समजा एका रविवारी सकाळी निवांत चहा पीत असताना तुमच्या ओळखीच्या एका 'सज्जन' माणसाचा फोन येतो. हे गृहस्थ फायनान्स किंवा शेअर मार्केटमध्ये काम करतात एवढीच तुमची त्यांची ओळख असते. गप्पांच्या ओघात ते तुम्हाला विचारतात, "अहो, एक छोटंसं काम करून घरबसल्या बक्कळ पैसे कमवायचे आहेत का?"
आता 'बक्कळ पैसा' आणि 'छोटं काम' हे शब्द ऐकल्यावर कोणाचे कान टवकारणार नाहीत? तुम्ही उत्साहाने विचारता, "नेमकं काय करायचंय?" त्यावर ते अगदी सहजपणे सांगतात, "काही नाही हो, तुमच्या आणि मिसेसच्या बँक खात्यात मी काही पैसे जमा करतो. त्यातले १०-१२ टक्के कमिशन म्हणून तुम्ही ठेवून घ्यायचे आणि उरलेले पैसे मला रोख (Cash) परत द्यायचे. बस, एवढंच!"हे ऐकल्यावर तुम्हाला वाटतं, यात काय मोठं असं? पण थांबा! जर तुम्ही हे काम केलंत, तर समजून जा की तुम्ही नकळत एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचे 'म्यूल' (Mule) बनला आहात. आणि आज नाही तर उद्या, पोलीस तुमच्या दारावर टकटक करणार हे नक्की.
'म्यूल' म्हणजे काय? इंग्रजीत 'Mule' म्हणजे खेचर, जे ओझं वाहण्यासाठी वापरलं जातं. सायबर गुन्हेगारीच्या जगात, गुन्हेगार चोरीचा किंवा फसवणुकीचा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करतात. तुम्ही त्या पैशांचे 'हमाल' बनता आणि त्या बदल्यात तुम्हाला थोडं कमिशन मिळतं. पण कायदेशीर भाषेत याला 'मनी लाँड्रिंग' म्हणतात.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकच्या सायबर क्राईम विभागाने तब्बल ४२,००० 'म्यूल' बँक खात्यांचा पर्दाफाश केला आहे. या खात्यांमधून गेल्या दोन वर्षांत १०० कोटींहून अधिक रुपयांची अफरातफर झाली आहे. इतकंच नाही, तर १४ जानेवारी २०२६ रोजी सुरत पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय टोळीला पकडलं, ज्यांनी २,००० कोटी रुपयांचा काळा पैसा अशाच ४४ 'म्यूल' खात्यांमधून फिरवला होता.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ६ फेब्रुवारी २०२६ च्या मॉनेटरी पॉलिसीमध्ये स्पष्ट केलं आहे की, बँकिंग व्यवस्थेतील हा कचरा साफ करण्यासाठी आता 'MuleHunter.AI' या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान संशयास्पद व्यवहारांचा माग काढून अशा खात्यांना तात्काळ गोठवणार आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अचानक मोठी रक्कम आली आणि तुम्ही ती काढून कोणाला दिली, तर तुम्ही 'म्यूल हंटर'च्या जाळ्यात अलगद अडकणार.
आपल्या महाराष्ट्रातही पुण्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. एका ८५ वर्षांच्या आजोबांची २२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आणि हा सगळा पैसा जन-धन योजनेच्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आला होता. या खात्यांच्या मालकांना वाटलं होतं की आपण फक्त कोणाची तरी मदत करतोय किंवा थोडं कमिशन कमावतोय, पण आज ते पोलीस कोठडीत आहेत.
मंडळी, 'कष्टाविना फळ नाही' ही म्हण जुनी झाली असली तरी ती आजही तितकीच खरी आहे. १०-१२ टक्के कमिशनच्या मोहात पडून स्वतःचं आणि कुटुंबाचं भविष्य धोक्यात घालू नका. आरबीआय सध्या 'KYC – सुरक्षित बँकिंगसाठी तुमचे पहिले पाऊल' या मोहिमेअंतर्गत जनजागृती करत आहे. तुमचे खाते, तुमचे एटीएम कार्ड आणि तुमचे चेकबुक हे तुमचे खाजगी दस्तऐवज आहेत, ते भाड्याने देऊ नका.
कोणीही ओळखीतला माणूस असो किंवा मित्र, जर तो तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करायची मागणी करत असेल, तर त्याला स्पष्ट 'नाही' म्हणा. कारण आज मिळालेले १० हजार रुपये उद्याच्या १० वर्षांच्या तुरुंगवासापेक्षा नक्कीच मोठे नाहीत. शेवटी प्रश्न असा उरतो की, कुणाच्या तरी काळ्या पैशाचं ओझं वाहणारं 'खेचर' बनायचं की सन्मानाने जगायचं? निर्णय तुमचा आहे!






