मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा
📖मालिका: घोटाळ्यांच्या गोष्टीभाग 16/20 ›

जर्मनीतला ३.५ बिलियन युरोंचा वायरकार्ड घोटाळा!! अथपासून इतिपर्यंत!!

6 मिनिट वाचन
शेअर करा:
जर्मनीतला ३.५ बिलियन युरोंचा वायरकार्ड घोटाळा!! अथपासून इतिपर्यंत!!

भ्रष्टाचार आणि घोटाळे म्हटल्यावर तुम्हाला स्टँप पेपर, कॉमनवेल्थ पासून ते कोलगेट आणि ४जी पर्यंत कितीतरी गोष्टी आठवतील! भ्रष्टाचार ही राजकारण्यांची एक ओळखच बनली आहे. मध्येच एखादी कंपनी येते, लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करून देण्याचे, किंवा त्यांना विमा संरक्षण देण्याचे आमिष दाखवते. मार्केटिंग चेन पद्धतीने कंपनीचा विस्तार होतो, अनेक लोकांनी कंपनीचे एजंट म्हणून काम केलेले असते आणि एके दिवशी कंपनी आपला गाशा गुंडाळून बाजारपेठेतून काढता पाय घेते. दुपटीच्या आमिषाने भरलेले आपले पैसे पाण्यात गेले याची जाणीव होईपर्यंत उशीर झालेला असतो, पण एकदा का कंपनी बुडाली की त्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. असे कित्येक प्रकार तुम्ही ऐकले असतील किंवा तुमच्या आजूबाजूलाही घडले असतील किंवा तुम्ही स्वतःही या प्रकरांना बळी पडला असाल.

तुम्हाला काय वाटतं भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी फक्त आपल्याच देशात जन्म घेतात? असे असेल तर हा तुमचा शुद्ध गैरसमज आहे. जगभरातील कितीतरी देश या समस्येने अक्षरश: पोखरले गेले आहेत. आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच एका महाभ्रष्टाचाराची गोष्ट! ही गोष्ट आपल्या मायभूमीतील नसून सातासमुद्रापलिकडची आहे.

जर्मनीतला ३.५ बिलियन युरोंचा वायरकार्ड घोटाळा!! अथपासून इतिपर्यंत!! – चित्र 1

तर ही कथा आहे जर्मन देशातल्या भ्रष्टाचारची. १९९९ साली जर्मनमध्ये वायरकार्ड नावाची इलेक्ट्रॉनिक पेमेंट ट्रँझाक्शन करणाऱ्या कंपनीची स्थापना झाली. कंपनी प्रगतीच्या शिखरावर पोहोचली तेव्हा तिची किंमत होती, २८ अब्ज डॉलर! जमर्नीतच नाही तर जगभरात कंपनीचा चांगलाच गाजावाजा होता. जमर्नीच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या डीएएक्स स्टॉक इंडेक्समध्ये ज्या ३० कंपन्याचा समावेश असतो त्यात याही कंपनीचा समावेश होता. म्हणजेच अतिशय स्थिरस्थावर आणि प्रतिष्ठित दर्जाची ही कंपनी होती, हे वेगळे सांगायला नको.

गेल्या वर्षी म्हणजेच २५ जून २०२० रोजी कंपनीचे ऑडीटर इ. वाय. यांनी कंपनी एका जागतिक भ्रष्टाचाराची बळी ठरल्याचे सांगत दिवाळखोरी जाहीर केली. आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पेमेंट ट्रँझाक्शन सोबत व्हर्च्युअल कार्ड्स देणाऱ्या या कंपनीने तब्बल ४ अब्ज डॉलरचे कर्ज बुडवले होते. या घोटाळ्याने फक्त जर्मनीच नाही, तर अर्धेअधिक जग हादरून गेले होते. कारण कंपनीने आपले व्यवहार परदेशी बँकासोबत आहे, असे दाखवण्यात यश मिळवले होते.

कंपनी विकली असती तरी तिचे कर्ज फेडणे शक्य झाले नसते. कंपनीच्या या आर्थिक घोटाळ्याबद्दल माध्यमे, पत्रकार आणि आर्थिक सल्लागारांना करणे देता देता, कंपनीच्या नव्या सीईओंची पुरेवाट झाली होती. जर्मनीच्या २०१५ मधील फॉक्सवॅगनच्या डीझेलगेट घोटाळयापेक्षाही हा घोटाळा खूपच मोठा होता. २००० साली अमेरिकन वीज कंपनी एन्रॉनने जो राडा केला होता अगदी तसाच वायरकार्डने जर्मनीत केला होता म्हणून याला जर्मनीचा एन्रॉन म्हटले जाते.

वायरकार्डचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचा अनेक तक्रारी येत होत्या. पण तक्रारदारांचे तोंड बंद करण्यात कंपनीला यश आले. शेवटी २०१९ मध्ये फायनाशिअल टाइम्सने या सगळ्या तक्रारींची सखोल चौकशी करून त्याला वर्तमान पत्रातून प्रसिद्धी दिली. कंपनीने अनेक खोटे ट्रँझाक्शन दाखवून लोकांची आणि आर्थिक सल्लागारांची फसवणूक केल्याचे अनेकदा या प्रसारमाध्यमातून उघड झाले होते. या खोट्या ट्रँझाक्शनमुळे कंपनीचा महसूल आणि फायदा फुगवून दाखवला जात असल्याचेही या प्रसारमाध्यमाने दाखवून दिले होते

जर्मनीतला ३.५ बिलियन युरोंचा वायरकार्ड घोटाळा!! अथपासून इतिपर्यंत!! – चित्र 2

फायनान्शिअल टाइम्सने वेळोवेळी कंपनीच्या आर्थिक व्यवहारातील संदिग्धतेबद्दल उघडपणे लिहिल्यानंतर वायरकार्डने हे सगळे आरोप धुडकावून तर लावलेच उलट फायनान्शिअल टाइम्सवरच त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला.

शेवटी केपीएमजी या अकाऊंटींग फर्मने कंपनीचे आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली. २०१९च्या शेवटी या कंपनीने आपल्या तपासाला सुरुवात केली होती आणि २०२० मध्ये कंपनीने अक्षरश: बॉम्ब टाकला. केपीएमजीच्या तपासात हे उघड झाले होते की कंपनीने दाखवलेला नफ्याचा आकडा म्हणजे निव्वळ फुगवटा असून प्रत्यक्षात कंपनी तोट्यात आहे.आपल्याकडे १.९ अब्ज युरोचा बॅलन्स शिल्लक असल्याचा कंपनीचा दावा होता पण केपीएमजीच्या तपासानुसार ही रक्कम फक्त कागदावर असून प्रत्यक्ष बँकेत मात्र कंपनीच्या नावाने काहीच रक्कम शिल्लक आहे. मग वायरकार्डने आपण आपले पैसे परदेशी बँकेत जमा केल्याचा दावा सुरू केला. वायरकार्डने फिलिपाईन्समधल्या ज्या दोन बँकांची नावे घेतली त्या बँकांनीही कंपनीच्या नावे आपल्याकडे काहीही पैसे जमा नसल्याचे सांगत हात वर केले. फक्त परकीयच नाही, तर खुद्द जर्मनमधील राष्ट्रीय बँकेनेही कंपनीच्या नावाने आपल्याकडे असलेली ठेव अगदी नगण्य असल्याचे म्हटले.

जर्मनीतला ३.५ बिलियन युरोंचा वायरकार्ड घोटाळा!! अथपासून इतिपर्यंत!! – चित्र 3

आता बँकांनीच हात वर केल्यावर कंपनी काय बोलणार? शेवटी १९ जून २०२० रोजी कंपनीने आपण तोट्यात असल्याचे मान्य केले आणि दिवाळखोरी जाहीर केली. कंपनीच्या नवे १.९ अब्ज युरो जमा असल्याचा जो दावा करण्यात येत होता तोही खोटा असल्याचे नंतर कंपनीने मान्य केले. कंपनीचे कार्यकारी अधिकारी ब्राऊन यांना या प्रकरणी २३ जून २०१९ रोजी अटक झाली.

ही दिवाळखोरी जाहीर केल्या नंतर कंपनीचे आर्थिक सल्लागार इ. वाय. यांनी काही खुलासे केले. त्यांच्या मते या घोटाळ्यात कुणा एका व्यक्तीचा हात नसून, अनेक घटकांनी आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा जागतिक पातळीवरचा घोटाळा असल्याचेही इ. वाय. यांचे म्हणणे होते.

जर्मनीतला ३.५ बिलियन युरोंचा वायरकार्ड घोटाळा!! अथपासून इतिपर्यंत!! – चित्र 4

या कंपनीत पैसे गुंतवलेल्या अनेक गुंतवणूक दरांचे नुकसान झाले होते. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे समजताच ग्राहकांचा रोष असामान्य होता.
वायरकार्ड सारख्या कंपन्या येतात, लोकांकडून पैसा गोळा करतात आणि एक दिवस आपली दिवाळखोरी जाहीर करतात. यात समान्य लोकांचा कष्टाचा पैसा अडकलेला असतो. त्यामुळे अशा सामान्य लोकांचा जर आर्थीक कारणावरून संताप उसळले तर फारच महागात पडू शकते. जनतेचा कौल लाक्षात घेत सरकारने अशा कंपन्यांची अगदी सख्त देखरेखी खाली लक्ष ठेवले पाहिजे, असे मत जर्मनीचे मंत्री ओलाफ शोल्झ यांनी व्यक्त केले.

जर्मनचे फेडरल फायनान्शिअल रेग्युलेटरी अथॉरीटी, बाफिन यांनी देखील हा घोटाळा अतिशय मोठा आणि परिणामकारक असल्याचे म्हटले. या प्रकरणात बाफिन यांच्यावरही प्रचंड टीका झाली. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केले असले तरी लोकांचे पैसे बुडाले होते.

बघा, घरोघरी मातीच्या चुली म्हटले जाते.. तसेच आता देशोदेशी आर्थिक घोटाळे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मेघश्री श्रेष्ठी

घोटाळ्यांच्या गोष्टी · भाग 16/20
पुढचा भाग 17एलिझाबेथ होम्सचा एकेकाळची सिलिकॉन व्हॅली स्टार ते फसवणूकीच्या गुन्ह्यात दोषी हा प्रवास!!→← मागचा भाग 15: गुगल आणि फेसबुकला तब्बल ८४४ कोटींचा चुना लावणारा ठग....कसा केला त्याने हा घोटाळा.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख