मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग १)

11 मिनिट वाचन

मराठी भाषेतून आयएएस झालेले पहिले अधिकारी भूषण गगराणी यांनी लातूर भूकंपात बजावलेली कामगिरी आणि त्यांच्या प्रशासकीय प्रवासाचा आढावा.

शेअर करा:
भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग १)

भूषण महाराष्ट्राचं ! भूषण गगराणी !! #भूषण_गगराणी -भाग१ लेखिका : उत्तरा मोने
१९९३ सालचा लातूरचा भूकंप. आज इतकी वर्षं होऊनही त्याचं भयावह रूप डोळ्यासमोरून जात नाही. प्रसार माध्यमांमुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत आलेली ही स्थिती प्रत्यक्षात कशी असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण केवळ कल्पना नाही तर प्रत्यक्ष तिथे जाऊन सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी शासनाच्या वतीने ज्यांनी स्वीकारली होती किंवा राज्यातल्या अनेक प्रांतांमधून अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते, शासनाची बाजू सांभाळत जनतेला सुविधा उपलब्ध करून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांना करावं लागतं ते भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS) आणि या अधिकाऱ्यांमध्ये मराठी भाषेतून IAS केलेले पहिले अधिकारी आहेत - भूषण गगराणी
लातूरच्या भूकंपात जवळजवळ एक वर्ष उमरगा इथे राहून तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं, आलेल्या मदतीचं नियोजन करणं, लोकांना धीर देणं, स्वयंसेवी संस्थांना योग्य दिशा देणं. पुढे पुनर्वसनासाठी जागतिक बँकेकडून येणाऱ्या अर्थसाहाय्याला दिशा देणं, जागा शोधणं या सगळ्या कामांसाठी भूषण गगराणी यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. ते जेव्हा या गावात पोहोचले तेव्हा तिथे प्यायला पाणीही नव्हतं. काही दिवस तिथे मदतीला आलेले सगळेच आपापल्या गाड्यांमधून झोपत होते. गगराणींबरोबर आठ ते दहा अधिकारी होते. राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही विभागांकडून ताबडतोब प्रतिसाद मिळाला होता. तसंच अनेक स्वयंसेवी संस्था आपणहून पुढे आल्या होत्या. त्या संस्थांची माणसंही तिथे जमली. या सगळ्यांना उतरण्यासाठी एखादं गोडाऊन किंवा एखादी शाळाही उपलब्ध नव्हती. गावंच्या गावं पुन्हा बांधून काढायची होती. मदतीला आलेल्यांसाठी तंबू बांधले गेले, आलेल्या मदतीचं नियोजन करण्यात आलं. पहिले दोन-तीन महिने हेच सगळं करण्यात वेळ गेला.
अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याची खरी कसोटी लागते. वेळेचं महत्त्व ओळखून त्याप्रमाणे तातडीने व्यवस्था करावी लागते, नियोजन करावं लागतं. बरोबरचा कर्मचारीवर्ग, त्यातले अधिकारी अशा वेळी परिचयाचे असतातच असे नाही. त्यामुळे त्यांच्या कामांची एकमेकांना सवयही नसते. पण अशा आपत्तीत सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचं असतं. लातूरला हे सगळं सुसूत्रपणे होऊ शकलं. सगळ्यांचं टीम वर्क होतंच, पण कुशल व्यवस्थापनासाठी होते भूषण गगराणी.

भूषण गगराणी हे नाव या पूर्वी आपल्या लक्षात आलं होतं ते ग्रामपंचायत पातळीवर त्यांनी केलेल्या कामाच्या अनुषंगाने म्हणजे ग्रामपंचायतीत मालमत्ता आकारणी कशी असावी, तिथला स्टाफिंग पॅटर्न कसा असावा, सरपंचाचं मानधन असावं का आणि ते किती असावं ह्या सगळ्या मुद्दयांसाठी गगराणींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि त्या समितीला 'गगराणी समिती' असे नावही देण्यात आले. एखादा प्रशासकीय अधिकारी आपल्या कार्यकक्षेत अशा प्रकारची महत्त्वाची कामं करत असतो. प्रशासनाच्या कार्यप्रणालीत त्याचा अत्यंत महत्त्वाचा, मोलाचा वाटा असतो. पण सर्वसामान्य माणसांना मात्र तो फारसा परिचयाचा नसतो. अर्थात त्याच्या कामाची दखल शासकीय पातळीवर घेतली जाते, पण त्याला प्रसिद्धी मात्र मिळत नाही.
भूषण म्हणतात, 'आमच्या कामात ते अपेक्षित नाहीच. जसं शिक्षक शिकवण्याचं आपलं काम आपल्या कक्षेत राहून करत असतो त्याप्रमाणे आमचं काम आम्ही करत असतो. आमच्या कामातली काही खाती अशी असतात जिथे प्रसिद्धी आपोआप मिळते. पण जिथे ती अपेक्षित नाही तिथे ती मिळवायचा प्रयत्न केला तर मग प्रसिद्धीची सवय लागते आणि मूळ कामं मागे पडतात. आम्हाला काही विशिष्ट मर्यादेपर्यंत अधिकार दिलेले असतात. त्या अधिकारात राहून केलेल्या कामाची पावती आम्हाला मिळतच असते. आता मी सिंधुदुर्गात जेव्हा कलेक्टर म्हणून काम पाहात होतो तेव्हा तिथल्या मंडळींनी माझ्या कामाला दाद दिलीच. त्यामुळे आपण चांगलं काम केलं तर त्याची नोंद होतेच."

भूषणचे वडील अशोक गगराणी यांचीही भूषणकडून नेहमी चांगल्याच कामाची अपेक्षा आहे. वाईट काही त्याच्या हातून घडू नये असं त्यांना वाटतं. अशोक गगराणी पेशाने शिक्षक. मूळचे राजस्थानचे, महेश्वरी मारवाडी. पण त्यांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात गेल्या. अगदी लहानपणापासून ते कोल्हापुरातच वाढले. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ४ घरं गगराणींची आहेत. मालेगाव, जळगाव, नाशिक आणि कोल्हापूर. अशोकजी जळगावचे. तिथे त्यांची धान्याची दुकानं होती. तिथला सगळा वेळ हा व्यापारातच जात असे. पण ते मात्र त्या व्यापाराच्या व्यापातून बाहेर पडले. आणि शिक्षकी पेशात आले. अशोक, त्यांची पत्नी वर्षा, मुलगा भूषण आणि मुलगी कविता असा त्यांचा संसार. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे जवळजवळ १९९८ पर्यंत ते दोन शाळांतून शिकवायचे. सकाळची शाळा आणि रात्रशाळा. त्यामुळे रात्री घरी यायला उशीर व्हायचा. संध्याकाळी वर्षाताई दोन्ही मुलांना अंबाबाईच्या देवळात न्यायच्या आणि अशोकजी नाईटस्कूलमधून परत आले की सगळे एकदम घरी येत असत. त्या वेळी भाड्याच्या दोन खोल्यांमध्ये ते राहात. त्यांची साहित्यिक मित्रमंडळी खूप होती. अनेक मैफिली त्यांच्या चालायच्या. त्यातही शिवाजी सावंत त्यांचे अगदी खास दोस्त. किंबहुना भूषण शिवाजी सावंतांच्या अंगाखांद्यावर खेळलेले आहेत. तसंच रणजित देसाईंचाही खास घरोबा होता. “भूषण तर लहानपणी त्यांना रंगीत काका म्हणत असे", वर्षाताई कौतुकाने सांगू लागल्या. “त्यांना भूषणला आपल्याबरोबर न्यावंसं वाटत असे. आम्ही न्या म्हटलं की ते एवढे खूश व्हायचे. चॉकलेटच्या बरण्या त्याच्यापुढे करायचे आणि तुला पाहिजे तेवढी चॉकलेट्स घे असं म्हणायचे. "
त्या रंगीत काका म्हणण्यात एक गंमतच होती. शिवाय त्याचा प्रभाव इतका सगळ्यांच्या मनावर होता की, पुढे शिवाजी सावंत यांनी रणजित देसाईंवर जेव्हा लेख लिहिला, तेव्हा त्या लेखाचं शीर्षकही 'रंगीत काका'च दिलं होतं. शिवाजीरावांचं भूषणवर खूप प्रेम. अशोकजी सांगू लागले, "म्हणजे एकदा पुण्याला भूषणला एका स्पर्धेत बक्षीस मिळालं, पण ती स्पर्धा ज्या प्राध्यापकांनी आयोजित केली होती त्यांनी बक्षिसाचे पैसे भूषणला दिलेच नाहीत, तर शिवाजीराव त्याच्या मागे लागले आणि ते पैसे वसूल करून त्यांनी ते भूषणला पाठवून दिले. आता ते पैसे मिळवण्यासाठी त्यांनी दुप्पट पैसेही खर्च केले असतील, पण भूषणच्या बक्षिसाचे पैसे त्याला मिळालेच पाहिजेत हा त्यांचा आग्रह. अशा स्पर्धा भूषणला काही नव्या नव्हत्या. नेहमीच शाळेत किंवा आंतरशालेय स्पर्धांमधून तो पुढेच होता. सध्याचे नामवंत लेखक विश्वास पाटील, अभिराम भडकमकर हे सगळे त्याच्याबरोबर होते. मी मराठी विषय शिकवत असे. त्यामुळे शाळेतली त्याची मराठीची तयारी करण्यापासून सुरुवातीला वक्तृत्व स्पर्धेची तयारी करण्यापर्यंत ते खातं माझ्याकडेच असे. पण अगदी सुरुवातीपासून. वक्तृत्व स्पर्धेच्या विषयाची चर्चा आम्ही करायचो आणि मग आमचं भाषण तयार व्हायचं. मग त्यात काही ग्रामीण ढंगातली बोली मी घालत असे. कारण मी स्वत: ग्रामीण भागातून आलेलो असल्यामुळे मला त्या ढंगाचं आकर्षण होतं. त्यालाही ते पटायचं. असे अनेक विषय आम्ही तयार केले. वक्तृत्व स्पर्धेतली पुढची अनेक बक्षिसं भूषणने पटकावली. जवळजवळ सगळा महाराष्ट्र त्याने पालथा घातला. विश्वास पाटील आणि अभिराम भडकमकरही त्याच्याबरोबर होतेच. भारतीय मुस्लिम समाजातर्फे खूप मोठी वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली. त्यात विश्वास पहिला आला आणि भूषण दुसरा. बहुतेक स्पर्धातून त्यांचा हा पाठशिवणीचा खेळ चालूच होता. अभिराम आणि भूषण १२ वीपर्यंत बरोबरच होते. ते दोघेही अनेक स्पर्धांसाठी गेले. नेहमी गाजणारी रानडे स्पर्धा. त्यातही भूषण पहिला आला. नॉन अलायन्स मूव्हमेंटच्या वतीने ४ राज्यांतून वक्तत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यातही या चारही राज्यांतून भूषण इंग्रजीतून पहिला आला. ८ वी - ९ वीत असताना 'मला आवडलेली वि.स. खांडेकरांची कादंबरी' या विषयावरच्या स्पर्धेतही त्याचं भाषण खूपच गाजलं आणि बक्षीसही मिळालं. या सगळ्या स्पर्धांमधून विषय कोणताही असला तरी भूषण आपलं भाषण अगदी ठासून करायचा. सामाजिक, साहित्यिक विषयांबरोबर आर्थिक विषयावरही तो उत्कृष्ट बोलत असे. "
खरंतर, कोल्हापूरसारख्या ठिकाणी राहूनही स्वत: ला सर्वांगानी विकसित करणं मोठं कठीण काम होतं. पण साहित्यिकांची आणि शिक्षक वडिलांची लाभलेली संगत भूषणना लाभदायक ठरली. अर्थात सगळं शिकून घ्यायची, ज्ञान संपादन करण्याची त्यांचीही तयारी होती. म्हणून तर त्या लहान वयात सर्वगुणसंपन्न भूषण शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता...
तो सगळ्या कलांमध्ये आणि अभ्यासातही नेहमीच पुढे असे. शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमाचं तो उत्कृष्टपणे निवेदन करत असे. समूहगीतात त्याची हजेरी ठरलेलीच. एवढंच नाही तर शाळेतल्या खेळाच्या स्पर्धेत लांब उडीतही तो पहिला आला होता. त्याच छोट्याशा भूषणने आज आयुष्यातली लांब उडीही अगदी यशस्वीपणे मारली आहे.
खेळाची आवड तशी भूषणना शाळेच्या वयापासूनच होती. इतकी आवड होती की, मधल्या सुट्टीतला अगदी थोडासा वेळ मिळाला तरी ग्राऊंडमध्ये धावत जायचं. चपलाही काढून ठेवायचं भान नसे. मग चपला हातात अडकवायच्या आणि फुटबॉल खेळायला लागायचं हे ठरलेलं. तशी ती शाळा लहान असल्यामुळे सगळ्याच गोष्टींना आणि त्यांच्यातल्या नेतृत्वगुणालाही भरपूर वाव तिथे मिळाला. ७वी-८वीत असताना आणि ९ वीत असताना सरचिटणीस ही पदं त्यांनी अगदी मनापासून भूषवली आहेत. तसंच शिक्षक दिनाच्या दिवशी- मुलंच वर्ग घेत असत. भूषणना मात्र मुख्याध्यापक होणं जास्त पसंत असे. मग इतर शिक्षकांचे पाठ घेणं, निरीक्षणं नोंदवहीत नोंदवणं, त्यावर शेरे मारणं हे सगळं अगदी खास आवडीचं काम.

संगीत हाही त्यांचा आवडीचा विषय. विशेषत: जुनं संगीत. पूर्वी दुकानांतून निवडक गाण्यांची कॅसेट भरून देत असत. पण त्यांना द्यायला गाण्यांची अशी यादी लागत असे ज्यात गीतकार, संगीतकार, चित्रपट अशी काही माहितीही लागे. अशा स्वतः तयार केलेल्या अनेक यादया भूषणकडे असत. तिथली काही हॉटेलवाली माणसं, काही दुकानदार त्यांना हवी असलेली गाणी सांगत. मग त्याप्रमाणे भूषण त्यांना यादी बनवून देत असत. कोल्हापूरला त्यांचा छोटासा टेपरेकॉर्डरही होता. तो जरी बिघडला तरी ते स्वतः दुरुस्त करत आणि सतत कॅसेट लावूनच अभ्यास चाले. सैगलची गाणी त्यांना फार आवडायची. कोणतेही गाण्याचे, काव्यवाचनाचे कार्यक्रम असो, भूषण तिथे हजर. अनेक प्रख्यात व्यक्तींचे कार्यक्रम त्यामुळे खूप लहान वयात त्यांनी पाहिलेले आणि ऐकलेले आहेत. वर्षाताई सांगू लागल्या, " त्याबाबतीत तो अगदी नशीबवान आहे. पु.लं. नी सादर केलेलेही अनेक कार्यक्रम त्याने पाहिले आहेत. वि. स. खांडेकर शालेय वक्तृत्व स्पर्धेतल्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाची ढाल तर त्याला कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हस्ते मिळाली. तसंच कॉलेजमध्ये असताना तो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवडला गेला, ते बक्षीसही अजित वाडेकरांच्या हस्ते मिळालं. शिवाय कोल्हापुरातल्या आमच्या सगळ्या साहित्यिक मित्रमंडळांचा लोभ होताच त्याच्यावर.
भूषण नकला फार छान करत असे. लहानपणी आम्ही त्याला गुड्डया म्हणायचो. गुड्ड्या नक्कल कर म्हटलं की, काशीनाथ घाणेकरांपासून सगळ्या कलाकारांच्या नकला होत असत. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरला माझे वडील राहात असत. त्यांचं तिथे सिनेमा थिएटर होतं. तिथे उरूस असला की त्या काळात दिवसरात्र माईक हातात घेऊन हा अखंड बडबड करत राहायचा. लहानपणी तसा तो भयंकर दंगेखोर होता. म्हणजे त्याच्या मस्तीने मला अगदी रडायला यायचं आणि मुलगी मात्र कमालीची शांत. बरं, वडील रात्री उशिरा यायचे. त्यामुळे दोन्ही मुलांच्या गप्पागोष्टी, तक्रारी, राग, समजूत सगळं काही माझ्याकडेच चाले. पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र त्याने मला कधीच त्रास दिला नाही. भाषेची आवड होतीच. त्यामुळे वाचनाची गोडी त्याला आपोआपच लागली. अगदी शाळेपासून त्याला जिवाभावाचे खूप मित्रमैत्रिणी होते. तो जेव्हा आमच्या कोल्हापुरातल्या कॉमर्स कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याला फिशपाँड मिळाला होता 'चश्मेबद्दूर'. पण खरोखरच तो नुसता दिसण्यात चांगला नाही तर स्वभावानेही चांगला आहे. ज्यांना गरज आहे त्यांना आवर्जून मदत करणारा आहे. पण त्याला अगदी लहानपणापासून सरप्राईज देण्याची मात्र फार हौस. अजूनही कधी कधी लहर येते त्याला. जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा एकदा विमानातून उतरला आणि घरी मला फोन केला की, अचानक काम आलंय त्यामुळे मी येऊ शकत नाही. काय करणार, बरं म्हटलं. पण आम्ही मनातून खूप नाराज झाला होतो. कारण तो खूप दिवसांनी घरी येणार होता आणि थोड्याच वेळात अचानक आमच्या पुढ्यात येऊन उभाच राहिला. असं अनेकदा त्याचं सरप्राईज असतं. "
वर्षाताई आणि अशोकजींना असाच एक सुखद धक्का बसला तो भूषणच्या IAS च्या परीक्षेच्या वेळी.. याविषयी त्यांना खात्री होतीच, पण तो महाराष्ट्रात पहिला आणि भारतात तिसरा येईल एवढी खात्री नव्हती.

(दुसरा भाग संध्याकाळी ६ वाजता )

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग २)
लाइफस्टाइल

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग २)

मराठी माध्यमातून आयएएस परीक्षेत यश मिळवणारे भूषण गगराणी यांचा परीक्षेचा अनुभव आणि प्रशिक्षणादरम्यान आलेल्या आव्हानांची गोष्ट.

२१ एप्रिल, २०२६

स्वतःचं भलं करा, तरच पुढची पिढी सुधारेल: तुकोबांचा प्रॅक्टिकल सल्ला
लाइफस्टाइल

स्वतःचं भलं करा, तरच पुढची पिढी सुधारेल: तुकोबांचा प्रॅक्टिकल सल्ला

तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या कॉर्पोरेट युगातील पालकांसाठी आणि तरुणांसाठी एक महत्त्वाचा जीवनपाठ.

२ जून, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६

सिकल सेल: एका जनुकीय आजाराशी भारताचं 'सायलेंट' युद्ध आणि २०४७ चं मिशन
आरोग्य

सिकल सेल: एका जनुकीय आजाराशी भारताचं 'सायलेंट' युद्ध आणि २०४७ चं मिशन

भारतात दरवर्षी हजारो बालकांना ग्रासणारा सिकल सेल अ‍ॅनिमिया आजार, त्याची लक्षणे आणि सरकारच्या निर्मूलन मोहिमेविषयी सविस्तर.

१९ जून, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६