चिकाटी,तंत्र, धैर्य आणि सातत्य म्हणजे सुनिल गावस्कर !आज सुनील गावस्कर यांचा वाढदिवस आहे,वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाचूया सुनील गावस्कर यांचे व्यक्तिचित्रण- छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या शब्दात !
धोबी तलाव येथील सेंट झेवियर्स शाळेत सुनील आणि मी एकत्र शिकत होतो. मी पहिलीत असताना शाळेत आलो, तेव्हा तो दुसरीत होता. पण आम्ही दोघेही एकाच स्कूल बसमधून जायचो. मी पहिल्यांदा चौपाटीला उतरायचो आणि तो नंतर भाटिया हॉस्पिटलच्या जवळ. मला अगदी छान आठवतंय, की तो माझी खूप काळजी घेत असे. बसमधली मोठी मुलं नेहमीच छोट्या मुलांना त्रास द्यायची. सुनील माझी बॅग घ्यायचा, एका कोपऱ्यात नेऊन ठेवायचा आणि माझ्यासाठी जागा अडवायचा. त्याचं हसणं खूप छान होतं, मैत्रीचं होतं. आम्ही मोठे होत गेलो, तशी त्याची आणि त्याचा सर्वात जवळचा मित्र मिलिंद रेगे यांची क्रिकेटमधली आवड आमच्या लक्षात आलेली होती. सुनील 'टाईम्स' आणि 'हॅरिस शील्ड'च्या सामन्यांमध्ये चमकत होता.आमच्या खेळाचे प्रमुख फादर फ्रिट्झ यांचा तर तो खूपच लाडका होता. त्यांचं जणू सगळं अस्तित्त्व या 'लिट्ल मास्टर' भोवती फिरत असायचं. आम्हा सगळ्यांना सुनीलचा अभिमान अशासाठी वाटायचा, की प्रत्येक बक्षीस समारंभांमध्ये सुनीलला अभ्यासासाठीही कसलं ना कसलं तरी बक्षीस असायचंच. माझं तर असं मतच आहे, की सुनीलने कोणतंही क्षेत्र स्वीकारलं असतं, तरीसुद्धा तो त्यात सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला असता.
शाळेनंतर आम्ही दोघांनीही सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याने कला शाखेमध्ये आणि मी सायन्सला.मला तो फारसा भेटेनासा झाला.पण तसा तो कॉलेजातल्या इतरांनाही भेटत नव्हता. त्याचं नाव गाजू लागलं होतं आणि तो मैदानावरचा हीरो बनू लागला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मला तो ताजमध्ये भेटला. त्यावेळी तो क्रिकेटमधला देव बनलेला होता. आम्ही दोघेही आमच्या एका मित्राच्या लग्नासाठी तिथे गेलेलो होतो. त्याच्या भोवती माणसांची गर्दी होती आणि मी त्यापासून जरा लांबच होतो. त्याला मी आठवत तरी असेन का, असा प्रश्न माझ्या मनात होता. अचानक कोणी तरी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली आणि म्हटलं, "कसा आहेस तू गौत्तम ?"
आजतागायत तो मला 'गौतम 'म्हणताना त्याचा उच्चार 'उत्तम' सारखा करतो. नंतर 'लिटास'साठी 'आयोडेक्स'च्या जाहिरातीसाठी मी त्याच्याकडे गेलो, तेव्हा तो अजिबात बदललेला नाही, हे माझ्या लक्षात आलं. 'गेलॉर्डस'मध्ये आम्ही जेवलो आणि जाहिरातीला त्याने अगदी सहजपणे होकार दिला. त्या आधी क्लाईव्ह लॉईड, आल्चिन कालीचरण आणि टोनी ग्रेग यासारख्या क्रिकेटपटूंच्या मला आलेल्या अनुभवाविषयी जाणून घ्यायलाही तो उत्सुक होता. त्यानंतर खूप वर्षांनी सुनीलने त्याचं 'दिग्जॅम'चं शेवटचं कॅम्पेन भी शूट करावं, अशी विनंती केली. तो अनुभव अतिशय छान होता, कारण मी माझ्या जुन्या मित्राचे फोटो काढत होतो. पण मला त्याहीपेक्षा मजा आली, ती काही खाजगी फोटो काढताना. कारण त्यात सुनीलची विविध रूपं मी पकडत होतो, त्याच्या खास विनोदबुद्धीचा अनुभव घेत होतो.'अक्षर प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकासाठी सुनील, पम्मी आणि रोहनचे फोटो काढतानाही मला खूप बरं वाटलं होतं.
सुनीलचं वेगळेपण कशात आहे? त्याचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. त्याचं वाचन चांगलं आहे आणि कोणत्याही विषयावर तो बोलू शकतो. तो क्रिकेटवर फार चर्चा करत नाही. तो त्याचा व्यवसाय आहे आणि त्याबाबतचं आपलं खाजगी मत तो क्वचितच व्यक्त करतो. माझ्या बरोबरीच्या अनेक व्यक्ती म्हणतात, की सुनील आता अतिशय स्वार्थी आणि पैशाचा विचार करणारा झाला आहे. आपला स्वतःचा फायदा असेल अशा कार्यक्रमांना तो हजर असतो, पण अजिबात दानशूरपणा दाखवत नाही. असेलही कदाचित. मात्र साधारण १९८२ - ८३ च्या सुमारास मला आठवतंय, तो मला म्हणाला होता, 'आपण महाराष्ट्रीय लोकांना पैसा समजत नाही. कोणीही आपल्याला सहजी फसवू शकतं आणि आपलं किमान मूल्यही कोणी मोजू पाहत नाही. खेळाडूंचे पैसे वाढवून मागण्यामागे मी काहीही गैर केलं नाही.' आणि मला वाटतं, की कॉमेंटरी असो वा लेखन, तो करत असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी मानधन वाढवून मागण्यात तो गैर करत नसतो. आज सुनीलपेक्षा गुणवत्तेने दसपटीने कमी असलेल्या खेळाडूंना (सचिनचा अपवाद) जाहिराती आणि कार्यक्रमांसाठी सुनीलपेक्षा शंभरपट अधिक पैसे मिळताहेत, मला वाटतं, सुनीलच्या गुणवत्तेच्या मानाने त्याला खूपच कमी मिळालं. मध्यंतरी ब्रेडमनच्या संघाच्या वादावरून कोणी तरी म्हणालं, 'सुनील जणू काही कडवट, मत्सरी आणि सूडबुद्धीने वागू लागलाय असं वाटतं.' मला वाटतं, काही गोष्टी अशा असतात ज्या बदलतात, अधिक चांगल्या होतात आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदा होतो. विक्रम हे मोडण्यासाठीच बनतात. इतरांपेक्षा सुनीलला हे सर्वात जास्त चांगलं माहीत आहे. कारण त्यानेच तर त्याची सुरुवात केलीये. सुनील हुशार आहे, बुद्धिमान आहे. इतिहासात त्याने आपलं स्थान पक्कं केलंय आणि त्याला कोणीही हात लावू शकणार नाहीये. इतर येतील आणि जातील, आणि सुनील आपलं ते मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत असं म्हणणार नाही की, मला माहीतच होतं.




