एकीकडे आपण वरुणराजा प्रसन्न व्हावा म्हणून मनोभावे सत्यनारायणाची पूजा घालतो,तर दुसरीकडे त्याच पावसाच्या लहरीपणावर कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळण्यासाठी 'डिजिटल अड्डा' तयार करतो. ज्या देशात शेतकऱ्याचे आयुष्य आकाशातील ढगांकडे बघून ठरते, तिथे आता मुंबईत बसलेले पांढरपेशी लोक त्याच ढगांना शेअर बाजारातील एखाद्या 'व्होलाटाईल' स्टॉकप्रमाणे ट्रीट करू लागले आहेत. हे मान्य करायलाच हवं की, भक्ती आणि नफा या एकाच नाण्याच्या दोन टोकाच्या बाजू आपणच मोठ्या खुबीने एकत्र आणल्या आहेत असं म्हणायचं.
पावसाचा सट्टा म्हणजे काय?-नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज (NCDEX) ने नुकताच 'RAINMUMBAI' नावाचा देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार (Rainfall Futures) सुरू केला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, मुंबईत पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार की कमी, यावर आता अधिकृतपणे सट्टा लावता येणार आहे. जून २०२६ च्या पहिल्याच महिन्यात या सट्ट्यात जवळपास २०,००० लॉट्सचा व्यवहार झाला, यावरूनच लोकांची उत्सुकता लक्षात येते.
हे काही तुमच्या-आमच्या गल्लीतला 'मटका' नाही. हा व्यवहार मुंबईच्या सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेतील पावसाच्या आकडेवारीवर आधारित असतो. यात 'क्युम्युलेटिव्ह डेव्हिएशन रेनफॉल' (CDR) नावाचा एक तांत्रिक शब्द वापरला जातो. म्हणजे काय? तर गेल्या ३० वर्षांच्या सरासरी पावसापेक्षा यंदा पाऊस किती इकडे-तिकडे होतो, त्यावर तुमचे नफा-तोटा ठरतात.
मटक्यापासून कमोडिटीपर्यंतचा प्रवास:-आपल्या महाराष्ट्रात जुगाराचा इतिहास मोठा रंजक आहे. आधी गिरणी कामगार पगार झाला की गुपचूप 'मटका' खेळायचे. मग श्रीमंत लोक महालक्ष्मी रेसकोर्सवर घोड्यांच्या टापांवर पैसे लावून स्वतःला प्रतिष्ठित समजायला लागले. काळ बदलला तसा हा जुगार 'लॉटरी'च्या तिकिटातून फिरत फिरत शेअर बाजारात पोहोचला. तिथे फ्युचर्स आणि ऑप्शन्स आले, मग बीट कॉईनची लाट आली.
आता या यादीत 'पावसाचा सट्टा' सामील झालाय. हुशार लोक याला 'रिस्क मॅनेजमेंट' किंवा 'हेजिंग' म्हणतात. पण विचार करण्यासारखं असं की, 'बायको आणि बायकोसारखी' यात जो फरक असतो, तसाच काहीसा फरक अधिकृत कमोडिटी व्यवहार आणि जुगारात असतो.
हे कोणासाठी आहे? हा सट्टा फक्त हौसेपोटी खेळण्यासाठी नाही. याचे काही व्यावहारिक उपयोगही सांगितले जातात:
बांधकाम व्यावसायिक:- पाऊस जास्त झाला की काम थांबतं, नुकसान होतं. ते भरून काढण्यासाठी ते इथे 'बेट' लावू शकतात.
लॉजिस्टिक्स कंपन्या:- मुंबईची तुंबापुरी झाली की वाहतूक ठप्प होते. अशा वेळी हा पावसाचा सट्टा त्यांना आर्थिक संरक्षण देऊ शकतो.
हौशी ट्रेडर्स:- ज्यांना शेअर बाजारात रोज काहीतरी नवीन हवं असतं, त्यांच्यासाठी १५ जूनला झालेला २,०३९ लॉट्सचा व्यवहार हा एक मोठा 'जॅकपॉट' होता.
मुंबईचा पाऊस आणि मराठी मन-मुंबईचा पाऊस म्हणजे केवळ आकडेवारी नाही. तो लोकल ट्रेनच्या विलंबाशी, वडापावच्या गाड्यांवरच्या गर्दीशी आणि ऑफिसला दांडी मारण्याच्या आनंदाशी जोडलेला असतो. आता या पावसात भिजण्यापेक्षा त्याच्या 'डेव्हिएशन'वर पैसे कमावणं हे ऐकायला थोडं कोरडं वाटतं.
आमच्या मते, जेव्हा आपण निसर्गाच्या लहरीपणाला एका 'कॉन्ट्रॅक्ट'मध्ये बसवतो, तेव्हा आपण निसर्गावर विजय मिळवल्याचा भास निर्माण करतो. पण प्रत्यक्षात, वरुणराजा जेव्हा मनावर घेतो, तेव्हा सांताक्रूझ असो वा कुलाबा, तो कोणाचेच 'कॅल्क्युलेशन' चालू देत नाही.
पावसाचा हा नवा सट्टा अधिकृत असला तरी, तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे का? १ मिमी पावसाच्या फरकावर ५० रुपयांचा 'मल्टिप्लायर' आहे. म्हणजे पाऊस १० मिमीने चुकला तर थेट ५०० रुपयांचा फटका किंवा नफा!
जाता जाता विचार करण्यासारखी गोष्ट:-उद्या जर पावसाचा सट्टा खेळून आपण श्रीमंत झालो, तरीही मुंबईत गुडघाभर पाणी साचल्यावर लोकलमध्ये अडकण्याचं नशीब बदलणार आहे का? कदाचित नाही. पण किमान आता खिशात नफा असेल, तर पावसाचा त्रास थोडा कमी 'बोचेल', इतकंच!






