मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मधमाशी फक्त 'मध' देते? हा तुमचा गोड गैरसमज आहे!

3 मिनिट वाचन

मधमाश्या केवळ मध बनवत नाहीत, तर त्या आपल्या अन्नासाठी परागीभवन करतात. त्यांच्याशिवाय मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.

शेअर करा:
मधमाशी फक्त 'मध' देते? हा तुमचा गोड गैरसमज आहे!

तुम्हाला वाटतं मधमाश्या फक्त मध बनवण्यासाठी जन्माला आल्या आहेत? मग तुम्ही विज्ञानाच्या तासाला नक्कीच डुलक्या काढल्या असणार. सरळ सांगतो, मध हे तर मधमाशांच्या कामाचं फक्त एक 'बाय-प्रोडक्ट' आहे. त्यांचं खरं काम, ज्यावर तुमचं आणि आमचं जेवण अवलंबून आहे, ते म्हणजे परागीभवन (Pollination).

आज २० मे, जागतिक मधुमक्षिका दिवस. २०२६ सालची या दिवसाची थीम आहे - 'Bee Together for People and the Planet'. पण मुद्दा असा आहे की, आपण या इवल्याशा जीवाला फक्त मधाच्या बाटलीपुरतंच मर्यादित ठेवलंय. वास्तवात, तुमच्या ताटात येणारा हापूस आंबा असो वा सकाळी घेतलेला कॉफीचा घोट, यामागे या 'अनपेड' मजुराची प्रचंड मेहनत आहे.

आपल्या भारतात जवळपास ८० हून अधिक पिके केवळ मधमाशांच्या परागीभवनामुळे तग धरून आहेत. नारळ, पेरू, सूर्यफूल आणि अगदी तुमची आवडती तूरडाळ सुद्धा! विज्ञानाची कमाल बघा, जर मधमाशा नसत्या तर कॉफीचं उत्पादन २४ टक्क्यांनी घटलं असतं. म्हणजे तुमच्या कॅफिनचा डोस सुद्धा या माशांच्या लहरीवर अवलंबून आहे.

पण एक भीतीदायक सत्य हे की, गेल्या २५ वर्षांत भारतातील मधमाशांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे. हवामान बदल आणि कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे हा 'निसर्गाचा कणा' कमकुवत होतोय. आपल्या महाराष्ट्रात साताऱ्यातील 'मांगघर' हे देशातलं पहिलं 'मधाचं गाव' म्हणून नावारूपाला आलंय, हे अभिमानास्पद आहेच, पण तेवढं पुरेसं नाही.

मधमाशांच्या पोळ्याचं स्ट्रक्चर म्हणजे इंजिनिअरिंगचा अर्क आहे. ते षट्कोनी (Hexagonal) कप्पे उगाच नसतात. त्यामागे गणित असतं - कमीत कमी मेणात जास्तीत जास्त जागा वापरण्याचं तंत्र. या इवल्याशा जीवाला हे भूमितीचं ज्ञान कोण देतं? हे खरोखर अविश्वसनीय आहे!
पोळ्याचं स्ट्रक्चर समजलंच असेल तर सत्तेचं स्ट्रक्चर समजून घेऊया. मधमाश्यांचं पोळं हे मातृसत्ताक पध्दतीने चालतं. राणी माशी मुख्य पदावर असते. नराचं काम केवळ प्रजननात नर म्हणून काम करण्यापुरतच असतं. बाकी सगळे कामगार!!
आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन. मधमाशा एकमेकांशी बोलण्यासाठी चक्क 'डान्स' करतात. इंग्रजी '8' च्या आकारात उडून त्या इतर माशांना मधाची दिशा आणि अंतर सांगतात. याला विज्ञानात 'Waggle Dance' म्हणतात. त्यांच्याकडे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला ओळखणारा एक 'इनबिल्ट होकायंत्र' असतो, ज्याच्या मदतीने त्या मैलोन्मैल प्रवास करून अचूक घरी परततात.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी १.७५ लाख मेट्रिक टन मधाचं उत्पादन झालं. पण मधापेक्षाही मौल्यवान आहे त्यांनी केलेलं परागीभवन. ज्या दिवशी मधमाशी उडणं थांबवेल, त्या दिवशी मानवाचं अन्नसाखळीतलं स्थान धोक्यात येईल. हे मान्य करायलाच हवं की, आपण निसर्गाच्या या सर्वात शिस्तप्रिय सैनिकाला गृहीत धरलंय.

शत्रूपासून पोळ्याचं रक्षण करताना मधमाशी आपला काटा टोचते आणि स्वतःचा जीव देते. हा त्याग फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी असतो. आपण मात्र त्यांच्या कष्टाचा मध चोरतो आणि बदल्यात त्यांना धूर देऊन पळवून लावतो.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी मधमाशी फुलावर बसलेली पाहाल, तेव्हा समजा की ती फक्त स्वतःचं पोट भरत नाहीये, तर तुमच्या उद्याच्या जेवणाची सोय करतेय.

आपल्या बागेत किमान एक असं फुलझाड लावू शकतो का जे या मधमाशांना आमंत्रण देईल?

— डॉ. उदय कोतवाल (संपादन: बोभाटा टीम)

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?
लाइफस्टाइल

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?

महागडे विदेशी फळ असणाऱ्या ॲव्होकॅडोची भारतात वाढती मागणी आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती.

३१ जुलै, २०२६

'काला नमक' म्हणजे मीठ नाही, तर बुद्धांचा 'प्रसाद'; सुगंधी तांदळाची गोष्ट
लाइफस्टाइल

'काला नमक' म्हणजे मीठ नाही, तर बुद्धांचा 'प्रसाद'; सुगंधी तांदळाची गोष्ट

अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेला आणि बुद्धांचा प्रसाद मानला जाणारा उत्तर प्रदेशातील सुगंधी 'काला नमक' तांदूळ.

२५ मे, २०२६

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील
लाइफस्टाइल

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील

शार्क, ससाणा, रानगवा, कोल्हा आणि मुंगी यांच्या नैसर्गिक वृत्तींतून शिकण्यासारख्या ५ यशाच्या प्रभावी मानसिक पद्धती.

१० ऑगस्ट, २०२६