मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जीओ पाणीपुरीची दन दना दन ऑफर !!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
जीओ पाणीपुरीची दन दना दन ऑफर !!!

पोरबंदरचे खाऊ मार्केट फेमस आहे 'खाजली'साठी. खाजली  म्हणजे मैदा, तूप आणि काळीमिरी वापरून केलेला पदार्थ. खाजली बनवण्यासाठी पोषक हवामान असलेल्या पोरबंदरमध्ये खाजली बनवणारे शंभराहून अधिक उत्पादक  आहेत आणि या लोकांकडे ५०० हून अधिक कारागीर खाजली बनवतात. पण सध्या पोरबंदर गाजते आहे चौपाटी वरच्या जीओ पाणीपुरीमुळे !

धंदा वाढवायचा तर काही तरी भन्नाट केलेच पाहीजे या विचाराने पोरबंदरच्या रवि जमदारीया या मुलाने  रिलायन्सच्या 'जीओ' कडून स्फूर्ती घेतली आणि चक्क जीओ पाणीपुरीची दन दना दन  ऑफर बाजारात आणली. सध्या सोशल मिडीयावर त्याच्या भेळ पाणीपुरीच्या गाडीचा फोटो व्हायरल झाला आहे. १०० रुपयांत एका व्यक्तीला अनलिमीटेड पाणीपुरी आणि हजार रुपयात महिनाभर पाणीपुरी - भेळ आणि चाटच्या चार प्लेटसोबत पाचवी प्लेट फ्री ...फ्री...!!!  अशी दणकेबाज ऑफर रवि जमदारीयाने आणली  आहे. या ऑफरबद्द्ल बोलताना रवि म्हणाला की काहीतरी स्कीम आणल्या शिवाय धंदा वाढणार नाही याची मला कल्पना होतीच, पण काय करावे याचा विचार करताना मला 'जीओ' कडून स्फूर्ती मिळाली. आता माझ्या गाडीवर रोज १००० पाणीपुरीचा खप वाढला आहे. 

या गाडीच्या फोटोत दिसणार्‍या रविच्या  मोबाईल नंबरवर फोन करू नका. कारण हा फोटो व्हायरल झाल्यावर रविला इतके फोन येत आहेत की आता त्याने कॉल घेणे बंदच केले आहे. आमच्या प्रतिनिधीने रविशी दुसर्‍या एका मित्राच्या मदतीने फोन केल्यावर रविने ही माहिती दिली.

एक विशेष सूचना!! रविच्या गाडीवर पाणीपुरी खायला गेलात त्याचा एक स्पेशल आयटम ' लसणीया बटेटा' खायला विसरू नका. मुंबईच्या भेळवाल्याकडे  हा आयटम मिळत नाही !!!

संबंधित लेख