पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही.ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे.
एकेकाळी घरी वापरायचं तूप घरीच कढवलं जायचं आणि तेल आणायला शनिवार वगळता तेलाच्या घाण्या होत्या.लग्न कार्य वगैरे वगळता रोजचं तूप घरीच कढवलं जायचं.पण एकाएकी सगळ्या आर्थिक व्यवस्थेचे सांधे बदलले. माणसं वाढली -भुकेची पोटं वाढली आणि अन्न कमी पडायला लागले. समाजव्यवस्था एकेका दशकात वेगाने सांधे बदलत गेली .चिंता -क्लेश-दु:ख -दरीद्र देशांतराला गेलीच नाहीत पण माणसं मात्र जगायला घराच्या बाहेर पडली.अस्तित्व तगवून धरण्याची एक न संपणारी लढाई सुरु झाली.स्वस्त साधन स्त्रोताचे शोध सुरु झाले आणि डालडा घरात आले.
एकेकाळी डालडा म्हटल्यावर नाक मुरडणारी माणसं रांगेत उभं राहून डालडा आणायला लागली.सैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहीला.याचे श्रेय जाते हिंदुस्थान लिव्हरच्या चिवट मार्केटींगलाच द्यावे लागेल.सुरुवातीला हातगाडीवर स्टोव्ह आणि कढईचा संसार मांडून एक माणूस डालडात पुर्या तळून दाखवायचा आणि जमलेल्या गर्दीला आग्रहानी खायला घालायचा त्यानंतर डालडात बनवायच्या पाककृतींचं पुस्तकं पण आलं.
डालडा म्हणजे काय तर हायड्रोजीनेटेड तेल.तेलापासून बनवलेलं तूप .म्हणून वनस्पती तूप.दिसायला साजुक तूपासारखं .रंगानी आकर्षक आणि चवीनी एकदम बुद्दू !!वनस्पती तेलाच्या रेणू शृंखलेतल्या रिकाम्या शिटा हायड्रोजनच्या रेणूंनी भरून काढल्या की झालं वनस्पती तूप तयार.पॅलॅडीयम नावाच्या एका धातूच्या मदतीने हे स्थित्यंतर सहज शक्य होते.हायड्रोजीनेशन केल्यावर तेलाचं जे काही होतं त्याला म्हणायचं वनस्पती तूप .त्यात थोडासा बदल करून -जीवनसत्वाची भर घालून हिंदुस्थान वनस्पती मॅन्युफॅक्चरींग कंपनीने पहील्यांदा डालडा भारतात आणलं.नंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान लिव्हर झालं.
डालडा ह्या नावाचा मात्र एक वेगळाच किस्सा आहे. सुरुवातीला हे वनस्पती तूप भारतात आयात केलं जायचं डाडा अँड कंपनी मार्फत . लिव्हरला मात्र स्वतःचा मालकी हक्क दाखवायचा होता मग त्यात तडजोड म्हणून एल जोडून डालडा नाव तयार झालं.डालडा अस्तित्वात आल्यापासून पाच वर्षाच्या आत शिवडीच्या फॅक्टरीत डालडा बनायला सुरुवात झाली.१९३७ साली प्रकाश टंडन नावाच्या एका भारतीयाला बोर्डावर घेऊन लिव्हरनी आपले हेतू स्पष्ट केले आणि त्यानंतर हिंदुस्थान लिव्हरच्या अश्वमेधाचा घोडा अडवायला कुणीच धजावलं नाही.
१९६५ -१९७१ ची दोन युध्दं झाली -सत्तर एकाहत्तर बहात्तरचा ची वर्षे लागोपाठ अवर्षणाची गेली आणि डालडा पण काळ्या बाजारात गेलं . लोकसभेत डालडाच्या वाढत्या भावावर आणि दुर्भीक्षावर अनेक चर्चा झडल्या आणि डालडा रेशन कार्डावर मिळायला लागलं.राहणीमान बेचव झालं पण तगून राहण्याची गरज त्यापेक्षा मोठी होती.हळूहळू डालडाच्या स्पर्धेत अनेक ब्रँड आले .पत्र्याच्या डब्यातलं डालडा प्लॅस्टीकच्या पिशवीत मिळायला लागलं.
नव्वदीच्या नंतरची पिढी मिळवती झाली आणि नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालडाची गरज संपली.कधी न ऐकलेल्या तेलबियांचं तेल घरात आलं.काही वर्षापूर्वी लिव्हरनी डालडा ब्रँड विकून टाकला.






