भूषण महाराष्ट्राचं ! भूषण गगराणी !!#भूषण_गगराणी -भाग२ लेखिका : उत्तरा मोने
१९९० साली भूषणची या परीक्षेसाठी निवड झाली. जूनमध्ये प्रवेश परीक्षा झाली. ज्यात संपूर्ण भारतातून २ ते ३ लाख मुलं बसली होती. त्यातली फक्त १० हजार मुलं निवडली गेली. किती अधिकारी घ्यायचे याची शासकीय आकडेवारी ठरवली जाते. त्यावर्षी ८५० उमेदवारांची आवश्यकता होती. जेवढे हवे त्याच्या दुप्पट उमेदवारांना निवडलं जातं. मग त्यांच्या मुलाखती आणि वैदयकीय तपासणी केली जाते आणि मग त्या सगळ्यातून शेवटची निवड होते. भूषणची मुलाखत अगदी ४०-४५ मिनिटं चालली होती. त्यांनी मराठी माध्यम निवडलं होतं पण असं असूनही मुलाखतीला मात्र इंग्रजीतून प्रश्न विचारले गेले. ज्याला साहजिकच त्यांनी अस्खलीत इंग्रजीत उत्तरं दिली. मराठी माध्यम निवडण्यामागे भाषेचा प्रश्न त्यांना कधीच नव्हता. पण मराठी साहित्यावर प्रेम होतं, साहित्याची आवड होती. इतिहास आणि मराठी साहित्य हे विषय घ्यायचे पक्के झाले होते. त्यामुळे मराठी माध्यमातून हे विषय अधिक चांगल्या प्रकारे मांडता येतील असा त्यांना विश्वास वाटला होता. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून मराठीतून माहिती मिळवणं मात्र सुरुवातीला थोडं कठीण गेलं. अर्थात IAS होणं ही तशी सोपी गोष्ट नसतेच, पण भूषणनी मात्र ते करून दाखवलं. जे काम हातात घ्यायचं ते नेटाने पूर्ण करायचं हा त्यांचा खाक्या असल्यामुळेच IAS झाल्यानंतरचं ट्रेनिंग असो किंवा त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध पदांवर त्यांनी केलेलं काम असो, दोन्ही गोष्टींत ते यशस्वीच ठरले.
या अधिकाऱ्यांना मिळणारं ट्रेनिंगही तसं खडतरच असतं कारण एकदा कामाची सूत्रं घेतली की, तुम्हाला कुठेही, कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत जाऊन काम करावं लागतं. या ट्रेनिंगमध्ये पोहोणं, घोडेस्वारी, ट्रेकिंग या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. याच दरम्यान भूषणना २२ हजार फुटांवर जावं लागलं होतं. तिथे बर्फाचं खूप मोठं वादळ झालं. ४ तास बर्फात बसून राहावं लागलं होतं. चेहरा लाल काळा झाला होता. आई-वडिलांना ते पाहून काळजी वाटली तर भूषण त्यांना म्हणाले, “जिवंत परत आलो हेच खूप झालं.” अशी अनेक संकटं या कालावधीत समोर येऊन उभी ठाकतात. त्या सगळ्यातून सरावाच्या काळातच मार्गही काढावा लागतो. म्हणजे पुढे मग कामाच्या वेळी अडचणी येत नाहीत.
प्रशासकीय अधिकारी झाल्यावर चंद्रपूर, राजुरा, यवतमाळ, औरंगाबाद, उमरगा, पुणे (क्रीडा महासंचालक), सिंधुदुर्ग (कलेक्टर) आणि गेली ५ वर्षं मुंबईत माहिती आणि जनसंपर्क महासंचालक या पदावर ते काम करत आहेत.
गेली १४ वर्षं प्रशासकीय अधिकारी या नात्याने काम करताना हजारो लोकांच्या संपर्कात यावं लागलं. अनेक गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या आणि लोकांशी बोलताना पहिले अनुभवही उपयोगी पडले; पण हातून चांगल्या गोष्टी घडल्या की त्याचं वेगळंच समाधान मिळतं, असं भूषणना वाटतं. आत्तापर्यंत ग्रामीण भागातून वेगवेगळ्या स्तरांवर त्यांनी काम केलंय. पण त्यातही जिल्हा परिषदेत असताना ग्रामीण विकासाची केलेली कामं, पंचायत राज घटना दुरुस्ती झाल्यावर ग्रामीण भागातल्या जनतेला वैयक्तिक लाभाच्या सरकारी योजनांची दिलेली माहिती या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. कारण जिल्हा परिषदेकडे जनतेच्या फायदयाच्या जवळजवळ २५०-३०० योजना असतात. त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देणं या कामाचं एक वेगळंच समाधान असतं. तसं औरंगाबादमध्ये असताना पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पहिला प्रयत्न केला गेला. आणि जवळजवळ २५-३० वर्षांपासून ज्या गावात पाण्यासाठी टँकर आणावाच लागत होता तिथला टँकर कायमचा बंद झाला. साठवलेलं पाणी ६ महिने, वर्षभर कसं वापरता येईल याचं गावातल्या लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं. मानसिकता बदलली गेली. लोकांना गरज पटवून देऊन त्याचं महत्त्व सांगितलं गेलं. या सगळ्या प्रक्रियेत प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका समन्वयकाचीच असते आणि लोकांच्या सहकार्याशिवाय ही विकास कामं कधीच होत नसतात, हा अनुभवही भूषणना आला.
"पण या सगळ्या कामात शाळेतलं वक्तृत्व कामी आलं," असं भूषण आवर्जून म्हणाले. ते म्हणाले, “काम करताना काही गोष्टी उत्स्फूर्तपणे तुमच्याकडून व्हाव्या लागतात तरच लोकांना त्याचं महत्त्व पटतं आणि वक्तृत्व स्पर्धांमुळे संवादाची सवय होतीच. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्यासाठी वेगळे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. आपण शासनाची बाजू मांडत असलो तरी मनापासून त्यांच्या हिताचंच बोलतोय हे एकदा समोरच्याला पटलं की मग त्या माणसाचं सहकार्य सहज मिळतं. शिवाय आज काम करताना अनेकदा वाचलेले संदर्भ वाचनाची सवय खूप उपयोगी ठरते. "
त्याहीपेक्षा शासकीय चौकटीत राहून आपलं वेगळेपण सिद्ध करत प्रामाणिकपणे आपलं काम करत राहाणं प्रशासकीय अधिकाऱ्याला एक आव्हानच असतं. हे आव्हान पेलताना चांगलंच काम त्यांच्या हातून व्हावं ही आईवडिलांची अपेक्षा भूषणनी आजपर्यंत नक्कीच पाळली आणि याही पुढे ती पाळली जाईल याची सगळ्यांनाच खात्री आहे.
पत्नी शीतल या रेडिओलॉजिस्ट आहेत आणि गोल्ड मेडलिस्टही आहेत. एम्. डी. झाल्यावर FRCAR साठी त्या लंडनलाही
गेल्या होत्या. दोघांची क्षेत्र तशी एकमेकांना पूरक आणि बौद्धिक क्षमताही एकमेकांना अनुकूल असल्यामुळे दोघांचंही एकमेकांना नैतिक पाठबळ पुरेसं मिळतं. त्यांचा मुलगा निसर्ग सध्या ३ रीत आहे, पण त्याचीही हुशारी आत्ताच लक्षात येऊ लागली आहे. बदलत्या काळानुसार त्याच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम निवडलं असलं तरी मराठीची आस त्यालाही आहे आणि आजी-आजोबांनी ती गोडी त्याला विशेष लावलेली आहे.
आज भूषणना महाराष्ट्रात काम करताना मराठीचा निश्चितच खूपच उपयोग झाला असेल. पण सरकारी
यंत्रणा म्हटली की, सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह कायम असतें. सरकारी कामं सहज होत नाहीत किंवा अधिकाऱ्यांकडे संवेदनशीलता नसते असं म्हटलं जातं. प्रशासकीय अधिकारी म्हणून यावर त्यांचं मत घेणं खूप महत्त्वाचं वाटलं.
ते म्हणाले, “यंत्रणेचा व्याप कमी केला पाहिजे तरच अधिक सुसूत्रता येऊ शकते आणि या अधिकाऱ्यांना सुरुवातीला एकदाच ट्रेनिंग दिलं जातं. त्याऐवजी किमान वर्षातून एकदा तरी एथिकल आणि टेक्निकल ट्रेनिंग दयायला हवं, म्हणजे कामाचा दर्जा निश्चित सुधारतो. संवेदनशीलता नाही असं जे म्हटलं जातं त्याही बाबतीत ट्रेनिंगमुळे खूप फरक पडेल. खरं तर शक्य आहे ते सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही नेहमीच केलं पाहिजे. पण या सगळ्यातच जर व्यवस्थित सूचना दिल्या गेल्या तर सगळी कामं व्यवस्थित होतात हा माझा अनुभव आहे.'
""
खरं तर, या क्षेत्राला अनेक दोषारोपांची भीती आहे, याआधीच्या काही उदाहरणांनी काही चुकीच्या सवयीही लागलेल्या आहेत आणि अनेकदा पुढ्यात येणाऱ्या यशाला अपयशाचं गालबोटही लागण्याची शक्यता आहे. पण तरीही या सगळ्या व्यवस्थेत राहून प्रामाणिकपणे चांगले प्रयत्न करणारी फार थोडी माणसं या क्षेत्रात आहेत. त्यापैकी एक भूषण आहेत. अशोक आणि वर्षा गगराणींना याचा अगदी रास्त अभिमान आहे.








