एनकेपी साळवेंनी उतरवला एमसीसीचा माज! २५ जून १९८३ या दिवशी लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये कपिल देव यांनी वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आणि अख्खा भारत आनंदाने वेडा झाला. पण त्याच वेळी लॉर्ड्सच्या एका कोपऱ्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष एन.के.पी. साळवे यांच्या मनात संतापाची आग धुमसत होती. या आगीचं कारण होतं केवळ २ एक्स्ट्रा तिकिटांसाठी झालेला अपमान !! त्या एका अपमानाने क्रिकेटची सत्ता कायमची इंग्लंडकडून हिसकावून आशियाकडे आणली.
गोष्ट अशी आहे की, त्या दिवशी भारताचे एक केंद्रीय मंत्री सिध्दार्थ शंकर रे त्यांच्या पत्नीसह लंडनमध्ये होते आणि त्यांना फायनलचा सामना पाहायचा होता. साळवे यांनी मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) अधिकाऱ्यांकडे फक्त दोन जादा तिकिटांची विनंती केली होती. “आता कोणतेही तिकीट नाही. तुमच्याकडे आहेत तेवढेच,”
असा उद्धट प्रतिसाद त्यांना मिळाला.स्टेडियममध्ये शेकडो खुर्च्या रिकाम्या असूनही, इंग्रजांनी साळवे यांना स्पष्ट शब्दांत "नाही" म्हणून तोंडावर दरवाजा बंद केला. साळवे यांना तो अपमान जिव्हारी लागला आणि त्यांनी तिथेच ठरवलं की, आता हे 'गोरे' लोक जागतिक क्रिकेटवर जी हुकूमत गाजवतायत, ती मोडीत काढायची.
दुसऱ्या दिवशी जेव्हा भारतीय संघ विजयाचा जल्लोष करत होता, तेव्हा साळवे यांनी ठरवलं,१९८७ चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये नाही तर भारतातच होणार. कल्पना करा, तो काळ असा होता की आजवरचे सर्व वर्ल्ड कप फक्त आणि फक्त इंग्लंडमध्येच झाले होते. ऑस्ट्रेलियासारखे देश इंग्लंडचे खंदे समर्थक होते, त्यामुळे इंग्लंडच्या बाहेर वर्ल्ड कप नेणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखं होतं.
पण साळवे हार मानणाऱ्यांमधले नव्हते, त्यांनी आपला मास्टर प्लॅन तयार केला.त्यांनी सर्वात आधी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना नूर खान यांना गाठलं साळवे आणि नूर खान यांच्यात आधीपासूनच चांगले संबंध होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आठवणी काढताना साळवे सहजच म्हणाले—जर हे विश्वचषक सामने भारतात झाले तर किती छान होईल!त्यातूनच पुढचा प्रश्न आपोआप आला “मग पुढचा विश्वचषक आपल्या देशांत का खेळवू नये?”आणि भारताची ताकद आणि पाकिस्तानची साथ मिळाल्यावर आशियाई देशांची एकजूट झाली. पण तरीही आयसीसीमध्ये मतं मिळवण्यासाठी इतर देशांची मनधरणी करणं गरजेचं होतं.
वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इतर छोट्या देशांना साळवे यांनी एक अशी ऑफर दिली जी त्यांना नाकारणं अशक्य होतं. साळवे यांच्या लक्षात आलं होतं की, हे देश आयसीसीकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांवर अवलंबून आहेत. त्यांनी या देशांना सांगितलं की, "जर वर्ल्ड कप भारतात झाला, तर मी तुम्हाला सध्या मिळणाऱ्या बक्षीस रकमेच्या पाच पट जास्त रक्कम आणि वरून कॅश बोनस देईन." ही ऑफर ऐकून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.
आता प्रश्न असा होता की, इतका पैसा येणार कुठून? कारण त्या काळी बीसीसीआयची तिजोरी रिकामी होती. साळवे यांनी थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. इंदिराजींनी साळवे यांची जिद्द पाहिली आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी धीरुभाई अंबानी यांच्याशी चर्चा केली आणि रिलायन्सने या वर्ल्ड कपला स्पॉन्सर करण्याची तयारी दर्शवली.
जुलै १९८४ ची ती ऐतिहासिक बैठक साळवे कधीच विसरू शकले नसते. ते पूर्ण आत्मविश्वासाने आयसीसीच्या बैठकीत गेले आणि त्यांनी तीन मोठे मुद्दे मांडले. पहिला म्हणजे १९८७ चा वर्ल्ड कप भारत आणि पाकिस्तान संयुक्तपणे आयोजित करतील. ऑस्ट्रेलियाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी १९९२ चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात घेण्याचा प्रस्ताव दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इथून पुढे वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी 'रोटेशन पॉलिसी' लागू करण्याची मागणी केली.
इंग्रजांना धक्का बसला होता, पण साळवे यांनी आधीच मतांची जुळवाजुळव केली होती. मतदानात भारताचा विजय झाला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर गेला. १९८७ चा 'रिलायन्स कप' प्रचंड गाजला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटमध्ये पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली.
केवळ दोन तिकिटांचा माज करणाऱ्या इंग्लंडला साळवे यांनी असं काही उत्तर दिलं की, आज जागतिक क्रिकेटच्या टेबलवर भारत जो शब्द बोलेल तो आदरपूर्वक मानला जातो. त्या दिवशी लॉर्ड्सच्या अधिकाऱ्यांनी जर ती दोन तिकिटं दिली असती, तर कदाचित आज क्रिकेटचं सत्ताकेंद्र अजूनही लंडनमध्येच असतं.
एका अपमानाचा बदला कसा घ्यावा, याचं एन.के.पी. साळवे हे जिवंत उदाहरण आहेत. आज आपण जे श्रीमंत बीसीसीआय पाहतोय, त्याची पायाभरणी साळवे यांच्या त्या जिद्दीतून झाली होती.
एका उर्मट नकारामुळे जगातील सर्वात लोकप्रिय खेळाचं भविष्य कायमचं बदललं, यालाच म्हणतात काळाचा महिमा!






