आज बाहेर पडलात की पान टपरीवर उभे रहा.समजा दहा मिनिटात दहा कस्टमर आले तर त्या पैकी नऊजण विमल-बाजीरावची मागणी करतात. एक मोठी पुडी आणि सोबत सुगंधी तंबाखूची छोटी पुडी. एखादाच रजनीगंधा मागतो. तुम्हाला वाटतं गुटका हा नेहमीच गरिबांचा आणि मजुरांचे व्यसन होते? मग तुम्ही चुकताय. ७० आणि ८० च्या दशकात 'पानपराग' खिशात असणं हे एखाद्या महागड्या आयफोन किंवा परफ्यूमसारखं 'स्टेटस सिंबल' मानलं जायचं. मोठ्या पार्ट्यांमध्ये आणि लग्नसमारंभात चांदीच्या तबकातून पानपराग वाटला जायचा.
आज ज्या गुटक्याला आपण रस्त्यावरच्या पिचकारीच्या रूपात पाहतो, त्याची सुरुवात एका उच्चभ्रू 'माउथ फ्रेशनर' म्हणून झाली होती. कानपूरच्या मनसुखभाई कोठारींनी १९७३ मध्ये पानपराग नावाचा ब्रँड बाजारात आणला आणि भारताच्या चघळण्याच्या सवयीला एक वेगळंच वळण मिळालं.
सुरुवातीला पान मसाला म्हणजे सुपारी, कात, चुना आणि वेलची यांचं मिश्रण होतं. त्यात तंबाखू नव्हता. पण ९० च्या दशकात चवीची चटक आणि व्यसनाची पकड मजबूत करण्यासाठी त्यात तंबाखू मिसळण्याची 'फॅशन' आली. इथूनच खऱ्या अर्थाने 'गुटका' या शब्दाचा जन्म झाला.
पानपरागने बाजारात क्रांती केली ती त्यांच्या छोट्या पाऊचमुळे. डब्यातून पाऊचमध्ये आलेल्या या मसाल्याने मध्यमवर्गीयांच्या खिशात जागा मिळवली. पण खरा 'किंग' ठरला तो पुण्याचा माणिकचंद. रसिकलाल धारीवाल यांनी माणिकचंदला केवळ एक ब्रँड नाही, तर एक साम्राज्य बनवलं.
माणिकचंदचा इतिहास जितका ग्लॅमरस आहे, तितकाच तो वादग्रस्तही.फिल्मफेअर अवॉर्ड्स स्पॉन्सर करण्यापासून ते अंडरवर्ल्डपर्यंत या साम्राज्याचे धागेदोरे पोहोचले होते.
या साम्राज्यात जगदीश मोहनलाल जोशी (जे. एम. जोशी) नावाचे एक मास्टर ब्लेंडर होते. नंतर धारीवाल आणि जोशी यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, तो सोडवण्यासाठी थेट दाऊद इब्राहिमची मध्यस्थी लागली.
धारीवाल यांच्यापासून वेगळे झाल्यावर जे. एम. जोशी यांनी 'गोवा' गुटका सुरू केला. नंतर 'सिमला' सारख्या ब्रँड्सनी उत्तर भारतात धुमाकूळ घातला होता. या कंपन्यांमधील कॉर्पोरेट युद्ध आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे गुटका उद्योगाला एक काळी किनार लाभली.
गुटक्याच्या चवीचं गुपित त्याच्या 'काथा'मध्ये असतं. पूर्वी खैर झाडाच्या लाकडापासून बनवलेला शुद्ध कात वापरला जायचा. पण वाढती मागणी आणि झाडांची कत्तल यामुळे काताची किंमत गगनाला भिडली. परिणामी, उत्पादकांनी मलेशिया आणि इंडोनेशियातून आयात होणाऱ्या 'गंबीर' (Gambier) या स्वस्त पर्यायाचा वापर सुरू केला.
गंबीर हा मुळात चामडं कमावण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ आहे.त्यात मोठ्या प्रमाणात जड धातू आणि रसायने असतात. आजच्या गुटक्यात केशर किंवा वेलची नसते,तर त्याऐवजी स्वस्त केमिकल फ्लेवर्स वापरले जातात. १.६ लाख रुपये किलोचं केशर केवळ २३०० रुपयांच्या केमिकलने रिप्लेस केलं जातं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण देशात तंबाखूजन्य पान मसाल्यावर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकेकाळी श्रीमंतीचं लक्षण असलेला हा पदार्थ आज लाखो घरांची राखरांगोळी करत आहे. ग्रामीण भागात गुटक्याचा वापर गेल्या दशकात ५ पटीने वाढला असून, तो आता केवळ व्यसन नाही तर एक आर्थिक आणि आरोग्यविषयक संकट बनला आहे.
ज्या गुटक्याने दाऊदला कराचीत फॅक्टरी टाकायला लावली आणि धारीवाल-जोशींना तुरुंगाची हवा खायला लावली, तो गुटका आज सामान्यांच्या आयुष्यात कर्करोगाचं विष पेरतोय. स्टेटस सिंबल ते सायलेंट किलर हा प्रवास भारताच्या सामाजिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धडा आहे.








