मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?

3 मिनिट वाचन

कोलकात्याची झणझणीत झालमुरी आणि मुंबईची चटपटीत भेळ; या दोन लोकप्रिय स्ट्रीट फूडचा इतिहास आणि चवींची रंजक तुलना.

शेअर करा:
चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची 'झालमुरी' की मुंबईची 'भेळ'?१९४३ सालचा तो काळ. दुसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली कोलकाता शहर धगधगत होतं. एका गजबजलेल्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका बिहारी मजुराने घाईघाईने चुरमुरे घेतले,त्यात कच्च्या मोहरीच्या तेलाची धार सोडली आणि एका कागदाच्या शंकूत भरून ते एका ब्रिटिश सैनिकाच्या हातात टेकवलं. तो सैनिक पहिला घास घेताच थबकला; त्याला कळेना हे तिखट आहे की झणझणीत, पण ती चव त्याच्या जिभेवर कायमची कोरली गेली.आज ८० वर्षांनंतर पुन्हा एकदा इंटरनेटवर एकच चर्चा सुरू झाली—झालमुरी श्रेष्ठ की आपली मुंबईची भेळ? अवघ्या २४ तासांत त्या व्हिडिओला १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि गुगलवर झालमुरीचा सर्च गेल्या २२ वर्षांतील उच्चांकावर पोहोचला. ही फक्त चुरमुऱ्यांची गोष्ट नाही, तर भारताच्या दोन टोकांच्या संस्कृतीची चुरचुरीत तुलना आहे.*कोलकात्याची झालमुरी म्हणजे एक प्रकारचा 'रॉ' अनुभव असतो. यात चटण्यांचा ओलावा नसतो, तर मोहरीच्या तेलाचा तो उग्र आणि झणझणीत वास असतो जो थेट नाकात शिरतो. झालमुरी बनवताना पिवळ्याधमक मोहरीच्या तेलासोबत 'चनाचूर' (एक प्रकारचं तिखट मिश्रण), भिजवलेले काळे चणे, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर हिरवी मिरची वापरली जाते. झालमुरीचा खरा 'हिरो' म्हणजे त्यातलं मोहरीचं तेल. मोहरीच्या तेलाची ती धार नसेल, तर ती केवळ सुकी भेळ उरते. कोलकात्यात याला 'झाल' (तिखट) आणि 'मुरी' (चुरमुरे) म्हणतात, आणि हे मिश्रण एका डब्यात टाकून ज्या पद्धतीने हलवलं जातं, तो आवाज म्हणजे कोणत्याही खवय्यासाठी संगीतच असतं.दुसरीकडे आपली मुंबईची भेळ म्हणजे एक 'ऑर्गनाइज्ड केऑस' आहे. मुंबईच्या चौपाटीवर मिळणारी ही भेळ म्हणजे गोड चिंचेची चटणी, तिखट हिरवी चटणी आणि झणझणीत लाल चटणी यांचा एक सुंदर संगम असतो. यात शेव आणि पापडीचा इतका भरणा असतो . भेळ बनवताना त्यातला ओलावा महत्त्वाचा असतो. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि वरून पिळलेलं लिंबू... हा सगळा प्रकार म्हणजे जिभेवर होणारा चवींचा स्फोट असतो. झालमुरी जिथे 'झणझणीत' असते, तिथे मुंबईची भेळ 'चटपटीत' असते. खरं सांगायचं तर, झालमुरी ही 'ड्राय' आणि 'कडक' स्वभावाची आहे, तर मुंबईची भेळ ही 'ओली' आणि 'मिश्किल' आहे.*झालमुरीची रेसिपी सोपी वाटत असली तरी मोहरीच्या तेलाचं प्रमाण चुकलं की सगळा खेळ बिघडतो. त्यातलं 'चनाचूर' हे साधं फरसाण नसतं, तर त्यात एक विशिष्ट बंगाली मसाला असतो. आणि आपली भेळ? ती तर प्रत्येक गल्लीत आपला चेहरा बदलते. कुणाला सुकी भेळ आवडते, तर कुणाला चटणीत पोहणारी ओळी भेळ.शेवटी, कोलकात्याची ती मोहरीच्या तेलाची ठसकेबाज झालमुरी असो किंवा मुंबईच्या धावपळीत आधार देणारी ती चटपटीत भेळ, दोन्हीकडे चुरमुरे तेच असतात. फक्त त्यात मिसळलेली संस्कृती वेगळी असते. एकाच धान्याला दोन वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या चवीत कसं बसवलं, हे पाहणं खरोखरच विलक्षण आहे.एका कागदाच्या पुड्यातून मिळणारा हा आनंद कोणत्याही पंचतारांकित हॉटेलच्या डिशपेक्षा मोठा असतो, हेच या चुरमुऱ्यांच्या युद्धाचं खरं यश आहे.तुम्हाला काय वाटतं, कच्च्या मोहरीच्या तेलाचा तो ठसका जास्त भारी की चिंच-गुळाच्या चटणीचा तो गोडवा?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख