मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला?

6 मिनिट वाचन
शेअर करा:
आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला?

विमान प्रवास एकेकाळी नवलाईची गोष्ट होती. ती ओसरल्यावर त्यामानाने विमानप्रवास करणारे प्रवासी वाढले, साहजिकच त्याप्रमाणात सुरक्षा घटकांत वाढ न झाल्याने विमान अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्या. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याकाळी विमान अपघातातून कोणीच वाचण्याची शक्यता नसे. आज विमानाचा अपघात जरी झाला तरी वैमानिक आणि प्रवाशांना पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूपपणे परत येण्याची संधी आहे.

पॅराशूट नसण्याच्या काळात विमान अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. वृत्तपत्रे आणि रेडिओवरील विमान अपघाताच्या बातम्या ऐकून कुणीही अस्वस्थ होणारच. फ्रांसचा एक सुप्रसिद्ध टेलर फ्रांझ रॅचेलही विमान कोसळल्याने कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतात हे ऐकून चिंतित झाला होता. यावर काही तरी उपाय शोधला पाहिजे आणि आपण हे करू शकतो असे त्याला वाटले. अर्थात त्याची कल्पना आणि हेतू चांगलाच होता, मात्र त्याचा बेदरकार स्वभाव आणि अतिआत्मविश्वास त्याला असा काही नडला की इतरांचा जीव वाचवण्याच्या हेतूने त्याने बनवलेला पॅराशूट त्याच्यासाठीच काळ ठरला.

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला? – चित्र 1

कोण होता हा फ्रांझ रॅचेल? फ्रांझ रॅचेल हा फ्रान्समधला एक प्रसिद्ध टेलर होता. तो तसा जन्माने ऑस्ट्रियन. त्याचा जन्म १६ ऑक्टोबर १८७८चा. कालांतराने तो पॅरिसमध्ये स्थायिक झाला, त्याने फ्रेंच नागरिकत्व घेतलं आणि तिथेच जगाच्या फॅशन्सची राजधानी- पॅरिसमध्ये टेलरिंगमध्ये खूप नाव कमावले. पण आपल्या हातून अशी एखादी कामगिरी झाली पाहिजे जेणेकरून आपल्या मृत्यूनंतरही लोक आपल्याला लक्षात ठेवतील असे त्याला नेहमी वाटत होते.

आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकांसाठी उपयोगाला येईल असे पॅराशूट आपण बनवूच अशी त्याला पक्की खात्री होती. विमान कोसळताना वैमानिक पॅराशूटच्या साहाय्याने सुखरूपपणे जमिनीवर येऊ शकतील हा त्याचा अंदाज खरा होता. आपली ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी तो कामाला लागला. त्याचं पॅराशूट आजच्या पॅराशूटसारखं नव्हतं. तो अंगात घालायचा वेष होता. वेळ पडल्यास अंगावरच्या कपड्यांनिशी उडी मारताना ते पॅराशूट उघडलं जाईल आणि परिणामी जीव वाचेल अशी फ्रांझची संकल्पना होती. त्याच्या या संकल्पनेमुळे आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अवलंबलेल्या मार्गामुळे त्याला 'फ्लाईंग टेलर' म्हणूनही ओळखलं जातं.

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला? – चित्र 2

१९१० साली त्याने पॅराशूटचा एक ढोबळ साचा तयार केला आणि त्याला यश आले. याच साच्यात थोडी सुधारणा केली की फायनल पॅराशूट तयार झाले असा त्याचा अंदाज होता आणि त्याने आपल्या बेसिक पॅराशूटमध्ये काही बदल केले.

अनेक दिवस तो हे बदल करण्यातच व्यस्त होता आणि शेवटी एकदा त्याचे फायनल मॉडेल तयार झाले. त्याची खात्री होती की आपले पॅराशूट तयार आहे आणि आता त्याची चाचपणी करण्यास हरकत नाही. त्याने अनेक चाचण्या केल्या ,पण त्याच्या पॅरिसच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेणारे डमी हवेत तरंगण्याऐवजी खाली जमिनीवरच पडत. अनेकदा प्रयत्न करूनही त्याने बनवलेले पॅराशूट घालून हवेत उडण्यास यश येत नव्हते.

यावर त्याने आपले पॅराशूट तपासण्याऐवजी थोड्या अधिक उंचीवरून पॅराशूट उडवल्यास ते नक्की उडेल असा कयास केला. त्याने बनवलेल्या पॅराशूटमध्ये काही त्रुटी असतील, त्यावर पुन्हा एकदा काम केले पाहिजे किंवा काही बदल केले पाहिजेत हे त्याला मान्यच नव्हते. उलट जास्त उंचावरून उडी मारल्यास नक्कीच आपले पॅराशूट उडेल असा त्याला विश्वास (की, फाजील विश्वास) होता.

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला? – चित्र 3

जास्त उंचावरून आपल्या या पॅराशूटची चाचणी करण्यासाठी त्याने पोलिसांकडून परवानगी मागितली. त्याच्यामते थोड्या जास्त उंचीवरून उडी मारल्यास पॅराशूटला पुरेशी हवा मिळून ते फुगेल आणि मग ते हवेत तरंगू लागेल. यासाठी त्याला आयफेल टॉवर हे ठिकाण एकदम योग्य वाटले. त्यातच फ्रान्सच्या एअरो क्लबने सुरक्षित पॅराशूट बनवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून तसा पॅराशूट बनवणाऱ्यास १०,००० फ्रँकचे बक्षीस जाहीर केले होते. ही घोषणा ऐकल्यानंतर तर फ्रांझला आणखीनच स्फुरण चढले. आयफेल टॉवर वरून आपल्या पॅराशूटची चाचणी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्याने पॅरिसच्या पोलीसांमागे धोशाच लावला. एक वर्ष त्याने पिच्छा पुरवल्यानंतर शेवटी पोलिसांनी त्याला परवानगी दिली.

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला? – चित्र 4

४ फेब्रुवारी १९१२ रोजी या पॅराशूटची चाचणी करण्याचे ठरले. त्या दिवशी सकाळी सात वाजताच फ्रांझ आयफेल टॉवरवर पोहोचला. त्याने बनवलेला पॅराशूट सूट घालूनच तो आला होता. त्याला तशा वेशात आणि एकट्यालाच आलेला पाहून पोलिसांना तर धक्काच बसला. पोलिसांना अपेक्षा होती की फ्रांझ आपल्यासोबत डमी आणेल. पण तो तर स्वतःच आयफेल टॉवरवरून उडी मारण्याचा पक्का निर्धार करूनच आला होता. त्याला पोलिसांनी, त्याच्या मित्रांनी, पत्रकारांनी खूप समजावले पण त्याने कुणाचेही काहीही ऐकले नाही. शिवाय त्या दिवशीचे वातावरणही एकदम थंड होते आणि जोराचा वारा सुटला होता. त्याच्या मित्रांनी त्याला याची देखील जाणीव करून दिली.
एकदा का मी हवेत उडी घेतली की तुम्हाला कळेलच माझे पॅराशूट कसे उडते. फ्रांझने आपल्या दर्पोक्तीने सर्वांना शांत केले.
शेवटी कुणाचाच काही इलाज चालला नाही तेव्हा फ्रांझ आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर पोहोचला. त्याच्या पॅराशूटची ही चाचणी पाहण्यासाठी त्याने अनेक लोकांना आमंत्रित केले होते. त्यात पोलीस होते, शहराचे शासकीय अधिकारी होते.

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला? – चित्र 5

तो २०० फुट उंचावरून उडी मारण्याचा तयारीत होता. पण खाली जमलेल्या जमावाला त्याची प्रचंड चिंता लागून राहिली होती. फ्रांझने नेमक्या ठिकाणी उभे राहून हवेच्या दिशेचा अंदाज घेतला. आपल्या मित्रांना ‘सी यु सून’ असे म्हणून त्याने स्वतःला हवेत झोकून दिले. फक्त चाळीस सेकंदातच त्याला जाणवले की त्याचे पॅराशूट नीट काम करत नाहीये. त्याला आता आपल्या दुर्दैवी अंताची तीव्रतेने जाणीव झाली. पण त्याच्या हातात काहीच नव्हते. काही वेळेतच त्याचे ते पॅराशूट त्याच्याच शरीराभोवती लपेटले गेले. त्याचे उड्डाण पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचाही श्वास रोखला गेला, कारण आता त्यांनाही फ्रांझचे भविष्य लक्षात आले होते.

आयफेल टॉवरवरुन पॅराशूटची चाचणी घेताना मृत्यू पावलेला उडणारा टेलर-फ्रांझ रेचेल!! पण तो पॅराशूट असूनही कसा मेला? – चित्र 6

काही वेळेतच फ्रांझ बर्फाळ जमिनीवर वेगाने आदळला. त्याचे डोके फुटले, नाका-तोंडातून रक्त वाहू लागले. हात पाय आणि मणक्याची हाडे मोडली होती. आपल्या पॅराशूटमध्येच त्याने शेवटचा श्वास घेतला. गर्दी असूनही त्याला कुणीही वाचवू शकले नाही. फ्रांझचा अति आणि फाजील आत्मविश्वास त्याला फारच नडला होता. पॅराशूटचा शोध लावण्याचा फ्रांझचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला पॅराशूटचा संशोधक म्हणून कुणीही ओळखत नाही. फक्त त्याचा हा दुर्दैवी पराक्रम तेवढा अजूनही चर्चिला जातो.
एका तंत्रात सुधार आणण्यासाठी प्रयत्न करताना तो मृत्यू पावला, पण दुसऱ्या तंत्राने त्याचा हा प्रयोग अजरामर करुन ठेवला. बिटिश पाथे या जगातल्या जुन्या गोष्टींचे व्हिडिओ संकलन करणाऱ्या संस्थेकडे याही घटनेचा व्हिडिओ आहे.

इथे फ्रांझ आधी त्याच्या पॅराशूट सूटमध्ये दिसतो, मग उडी घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय झाले हे सर्व तुम्हांला पाहता येईल. तो पडला तिथे केवढा खड्डा पडला होता हे ही इथे दिसते.

मेघश्री श्रेष्ठी

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

९० वर्षांच्या आजींच्या मृत्यूवर पैसे लावले आणि वकिलाचेच दिवाळे निघाले!
लाइफस्टाइल

९० वर्षांच्या आजींच्या मृत्यूवर पैसे लावले आणि वकिलाचेच दिवाळे निघाले!

जीन कॅलमेंट यांच्या घरावर 'व्हायेजर' करार करणाऱ्या फ्रेंच वकिलाचा अजब डाव कसा उलटला, त्याची रंजक कथा.

१३ ऑगस्ट, २०२६

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?
लाइफस्टाइल

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.

५ ऑगस्ट, २०२६

१५०० एकर जमीन गेली आणि जेवणाच्या टेबलावर जन्मला एक गोड इतिहास: निलॉन्सची रंजक गोष्ट!
लाइफस्टाइल

१५०० एकर जमीन गेली आणि जेवणाच्या टेबलावर जन्मला एक गोड इतिहास: निलॉन्सची रंजक गोष्ट!

१५०० एकर जमीन गमावल्यानंतर संघवी कुटुंबाने शून्यातून विश्व कसं उभं केलं? वाचा निलॉन्सच्या टूटी-फ्रुटी आणि संघर्षाची ही रंजक गोष्ट.

१८ मे, २०२६