मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!

7 मिनिट वाचन

जेआरडी टाटांपूर्वी स्वतःचे विमान घेऊन उड्डाण करणारे भारताचे पहिले वैमानिक पुरुषोत्तम मेघजी काबाली यांच्या अज्ञात प्रवासाची गोष्ट.

शेअर करा:
इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!

भारतीय विमान उद्योगाचे जनक असं कुणाला ओळखलं जातं? पहिले भारतीय वैमानिक कोण? मंडळी, आपल्यापैकी अनेकजण डोळे झाकून उत्तर देतील की या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आहे - जहाँगीर रतनजी दादाभॉय टाटा म्हणजेच जेआरडी टाटा. आणि ते बरोबरच आहे. पण ज्या काळात टाटांनी प्रथम वैमानिक होण्याचा मान मिळवला त्याच काळात आणखी एक भारतीय वैमानिक विमानात बसून जगप्रवास करत होते आणि गगनाला गवसणी घालत होते हे आपल्याला माहीत आहे काय?

कसं असतं बघा… आपण फक्त सुप्रसिद्ध व्यक्ती लक्षात ठेवतो. परंतु तेवढ्याच तोडीचे कर्तृत्व असणाऱ्या इतरांचा कुठे साधा उल्लेखही होत नाही. त्यांच्याकडे इतकं दुर्लक्ष केलं जातं की हळूहळू इतिहासाच्या पानातून त्यांचे नाव पुसट होत जाते आणि एक दिवस नामशेष होते. मात्र असं होऊ नये म्हणून बोभाटा कायम प्रयत्नशील आहे आणि वेळोवेळी तुम्हाला आम्ही ही फारशी उजेडात न आलेली माहिती देतच असतो. आजही तुम्हाला त्या महान वैमानिकाविषयी सांगणार आहोत ज्याने अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आपले विमान उड्डाणाचे वेड जोपासले… ते होते मुंबईचे वैमानिक पुरुषोत्तम मेघजी काबाली!

एकोणीसशे तीसच्या दशकात विमान उद्योग हळूहळू वेग पकडत होता. याच काळात विमान कंपन्यांनी आपला जगभर विस्तार करण्यास सुरू केला होता. नवनवीन कंपन्या या स्पर्धेत उतरत होत्या आणि वैमानिक अधिकाधिक अंतर कापण्याचे ध्येय पार करत होते. याच काळात आपले भारतीय वैमानिक पुरुषोत्तम मेघजी काबाली हे सुद्धा या स्पर्धेत उतरले. फ्रांस मध्ये जन्मलेल्या जेआरडी टाटांनी विमान उड्डाणाचे भारतीय लायसन्स पहिल्यांदा मिळवले असले तर खरे प्रथम भारतीय वैमानिक मात्र निःसंशयपणे काबाली यांनाच समजावे लागेल. ते कसे ते पुढील माहिती वाचल्यावर आपल्याला कळेलच.

काबाली यांना विमान उडवण्याचे प्रचंड आकर्षण होते. त्यांनी १९३० मध्ये इंग्लंडमध्ये स्वतःचे छोटे विमान Spartan VT-AAT हे खरेदी केले. इंग्लंडमधून त्याकाळी भारताचा हिस्सा असलेल्या कराचीपर्यंत विमान प्रवास करण्याचा त्यांचा मानस होता. इंग्लंड - पॅरिस - रोम - इराण - कराची असा त्यांनी मार्ग ठरवला. अर्थातच त्या काळी ही फार मोठी मजल असल्याने याचा बराच गाजावाजा सुद्धा झाला. काबाली यांनी आपल्या विमानाचे 'Feather of the Dawn' असे बारसे करून टाकले. उड्डाणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी इंग्लंडच्या Croydon शहरात मोठा समारंभ आयोजित केला. या समारंभाला कित्येक मान्यवर उपस्थित होतेच, शिवाय नामांकित कवयित्री, स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडूसुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनी 'Feather of the Dawn' नावाचा कवितासंग्रहसुद्धा नंतर प्रकाशित केला.

अखेर बहुप्रतिक्षित विमानउड्डाण पार पडले… काबालींनी हवेत झेप घेतली! प्रवासाची सुरुवात तर अत्यंत उत्तम झाली. फारश्या काही अडचणी न येता त्यांचा प्रवास पॅरिस, मार्सेलीस, पिसा, रोम, ट्युनिस या शहरांवरून आरामात सुरू होता. पण या प्रवासाला ट्रिपोली (लिबिया)मध्ये विघ्न आले! लिबियाच्या टोबरुक आणि ट्रिपोली या शहरांच्या दरम्यान विमानाला वाळूच्या वादळाचा सामना करावा लागला. या वाळूच्या झंझावातापुढे काबाली यांचे विमान टिकले नाही आणि ते दुर्दैवाने वाळवंटात कोसळले. विमानाचा चक्काचूर झाला. सुदैवाची बाब ही की काबालींना गंभीर जखमा झाल्या नाहीत.

ज्या काळात विमान मिळवणे, ते चालवायला शिकणे आणि उड्डाण करणे याच अशक्यप्राय गोष्टी होत्या, त्या काळात इतक्या मोठ्या अपयशानंतर सर्वसामान्य व्यक्तीने हार मानून विमानाचा नाद सोडला असता… पण हार मानतील ते काबाली कसले? त्यांनी आपल्या तोडक्यामोडक्या विमानाचे सगळे भाग गोळा केले आणि ते ट्रकमध्ये टाकून थेट मुंबई फ्लाईंग क्लबला घेऊन आले. लिबिया ते भारत हा ट्रकचा प्रवास कसा झाला ते अद्याप न उलगडलेले कोडे आहे. भारतात आल्यानंतर काबाली यांनी बी. एम. दमानिया यांच्या देखरेखीखाली आपल्या विमानाची संपूर्ण दुरुस्ती केली. दुरुस्ती झाल्यानंतर परत एकदा Feather of Dawn ने आकाशात भरारी मारण्यास सुरुवात केली. एवढ्या मोठ्या अपघातातून मोडलेले विमान परत दुरुस्त होऊन छानपैकी उडणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल मंडळी.

नंतरच्या काळात काबाली यांनी जुहू येथील 'Air services of India Ltd.' ही खाजगी विमान कंपनी जॉईन केली. या कंपनीत ते पायलट म्हणून काम करत होते. कालांतराने हीच कंपनी पुढे १९५३ मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये विलीन झाली.

तर ही होती भारताचे प्रथम वैमानिक, धाडसी आणि निडर पुरुषोत्तम मेघजी काबाली यांची छोटीशी गोष्ट! आता विचार करा मंडळी... हे वाचल्यानंतर आपल्याला काबाली यांचे नाव माहीत नसावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना? पण त्यात आपलीही काही चूक नाही. जर इतिहास लिखित माध्यमात नोंदवला गेला नाही तर तो पुढील पिढीपर्यंत पोचणार कसा? काबाली यांच्या पराक्रमाची गाथा आपण साहित्यात शोधायला गेलो तर अगदी एक छोटीशी नोंद सापडते. गजानन शंकर खोले यांनी प्रकाशित केलेली 'वैमानिक काबाली' ही पुस्तिका. दुसरीकडे कुठेही या महान वैमानिकाची नोंद नाही. खोले आणि काबाली यांची भेट झाली आणि गप्पा झाल्या त्यावर आधारित हे छोटेखानी पुस्तक प्रकाशित केले गेले होते. आणि हे पुस्तकसुद्धा लहान मुलांच्या गोष्टींच्या स्वरूपाचे आहे. दुर्दैवाने या पुस्तकाची प्रत आता कोठेही उपलब्ध नाही. एकमेव उपलब्ध प्रत आता काबालींची नात गायत्री यांच्याकडे आहे.

काबाली भारतात परत आल्यावर त्यांना भारतात हवाई प्रवासाची कंपनी सुरु करायची होती. पण त्याकाळी विमान प्रवास म्हटला की भारतीयांच्या मनात 'विमान कोसळते' अशी एकच सार्वत्रिक भिती होती. बर्‍याच विचारानंतर काबालींनी एक प्रयोग करायचे ठरवले. त्यांनी मुंबईतल्या अग्रगण्य वृत्तपत्रांच्या पत्रकारांना हवाईप्रवास करण्याचे आमंत्रण दिले. पण त्या छोट्या विमानाने प्रवास करण्याचे धाडस कोणताही पत्रकार करायला तयार नव्हता. एकच पत्रकार याला अपवाद होता ते पत्रकार म्हणजे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक द्वा.भ. कर्णिक. कर्णिक त्यावेळी श्री लोकमान्य या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करत होते. द्वा.भ. कर्णिकांनी काबालींसोबत मुंबई -पुणे -कोल्हापूर असा प्रवास केला. 'चित्ती असो द्यावे समाधान'या त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी पहिल्यावहिल्या हवाई प्रवासाचे त्यांनी वर्णन केले आहे.

या विमानात दोन प्रवाशांची सोय होती. कर्णिक यांचे बंधू पोलीसदलात कामाला होते. स्वभावाने धाडसी असल्याने तेही प्रवासास तयार झाले. त्यांनी कबालींना प्रश्न विचारला की कंपनी सुरु झाल्यावर या हवाई प्रवासाचे तिकीट किती असेल, त्यावर कबालींनी दिडशे रुपये असे उत्तर दिल्यावर त्यांनी आग्रहाने कबालींच्या हातात दिडशे रुपये ठेवले. मुंबईच्या जुहू विमानतळावरून विमान आकाशात झ्रेपावले. विमान फारशा उंचीवरून उडत नसल्याने खाली सह्याद्रीचा आसमंत सहज न्याहाळता येत होता. पुण्याला लोहगाव येथे कर्णिकांचे बंधू उतरून गेले .पाच मिनिटांनी कोल्हापूरचा प्रवास सुरु झाला. सिंहगड, सातारा, भाटघर धरण, महाबळेश्वर यावरून उडतउडत विमान कोल्हापूरला पोहचले. थोडा वेळ चहापाणी झाल्यावर परतीचा प्रवास सुरु झाला आणि रात्र पडण्याच्या आत विमान मुंबईला पोहचले.

काबाली यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानाला सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिल्याचे उल्लेख वाचनात येतात.पण त्याचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या अर्काइव्हमध्ये काबालींच्या पुण्यस्मरणानिमित्त दिलेली जाहिरात आढळते. असे काही उल्लेख वगळाता काबालींचा उल्लेख कुठेही दिसत नाही.

आज ना सरकारला काबालींची आठवण आहे, ना भारतीय नागरिकांना! यावरून आपल्या लक्षात यावे की इतिहासात असे अनेक धाडसी लोक असतील ज्यांनी वेळोवेळी जीवाची बाजी लावून पराक्रम केले असतील. परंतु त्यांची लिखित नोंद नसल्याने किंवा त्यांच्याबद्दल केलेले लिखाण जतन करून न ठेवल्याने आपण त्यांच्याविषयीच्या माहितीला मुकलो आहोत.

लेखक: अनुप कुलकर्णी

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

तोंडातून धूर काढला म्हणून ७ वर्षं जेलची हवा; एका स्पॅनिश खलाशाची अजब गोष्ट!
लाइफस्टाइल

तोंडातून धूर काढला म्हणून ७ वर्षं जेलची हवा; एका स्पॅनिश खलाशाची अजब गोष्ट!

कोलंबससोबत प्रवास करून युरोपमध्ये पहिल्यांदा तंबाखू आणणाऱ्या रॉड्रिगोला तोंडातून धूर काढल्यामुळे चक्क ७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

२३ जुलै, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!
लाइफस्टाइल

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!

ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या प्रयत्नांमुळे १८५६ मध्ये आलेला हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आणि भारतीय स्त्रीच्या हक्कांचा सुरू असलेला संघर्ष.

१६ जुलै, २०२६