरवणाऱ्या औषधांची बाजारपेठ तब्बल २५० दशलक्ष डॉलर्सची होती आणि ती दरवर्षी ४० टक्क्यांनी वाढतेय. आता इथे ट्विस्ट असा आहे की, या मार्केटमध्ये घुसखोरी केली आहे भारताच्या 'हिमालय' (Himalaya) कंपनीने. त्यांचं 'पार्टी स्मार्ट' (Party Smart) नावाचं उत्पादन आज कोरियातल्या अनेक फार्मसीमध्ये नंबर वनवर आहे.

कोरियन लोकांना सुरुवातीला वाटलं की हे केवळ एक साधं औषध आहे. पण जेव्हा त्यांना कळलं की हे पूर्णपणे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटकांपासून बनलेलं आहे, तेव्हा त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. कोरियामध्ये 'हानबांग' (Hanbang) नावाची त्यांची स्वतःची पारंपरिक औषध पद्धती आहे. त्यामुळे निसर्गातून मिळणाऱ्या औषधांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. आयुर्वेद आणि हानबांग यांचं नातं जुळलं आणि मग काय झालं? कोरियन लोक अक्षरशः भारतीय आयुर्वेदाच्या प्रेमात पडले.

गोष्ट फक्त एका गोळीपुरती मर्यादित राहिलेली नाही. हिमालयच्या या यशामुळे कोरियन लोकांसाठी आयुर्वेदाचं एक मोठं दालन खुलं झालं आहे. आता तिथे एक नवीन क्रांती येण्याची शक्यता आहे. विचार करा, कोरियन ब्युटी प्रॉडक्ट्स (K-Beauty) जगभर प्रसिद्ध आहेत. आता याच कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात भारतीय हळद, अश्वगंधा आणि कडुलिंबाचा अर्क टाकला जाणार आहे.

आता इथे एक मोठी संधी दडलेली आहे. अनेक भारतीय कंपन्या आता कोरियन फॉर्म्युलेशन मेकर्ससोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना फक्त कोरियातच नाही, तर संपूर्ण जगाला 'आयुर्वेदिक के-ब्युटी' विकायची आहे. शीट मास्क, सीरम आणि अंडर-आय पॅचेसमध्ये जेव्हा भारतीय जडीबुटींचा टच येईल, तेव्हा तो जागतिक मार्केटमध्ये धमाका करणार हे नक्की.. हे केवळ व्यवसायापुरतं मर्यादित नाही. भारताची ही प्राचीन विद्या आज जगातील सर्वात आधुनिक देशांपैकी एक असलेल्या कोरियामध्ये आपली जागा बनवतेय, हे पाहून अभिमान वाटतो. एकेकाळी आपण ज्या गोष्टींना 'घरगुती उपाय' म्हणून दुर्लक्षित केलं, त्याच गोष्टी आज डॉलरमध्ये कमाई करून देत आहेत.

आपल्या पूर्वजांनी दिलेला हा वारसा जेव्हा सातासमुद्रापार असा डंका वाजवतो, तेव्हा त्यामागे केवळ मार्केटिंग नसतं, तर हजारो वर्षांचा विश्वास असतो.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख