समोर मैलोन् मैल पसरलेला काळाशार डांबरी रस्ता आणि अचानक कानाचे पडदे फाडणारा तो प्रचंड आवाज, क्षणात आकाशातून एक अवाढव्य 'सुखोई-३० एमकेआय' खाली झेपावतं आणि हायवेवर अलगद पाय टेकवतं. टायर आणि डांबराच्या घर्षणामुळे धुराचे लोट हवेत तरंगतात आणि काही सेकंदात ते युद्धविमान धावपट्टी समजून रस्त्यावर धावू लागतं.अवघ्या काही मिनिटांत एका हायवेचं रूपांतर पूर्ण क्षमतेच्या युद्धतळात !!
हे दृश्य एखाद्या हॉलिवूडपटातलं वाटत असलं, तरी भारताच्या अनेक हायवेवर आता हे वास्तव बनलं आहे. याला तांत्रिक भाषेत 'इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी' (ELF) असं म्हणतात.
आसामच्या दिब्रुगडमध्ये नुकताच एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ईशान्य भारताच्या पहिल्या 'इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी'चे (ELF) उद्घाटन झाले. हा केवळ डांबराचा रस्ता नाही, तर भारताच्या संरक्षणाची एक नवी भिंत आहे. दिब्रुगडमधील राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेली ही धावपट्टी ३.५ किलोमीटर लांब आहे.उद्घाटनप्रसंगी भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय आणि सी-१३०जे सुपर हर्क्युलिस या विमानांनी तिथे चित्तथरारक लँडिंग केले.शांततेच्या काळात सामान्य वाहतूकीसाठी बनवलेलेला असा रस्ता युद्धाच्या वेळी भारताचा सर्वात मोठा 'गेमचेंजर' ठरणार आहे.
पण प्रश्न असा पडतो की, ज्या रस्त्यावरून आपली वॅगन-आर किंवा एसटी बस जाते, तिथे ३० टनांचं फायटर जेट कसं काय उतरू शकतं?
युद्धाच्या काळात शत्रूचं पहिलं टार्गेट हे हवाई दलाचे एअरबेस असतात. जर रनवे बॉम्बने उडवून दिला, तर आपली विमानं उडणार कशी आणि उतरणार कुठे? याच रणनीतीचा भाग म्हणून हायवेचा वापर रनवेसारखा केला जातो. पण यासाठी साधा रस्ता चालत नाही, तिथे विज्ञानाची आणि इंजिनिअरिंगची कमाल लागते.
यामागचं कारण समजून घेताना रस्त्याच्या थरांकडे पाहावं लागेल. सामान्य हायवेचे थर हे जड ट्रकचं वजन पेलण्यासाठी बनवलेले असतात. मात्र, जेव्हा एखादं फायटर जेट ताशी २५० ते ३०० किलोमीटर वेगाने जमिनीवर आदळतं, तेव्हा पडणारा 'इम्पॅक्ट लोड' प्रचंड असतो. साधा रस्ता अशा वेळी कागदासारखा फाटू शकतो.हे ईएलएफ पट्टे बनवण्यासाठी सिमेंट-काँक्रीटचा विशेष दर्जा वापरला जातो. सामान्य रस्त्याची जाडी जिथे २०-२५ सेंटीमीटर असते, तिथे या धावपट्टीची जाडी जवळपास दुप्पट असते. या थरांमध्ये स्टीलचं जाळं आणि उच्च दर्जाचं मटेरियल वापरलं जातं, जेणेकरून विमानाचा धक्का सहन होईल.
अशा एका धावपट्टीची लांबी साधारण ३.५ ते ५ किलोमीटर असते. या पट्ट्यात रस्त्याच्या मध्ये दुभाजक (Medians) नसतात. जर असतील, तर ते अशा प्रकारे बनवले जातात की युद्धाच्या वेळी ते काही तासांत हटवता येतील.रस्त्याच्या दोन्ही बाजूला विमानांना वळवण्यासाठी 'पार्किंग बे' सुद्धा तयार केले जातात.
या रस्त्यांवर केवळ विमान उतरत नाही, तर तिथे एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ची यंत्रणाही बसवलेली असते. विमानाला दिशा दाखवण्यासाठी रनवेवर असतात तसे खास दिवे बसवले जातात. विशेष म्हणजे, हे दिवे एरवी जमिनीच्या आत असतात आणि गरज पडेल तेव्हाच बाहेर काढले जातात.
भारताने राजस्थानच्या बारमेरमध्ये पाकिस्तान सीमेजवळ असा प्रयोग यशस्वी केला आहे. याशिवाय पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवरही सुखोई आणि मिराज सारख्या विमानांनी आपली ताकद दाखवली आहे.
ईशान्य भारताची भौगोलिक रचना डोंगराळ आणि कठीण आहे.अशा ठिकाणी मोठे एअरबेस बनवणं कठीण असतं. हे ईशान्य भारतातील अशा प्रकारचे पहिलेच पाऊल आहे.यामागचं मुख्य कारण म्हणजे सेव्हन सिस्टर्स म्हणजे ईशान्य भारतातील सात राज्यांच्या परिसरात अधूनमधून चीनची वाढत जाणार्या दादागिरी आळा घालणे.
ईशान्य भारतात, विशेषतः आसाममध्ये हे होणं सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहेच. यामुळे भारतीय हवाई दलाची पोहोच थेट सीमेपर्यंत वाढली आहे.वस्तुस्थिती अशीही आहे की, हे केवळ युद्धासाठीच नाही तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही वरदान ठरेल. ईशान्येत अनेकदा पूर किंवा भूकंप येतात. अशा वेळी मोठी मालवाहू विमानं या हायवेवर उतरवून तातडीची मदत पोहोचवणं सोपं होईल.
विज्ञानाची कमाल आणि इंजिनिअरिंगचा नमुना असलेल्या या प्रकल्पाने शत्रूला मोठा संदेश दिला आहे. आता भारताचे हायवे केवळ प्रवासासाठी नाहीत, तर ते आकाशातून येणाऱ्या संकटांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. भारताची सुरक्षा आता केवळ सीमेवरच्या जवानांच्या हातात नाही, तर आपल्या पायाखालच्या रस्त्यांमध्येही सामावलेली आहे.देशाच्या संरक्षणाची ही नवी धावपट्टी भारताला खऱ्या अर्थाने 'बॅटल-रेडी' बनवत आहे. शत्रूने कितीही आडाखे बांधले, तरी भारताने आता रस्त्यावरूनच आकाशात झेप घेण्याची तयारी पूर्ण केली आहे.






