मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !!

4 मिनिट वाचन
शेअर करा:
लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !!

बाळ आपल्याकडे टक लावून पाहतं तेव्हा आपल्याला त्यात विचित्र असं काही दिसत नाहीं, पण तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर एक गोष्ट दिसून येते. बाळ पापण्यांची उघडझाप न करता आपल्याकडे बघत आहे !! हेच जर कोण्या मोठ्या माणसाने केलं तर आपल्याला ते विचित्र वाटू शकतं, पण लहान बळाने आपल्याकडे टक लावून पाहिल्यास आपल्याला ते छान वाटतं.

तुम्ही कधी विचार केलाय का लहान मुलं पापण्यांची उघडझाप का करत नाहीत ? नाही ? मग चला उत्तर समजून घेऊया.

लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !! – चित्र 1

जवळजवळ १९७० पासून या प्रश्नावर संशोधन सुरु आहे. आजवरच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की मोठी माणसं एका मिनिटात साधारणपणे १० ते १५ वेळा पापण्यांची उघडझाप करतात, तर लहान मुलं एका मिनिटात केवळ २ वेळा पापण्यांची उघडझाप करतात. हे प्रमाण १४ वर्षानंतर वाढतं.

मंडळी, विज्ञानाला आजवर या प्रश्नाचं उत्तर मिळालंनाहीय, पण काही सिद्धांत नक्की आहेत. असे ३ प्रमुख सिद्धांत आपण जाणून घेऊया.

सिद्धांत १.

सिद्धांत १.

आपण डोळ्यांची उघडझाप करतो याचं प्रमुख कारण आहे आपले डोळे हवेच्या संपर्कात येऊन कोरडे होतात. हा कोरडे रोखण्यासाठी आपल्याही नकळत डोळ्यांची उघडझाप होत असते. पहिला सिद्धांत सांगतो की लहानमुलांच्या डोळ्यांना अशा ओलाव्याची गरज नसते, कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा झोपण्यात जात असतो.

लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !! – चित्र 3

हा सिद्धांत काही प्रमाणात मान्य केला गेला आहे, पण त्याला खोडून काढण्यात आलंय. लेघ बेचर नावाच्या संशोधकाने ४ महिन्याच्या ४४ बाळांचा अभ्यास करून असं मत मांडलं की डोळे उघडे राहणे आणि डोळ्यांची उघडझाप होणे यात काहीच संबंध आढळला नाही. नजर वळवतानाच बाळ डोळ्यांची उघडझाप करतं. म्हणजे डोळे कोरडे पडू नये म्हणून डोळ्यांची उघडझाप होते हा सिद्धांत लहान मुलांसाठी चूक ठरतो.

मग ते डोळ्यांची उघडझाप का करतात ? दुसरा सिद्धांत काय म्हणतो बघू.

सिद्धांत २.

सिद्धांत २.

दुसरा सिद्धांत सांगतो की लहान मुलांसाठी त्यांच्या आजूबाजूचं जग नवीन असतं. ते सतत जागरूक असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची उघडझाप कमी होते. लहान मुलांचा मेंदू जागरूक तर असतोच पण बरीच माहिती साठवत असतो. यात खंड पडू नये म्हणून पापण्यांची हालचाल कमीतकमी वेळा होते.

लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !! – चित्र 5

हा सिद्धांत प्रसिद्ध आहे कारण बाळातले हेच गुण मोठ्यांमध्ये पण दिसतात. आपण जेव्हा पूर्ण लक्ष देऊन एखादी गोष्ट करत असतो किंवा काहीतरी ऐकत असतो तेव्हा आपल्या पापण्यांची उघडझाप कमीतकमी वेळा होते. सतत कम्प्युटरवर काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून आलं आहे.

तर, याचा अर्थ लहान बाळाच्या उत्सुकतेमुळे त्याचे डोळे सतत उघडे असतात. आता वळूया तिसऱ्या सिद्धांताकडे.

सिद्धांत ३.

सिद्धांत ३.

तिसरा सिद्धांत हा बाळांच्या मेंदूबद्दल आहे. बाळाच्या मेंदूतील डोपामाईनची कमतरता याला कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. आधी डोपामाईनबद्दल जाणून घेऊया.  

डोपामाईन हे रसायन व्यसानाशी जास्त निगडीत झालं आहे कारण धुम्रपान सारख्या व्यसनातून मेंदूत डोपामाईन स्त्रवत असतो आणि याच कारणाने आपल्याला व्यसन लागतं. पण हे डोपामाईन मेंदूसाठी आवश्यक पण आहे. डोपामाईनने मेंदूच्या पेशी एकमेकांशी संपर्क साधत असतात. शास्त्रीय भाषेत याला न्यूरोट्रान्समिटर म्हटलं जातं

लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !! – चित्र 7

तर आता आपल्या विषयाकडे वळूया. डोपामाईनच्या कमतरतेमुळे डोळ्यांची उघडझाप कमी होते. मोठ्यांमध्ये असं तेव्हा होतं जेव्हा एखाद्याला आजार असेल. म्हणून डोळ्यांची उघडझाप बऱ्याचदा माणसाचं आरोग्य सांगून जाते. लहान बाळांमध्ये त्यांच्या मेंदूतील डोपामाईनचा विभाग अजून पूर्ण विकसित झालेला नसतो, त्यामुळे त्यांच्यात डोळ्यांची उघडझाप फारच कमी असते. लहान बाळांसाठी हे चांगल्या दृष्टीने बघितलं जातं. कारण हा त्यांच्या मेंदूच्या विकासाचा एक भाग असतो.

तर मंडळी, यातला कोणता सिद्धांत तुम्हाला पटतो ?

 

 

आणखी वाचा :

पापण्यांची उघडझाप तुमच्याबद्दल काय सांगत असते ?? जाणून घ्या विज्ञानाचं उत्तर !!

झोपेत बाळ का हसतं ? हे आहे या मागचं वैज्ञानिक कारण !!

डोहाळे जेवण साजरे करण्याच्या ५ वेगवेगळ्या पद्धती

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख