मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

5 मिनिट वाचन

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

शेअर करा:
जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

बॉलीवूडमध्ये हाजी मस्तान, युसूफ पटेल, वरदराजन यांसारख्या स्मगलर्सवर अनेक चित्रपट बनले. पण या गुन्हेगारी साम्राज्याला कायद्याचा खरा धाक दाखवणारे, त्यांच्या छातीत धडकी भरवणारे मुंबई कस्टम्सचे धाडसी अधिकारी जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचे नाव आजच्या पिढीला फारसे माहीत नाही.

२ जुलै १९२२ रोजी जुन्नर तालुक्यातील मंगळूर-पारगाव येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४४ मध्ये ते मुंबई कस्टम्समध्ये शिपाई म्हणून रुजू झाले. विलक्षण निरीक्षणशक्ती, निडर स्वभाव, प्रामाणिकपणा आणि देशभक्ती यांच्या जोरावर त्यांनी पुढील ३४ वर्षांत मुंबईतील स्मगलिंगविरोधी मोहिमेचे नेतृत्व केले.

२० सप्टेंबर १९५७. मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकवर नेहमीप्रमाणे परदेशी जहाजांची ये-जा सुरू होती. त्या काळात परदेशातून भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र त्या दिवशी घडलेली घटना भारतीय कस्टम्सच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली.

मुंबई कस्टम्सचे हवालदार बापू लक्ष्मण लामखडे यांनी कोणत्याही खबऱ्याची माहिती किंवा पूर्वसूचना नसताना केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर तीन चिनी खलाशांवर संशय घेतला. त्यांची कसून चौकशी आणि तपासणी केली असता धक्कादायक सत्य समोर आले.

त्या तिघांनी तब्बल ३०० तोळे सोने आपल्या गुप्तांगामध्ये अत्यंत चलाखीने लपवले होते. त्या काळात अशा प्रकारे सोन्याची तस्करी उघडकीस येण्याची ही पहिलीच नोंद होती. बापू लामखडे यांच्या सतर्कतेमुळे ही मोठी तस्करी हाणून पाडण्यात आली आणि संपूर्ण सोने जप्त करण्यात आले.

या कारवाईने केवळ मुंबईच नव्हे, तर सिंगापूर आणि हाँगकाँगपर्यंतच्या स्मगलिंग नेटवर्कमध्ये मोठी खळबळ उडाली. भारतीय कस्टम्सची दक्षता आणि बापू लामखडे यांच्या तपास कौशल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय तस्करीच्या वर्तुळात होऊ लागली.

या घटनेनंतर बापू लामखडे यांची ओळख केवळ एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याची राहिली नाही, तर तस्करांसाठी ते भीतीचे प्रतीक बनले. पुढील अनेक वर्षे मुंबईतील स्मगलर्स त्यांच्या नावानेच सावध राहत असत.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे बापू लामखडे यांच्या असामान्य निरीक्षणशक्तीची आणि धाडसाची अधिकृत दखल घेण्यात आली. पुढे १९६४ मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय कस्टम्सच्या अधिकृत नोंदींमध्येही त्यांच्या विलक्षण तपास कौशल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

१९६० आणि ७० चे दशक म्हणजे मुंबईतील सोन्याच्या तस्करीचे सुवर्णयुग मानले जाते. या काळात हाजी मस्तान, युसूफ पटेल, वरदराजन मुदलियार आणि इतर अनेक तस्करांनी मुंबईच्या किनारपट्टीवर मजबूत जाळे उभे केले होते. बंदरांमधून सोने, विदेशी घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड आणि इतर मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत होती.

अशा परिस्थितीत मुंबई कस्टम्समधील बापू लक्ष्मण लामखडे हे तस्करांसाठी सर्वात मोठे अडथळे ठरले. त्यांच्या विलक्षण निरीक्षणशक्ती, धाडसी स्वभाव आणि अचूक गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी अनेक तस्करीचे प्रयत्न उधळून लावले. त्यामुळे मुंबईतील प्रमुख स्मगलिंग टोळ्यांच्या हालचालींवर कस्टम्सची प्रभावी नजर राहू लागली.

बापूंची कार्यपद्धती वेगळी होती. ते स्वतः बंदर परिसरात फिरून संशयित व्यक्ती, जहाजे आणि मालाची पाहणी करत. त्यांच्या अचानक धाडींमुळे तस्करांमध्ये कायम भीतीचे वातावरण असे. अनेकदा त्यांच्या उपस्थितीची खबर लागताच तस्कर माल सोडून पळ काढत असत.

समकालीन आठवणींनुसार, बापूंना मुंबईतील अनेक तस्कर, त्यांचे अड्डे आणि त्यांच्या कार्यपद्धतींची सखोल माहिती होती. त्यामुळे मोठ्या स्मगलिंग रॅकेट्सवर वारंवार कारवाई करणे त्यांना शक्य झाले. त्यांच्या धाडसी मोहिमांमुळे मुंबई कस्टम्सचा दबदबा केवळ शहरापुरता मर्यादित राहिला नाही, तर आंतरराष्ट्रीय तस्करीच्या वर्तुळातही त्याची दखल घेतली गेली.

ससून डॉकवरील एक घटना विशेष प्रसिद्ध आहे. पत्रकार प्रमोद नवलकर यांनी आपल्या 'भटक्याची भ्रमंती' या सदरात तिचा उल्लेख केला आहे. एका रात्री ते ससून डॉकजवळ संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून बसले होते. काही वेळात दोन टॅक्सींमधून संशयित व्यक्ती आल्या. वातावरण तणावपूर्ण झाले. तेवढ्यात समुद्राच्या पाण्यातून पूर्ण भिजलेल्या अवस्थेत बापू लामखडे बाहेर आले. त्यांना पाहताच स्मगलर्समध्ये एकच गोंधळ उडाला. "अरे... मुछवाला!" अशी आरोळी देत ते सर्वजण टॅक्सीत बसून पळून गेले. काही वेळाने कस्टम्सचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि समुद्रात लपवून ठेवलेल्या कापडाच्या गाठी बाहेर काढून जप्त करण्यात आल्या.ही घटना बापूंच्या धाडसाबरोबरच त्यांच्या नावाच्या दराऱ्याचेही प्रतीक होती. अनेक वेळा त्यांच्या उपस्थितीची चाहूल लागताच स्मगलर्स माल टाकून पळ काढत असत.

बापू लामखडे यांच्या कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निष्कलंक प्रामाणिकता. त्या काळात अनेक अधिकारी प्रलोभनांना बळी पडल्याच्या चर्चा होत असताना बापूंनी मात्र कोणत्याही दबावाला किंवा आर्थिक आमिषाला कधीही शरण गेले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहकारी अधिकारी, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांच्या मनात विशेष आदर होता.

त्यांच्या अद्वितीय सेवेसाठी १९६४ मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांची जमादार म्हणून पदोन्नती झाली. निधनानंतर १९८० मध्ये त्यांना दुसरा राष्ट्रपती पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला. मुंबई कस्टम्सच्या मुख्यालयासमोरील चौकाला "जमादार बापू लक्ष्मण चौक" असे नाव देण्यात आले.

४ डिसेंबर १९७८ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. साधे राहणीमान, निष्कलंक चारित्र्य, देशासाठी पूर्ण समर्पण आणि प्रलोभनांना कधीही बळी न पडणारा हा अधिकारी आजही भारतीय कस्टम्सच्या इतिहासातील दंतकथा मानला जातो.

त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. गुन्हेगारांचे गौरवीकरण करणाऱ्या कथा आपण ऐकतो; पण देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या अशा खऱ्या नायकांची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख