स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्या वाढणाऱ्या घराच्या किमती पाहून हे स्वप्नच झालं आहे. शहरातल्या एवढ्याश्या फ्लॅटच्या किंमती पाहिल्या तर एखाद्याला चक्करच येईल. आपल्या परवडणाऱ्या भागात घर पाहिले तरीही बँकेचे कर्ज आणि जमवलेली सगळी रक्कम वापरावी लागते. त्यामुळे घर घेणे हे महाकठीण काम होऊन जाते. पण अवघ्या ८६ रुपयांत इटलीत स्वत:चं घर विकत मिळत असेल तर? खरं वाटत नाही ना! हे घर कुठे आणि कसं खरेदी करायचं याची माहिती वाचून घ्या.
इटलीची (Italy) राजधानी रोमजवळचं असणारं मेन्जा टाऊन (Maenza Town) मध्ये केवळ एक युरोत घर विक्री सुरू आहे. तिथे एका योजनेअंतर्गत ही स्वस्त घरांची विक्री सुरू आहे. शहरातील लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. एका युरोत घरं विक्रिला सुरुवात करणारं मेन्झा टाउन हे पहिलचं शहर आहे. मेन्झा शहराचे महापौर क्लाउडिओ स्पेरदुट्टी यांनी जाहीर केले आहे की मेन्झाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. इथे अनेक दिवसांपासून कोणीही राहत नाही. त्यामुळे लोकांनी परत रहायला यावे आणि हा भाग पहिल्यासारखा गजबजून जावा यासाठी ही अभिनव कल्पना आहे असे म्हणले जातेय.







