computer

एका रात्रीत प्रसिद्ध झालेला हा चहावाला सध्या काय करतोय? त्याच्या आयुष्याने कशी कलाटणी घेतली पाहा !!

कधी कुणाचे नशीब उचल खाईल सांगता येत नाही. कधी कुठे चुकून कुणाचा तरी एक फोटो, व्हिडिओ निघतो तो काही तासांत देशभर पसरतो आणि ती व्यक्ती प्रसिद्ध होते. मग ती प्रसिद्धी सुप्रसिद्धी असते की कुप्रसिद्धी हा भाग वेगळा!! सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे रात्रीत नाव मिळालेल्या लोकांची यादी दिवसेंदिवस मोठी होत आहे. तुम्हांला अशाच एका रात्रीत प्रसिद्ध झालेल्या चहावाल्याची गोष्ट तर आठवत असेलच. फक्त तेव्हा असं रातोरात प्रसिद्ध होणं इतकं 'न्यू नॉर्मल' झालं नव्हतं.

पाकिस्तानात एका चहाची टपरी चालवणारा अर्षद खान!! तो आपल्या टपरीवर चहा बनवून उदरनिर्वाह चालवणारा हा तरुण. आज तो जिथे पोहोचला आहे, त्या ठिकाणी आपण पोहोचू असा विचार त्याने स्वप्नात देखील केला नसेल. २०१६ साली टपरीवर चहा बनवताना त्याचा एक फोटो जिया अली नावाच्या एका फोटोग्राफरने काढला आणि इंटरनेटवर टाकून दिला.

दिसायला देखणा असलेला हा अर्षद एखादा सुपरस्टार शोभावा असा आहे. लोकांना तर एखाद्या मॉडेलने फोटोशूट केला असेल असेच हा फोटो पाहून वाटत होते. त्याची सुंदरता बघून तो साधा चहावाला आहे, यावर लोकांचा विश्वास देखील बसत नव्हता. इंटरनेटवर सगळीकडे त्याची प्रसिद्धी ही 'पाकिस्तानी चहावाला' अशीच झाली.

मात्र इंटरनेटवर प्रसिद्ध होणे जेवढे सोपे झाले आहे, तेवढेच ती प्रसिद्धी टिकवून ठेवणे कठीण आहे. रात्रीत वायरल होऊन मिळालेल्या प्रसिद्धीचा उपयोग करून काहीतरी भरीव काम केलेल्या लोकांची संख्याही तशी कमी आहे.

जगभर प्रसिद्ध झाल्यावर आज चार वर्षांनी अर्षद खान काय करत आहे? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर पठ्ठ्या पाकिस्तानात मॉडेलिंग करायला लागला आहे. काही सिनेमांच्यादेखील ऑफर त्याच्याकडे चालून आल्या होत्या. त्यांच्यावर देखील त्याचे काम सुरू आहे.

मॉडेलिंग आणि सिनेजगतात प्रवेश होऊन देखील त्याने आपले मूळ काम सोडले नाही. त्याच्या चहाच्या टपरीचे रूपांतर त्याने एका मोठ्या कॅफेमध्ये केले आहे. जगभरात आपली ओळख चहावाला म्हणून आहे, हे ओळखून त्याने कॅफेचे नाव देखील 'कॅफे चहावाला रुफटॉप' असेच ठेवले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required