एकदा एका सकाळी वाघाला गाढव भेटलं.
वाघानं त्याला सुप्रभात म्हटल्यावर गाढव खूष झालं आणि म्हणालं 'हो ना, हे आसपासचं निळं गवत बघून मला तर छानच वाटतंय'
वाघाला काही समजेना, तो म्हणाला 'निळं गवत ? गवत तर हिरवंगार आहे'
गाढव म्हणालं 'तुला काय समजतं की नाही,गवत निळंशार आहे'
वाघाला वाटलं आपण गॉगल लावलाय का काय ? त्यानी एकदा पंजा फिरवून बघीतलं.छे , गॉगल तर तो घरीच विसरला होता.
तो गाढवाला म्हणाला तू खरोखर गाढवच आहेस 'गवत हिरवंगार आहे'
गाढव म्हणालं 'अरे बाबा तुझ्यासारख्या मांसाहारी प्राण्याला गवताचा रंग कधी कळणार ? छान निळं निळं गवत आहे'
झालं ! भांडणाची सुरुवात झाली.
गाढव फुरफुरायला लागलं -वाघ गुरगुरायला लागला.
इतक्यात जंगल टिव्हीवर बातम्या लागल्या.
दोघांचही लक्ष तिकडे गेलं .पाच मिनिटं बातम्या बघितल्यावर दोघांचंही एकमत झालं ते असं की आपण न्यायव्यवस्थेकडेच दाद मागायला हवी. !!
आणि दोघही जंगल सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे सिंहाकडे गेले.
सिंह महाराज म्हणाले 'काय म्याटर आहे'
गाढव म्हणालं - 'महाराज, माझं म्हणणं असं आहे की गवत निळ्या रंगाचं आहे आणि वाघ म्हणतोय गवत हिरवंगार आहे'
वाघ काही बोलणार इतक्यात कोर्टानं त्याला थांबवलं आणि गाढवाला विचारलं
'तुमची खात्री आहे की गवत निळ्या रंगाचं आहे ? सिंहानी विचारलं
गाढव म्हणालं 'होय महाराज गवत निळ्या रंगाचंच आहे'
त्यावर कोर्ट म्हणालं 'बरोबर आहे.तुमचं गवत निळ्या रंगाचंच आहे !
गाढवानी आनंदाने दुगाण्या झाडल्या आणि म्हणालं 'गवत निळं आहे हा न्याय झालाच पण माझा अवमान करण्याबद्द्ल वाघाला शिक्षा व्हायला हवी अशी माझी विनंती आहे'
त्यावर कोर्ट म्हणालं'होय.चुकीच्या माहितीवरून झगडा केल्याबद्दल वाघाला दोन दिवस डरकाळी न फोडता गप्प राहण्याचा आदेश हे कोर्ट देत आहे'.
असं म्हटल्यावर गाढव आनंदानी गवत निळंच आहे अशी गर्जना करत थयथय नाचत पळत निघून गेलं !
इतका वेळ गप्प उभं राहून रागाने थरथरणार्या वाघाला गाढव गेल्यावर वाचा फुटली आणि ते सिंहाला म्हणालं
'महाराज, तुम्ही उत्तम न्यायाधीश आहात पण तुम्ही मला बाजू मांडण्याची संधी न देता थेट शिक्षाच फर्मावली ,असं का बरं ?
त्यावर सिंह म्हणाला -
'तुला माहिती आहे ते गाढव आहे. त्याला सत्य परिस्थिती डोळ्यासमोर असूनही कधीच दिसणार नाही.त्याच्या मेंदूत सत्य स्विकारण्याची कुवत नाही.समोर दिसणारे सत्य पुराव्यासकट दाखवले तरीही ते ग्राह्य समजण्याची त्याची क्षमता नाही.त्याला जे हवं तेच सत्य आहे असं त्याला वाटतं. त्यामुळे वाद घालणं हा एकच उपाय त्याला दिसतो. जे केवळ कल्पनेत आहे तेच सत्य आहे आणि तेच सत्य इतरांनी स्विकारावे असाच त्याचा आग्रह आहे. हे सगळं काही तुला माहिती आहे. तरीही त्या मूर्ख गाढवाला कोर्टापर्यंत येण्याची संधी तू दिलीस म्हणून एक दिवसाची शिक्षा आणि जेव्हा मूर्ख गर्जना करत असतात तेव्हा शहाण्यांनी कान बंद करून तिथून निघून जायचं असतं हे तत्व तुझ्या कायम लक्षात रहावं म्हणून दुसर्या दिवसाची शिक्षा तुला भोगायची आहे'
'लक्षात ठेव आता इंग्रजीत सांगतो when ignorance screams intelligence moves on'






