मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कल्हणकृत राजतरंगिणी आणि काश्मीरच्या राजांचा रंजक प्राचीन इतिहास

4 मिनिट वाचन

कल्हण पंडितांच्या राजतरंगिणी ग्रंथाच्या आधारे काश्मीरचा प्राचीन इतिहास आणि कर्कोटक वंशातील राजांच्या कारभाराचा रंजक वेध.

शेअर करा:
कल्हणकृत राजतरंगिणी आणि काश्मीरच्या राजांचा रंजक प्राचीन इतिहास

बोभाटाच्या काश्मिर फाईल्स -पुण्याच्या मनोहर ग्रंथमाला या प्रकाशनाने १९४१ साली 'संस्कृती संगम' हे दत्तात्रय केशव केळकर यांचे पुस्तक प्रकाशित केले होते.या पुस्तकात काश्मिरचा प्राचीन इतिहास वर्णन केला आहे.या मालिकेत तो इतिहास 'जसा आहे तसा' आम्ही देत आहोत.हा इतिहास माहितीपूर्ण आणि मनोरंजक आहे.जुन्या पुस्तकातील माहितीचे दस्तऐवजीकरण करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे म्हणून ही मालीका वाचनासाठी देत आहोत.

(आता) राजतरंगिणी या खास इतिहास ग्रंथाकडे वळू या. संस्कृत वाङ्मयाच्या अफाट विस्तारात खास इतिहासाला वाहिलेले ग्रंथ अत्यल्प आहेत.जे आहेत त्यात राजतरंगिणीचा दर्जा फार मोठा आहे.या ग्रंथाचा कर्ता कल्हण हा अमात्याचा पुत्र असल्याने त्याला राजकीय व्यवहाराची पूर्ण माहिती होती. पूर्वग्रंथांचा ,दंतकथांचा, शिलालेख, ताम्रपट, शासने यांचा त्याने अभ्यास केला होता व याहूनही विशेष म्हणजे इतिहासकाराच्या अंगी अवश्य ससणार्‍या निरिक्षणशक्ती, विवेचकपणा व नि:स्पृहता ह्या तिन्ही गुणांचे वास्तव्य त्याच्या ठायी होते.यामुळे राजतरंगिणीतील शेवटच्या भागाइतकाच विश्वसनीय इतिहास संस्कृत वाङ्ममयात हाच होय. या ग्रंथात काश्मीरचा इतिहास थेट कौरव -पांडवांपासून सुरुवात करून बाराव्या शतकापर्यंत आणून सोडला आहे.पैकी इसवीसनाच्या सहाव्या शतकापूर्वीचा इतिहास दंतकथांवर उभारलेला असला तरी नंतरचा ऐतिहासिक साधनांवर उभारलेला आहे.तरी ह्या पुढील काळच्या इतिहासपटावरून विहंगदृष्टी टाकू म्हणजे या कालातील राजेलोकांचे चरित्र ध्यानी येईल.हे चरित्र म्हणजे वैषयिक आणि तामसी लीलांचे साक्षात प्रदर्शन होय !

इ.स. ५९९ मध्ये कर्कोटक वंशाचा पहिला प्रतापादित्य हा राजा गादीवर बसला तेथून पुढचा इतिहास विश्वसनीय असा आहे.प्रतापादित्यानंतर त्याचा पुत्र दुर्लभक गादीवर आला.तो आपल्या राज्यातील नोनक नावाच्या सावकाराच्या घरी एक दिवस मेजवानीस गेला असता,सावकाराची लावण्यवती स्त्री नरेंद्रप्रभा हिला पाहून अत्यंत मोहित झाला.पुढे कामकाजावरचे त्याचे लक्ष उडाले व तो मनात झुरू लागला.सावकाराला ही गोष्ट कळल्यावर त्याने राजाकडे जाऊन विनंती केली की "महाराज, आपली प्राणांतिक अवस्था झाली असतात धर्माधर्माच्या अडचणी कसल्या घेऊन बसला आहात ? हरकत वाटत असली तर नरेंद्रप्रभेस मी देवदासी म्हणून मंदीरात अर्पण करतो.तेथून तिचा आपण स्विकार करावा.

त्यानंतरचा ललितादित्य मोठा पराक्रमी होता.त्याने अनेक दिग्विजय करून सर्व पृथ्वी जणू सुवर्णमय करून सोडली.पण हा राजा इंद्राहूनही श्रेष्ठ असताना कल्हण लिहितो की त्याच्या हातून फार अनुचित गोष्ट घडली.गौडदेशाचा राजा हा सर्व सैनिकांसह एकदा शारदेच्या दर्शनाला आला होता व ललितादित्याने परिहास केशवाच्या भव्य मूर्तीसमोर उभे राहून गौड राजाच्या रक्षणाची हमी घेतली होती.पण शेवटी विश्वासघात करून त्याने गौड राजाला मारेकर्‍यांकरवी ठार केले.गौड सैनिकांनी मात्र मालक मारला गेलेला व परत जाण्याचा मार्ग अतिशय दूर ,अशा बिकट परिस्थितीतही शौर्याने लढून धारातीर्थी देह अर्पण केले.कल्हणाच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे त्यांच्यासारख्या स्वामिनिष्ठेचे दुसरे उदाहरण विधात्यालासुध्दा क्वचितच दाखवता आले असते.

यानंतरचा वज्रापीड हा क्रोधी आणि विषयलंपट होता.त्याच्या अंतःपुरात असंख्य स्त्रिया असून त्यांचाशी तो सारखा रममाण झालेला असे.त्याने पुषकळसे लोक धरून गुलाम म्हणून म्लेंच्छांना विकण्यासही कमी केले नाही ! पुढे पृथ्व्यापिड व नंतर ललितादित्याचा नातू जयापीड हे सिंहासनारूढ झाले.जयापीड दिग्विजय करीत दूरदेशी गेला असताना त्याचा शालक जज्ज याने विश्वासघात करून गादी बळकावली.पण तीन वर्षाने जज्ज मारला गेल्यावर जयापीडाने पुन्हा राज्यसूत्रे हातात घेतली.विनयादित्य असे नाव धारण केले व अनेक साहसी प्राक्रम करून दिग्विजय केला. पण पुढे कल्हण सांगतो की प्रजेच्या दुर्भाग्याने तो अनन्वित जुलूम करू लागला.तो इतका लोभी बनला कि तीन वर्षेपंर्यंत शेतकर्‍यांनी पैदा केलेली झाडून सारी संपत्ती त्याने जबरदस्तीने हरण केली.या लोभमूर्तीला परस्व हरण करणारे व त्यातील अत्यल्प सरकारात भरणारे नीच कामगार हे हितकर्ते वाटू लागले..या राजाच्या त्रासाला कंटाळून पुष्कळ ब्राह्मण देशांतराला निघून गेले व पुष्कळांनी आक्रोश करून प्राण सोदले. पण राजाला त्याची फिकीर नव्हती.त्याने बेपर्वाईने एवढीच आज्ञा केली की नव्व्याण्णव ब्राह्मण प्राण टाकतील तेव्हा मला वर्दी देत जावी.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

हुंडा सगळ्यांना नको होता... तरीही मुली मरत राहिल्या
लाइफस्टाइल

हुंडा सगळ्यांना नको होता... तरीही मुली मरत राहिल्या

१९६१ चा हुंडाबंदी कायदा आणि १९८५ ची सुधारणा असूनही हुंडाबळी का थांबत नाहीत? समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवणारा लेख.

२ ऑक्टोबर, २०२६

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६