आजी काल परवाच नव्वदीत पोहचली.आजीने कुटुंबाला दिलेलं प्रेम तिला अगदी चक्रवाढ व्याजाने परत मिळतंय असं म्हटलं तरी चालेल. अगदी चार वर्षांपूर्वी घरात आलेली नातसून पण प्रेमानी आज्जी आज्जी करत आसपास असते. पण आज्जीची एकच गोष्ट तिला आवडत नाही. ती म्हणजे आज्जी डोक्यावर कॅथर्डीन नावाचं तेल थापते. तोच वास तिच्या उशीच्या अभऱ्याला पण खिळलेला असतो.
आता नातसून म्हणजे आजकालची पोर ती , तिनं एक दिवस सांगूनच टाकलं आज्जी ते तेल नका लावू हो ! डोकं विस्कटून जातं माझं त्या वासानी ! दुसरा छानसा ब्रँड आणते मी तुमच्यासाठी !
आज्जी खुदकन हसून म्हणाली अगं,कसलं ब्रँड आणि काय !!
तुला या तेलाची गंमत सांगते.मी लग्न होऊन या घरात आले तेव्हा मी ज्येमतेम ११ वर्षाची होते.आमचे हे म्हणजे तुमचे आजोबा १२ वर्षाचे होते.आमचं लग्न झालं असलं तरी मी रात्री माझ्या सासु जवळच झोपायचे.माझी सासू फारच प्रेमळ होती.आपल्या घरातल्या लोकांना माया लावणं मी तिच्याकडूनच शिकले.मी इकडे सासूच्या कुशीत आणि आमचे हे बाहेर त्यांच्या बाबासोबत !
आणि दोन वर्षांनी मी मोठी झाले म्हणजे माझी पहिली पाळी आली.त्या चार दिवसात माझ्या पोटात भीतीचा गोळा उभा होता पण आमच्या आई ,म्हंजे माझ्या सासूबाई मात्र फारच आनंदात होत्या.
चौथ्या दिवशी आईंनी मला प्रेमानं न्हाऊ घातलं आणि हे तेल डोक्यावर थापलं आणि म्हणाल्या 'बायो आता तू मोठी झालीस बरं ' पण मला बाई काहीच उलगडा होत नव्हता.
मी बसायला लागले याचा आनंद आईंना का होतोय ते मला कळेनाच !
यथावकाश व्हायचा तो उलगडा झाला आणि तुझ्या सासऱ्याचा जन्म झाला.
तेव्हापासून हे तेल डोक्यावर थापतेय आणि आता त्याशिवाय चैन पडत नाही.
मध्ये कधीतरी या तेलाची कंपनी बंद पडायला आली तर तेलच मिळेना. मग काय ? मी गेले तरातरा चालत वरळीला कंपनीच्या हापिसात आणि भांडले तिथे !
नंतर सहा महिने त्या कंपनीचा म्यानेजर घरी बाटल्या आणून द्यायचा !
आता इतकी वर्षं झाली पण रोज या सुगंधाने आईंची आठवण येते !
तुम्ही पोरं आजकाल ते काय ब्रँडिंग वगैरे बडबडत असता ना तेच आहे हे !!








