मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आखाती युध्द आणि शेजारच्या काकूंचा 'सिलेंडर' प्लॅन!

3 मिनिट वाचन

आखाती देशात युद्ध सुरू झालं की आपल्या गल्लीतल्या कट्ट्यावर काय चर्चा रंगतात? वाचा या गमतीशीर प्रतिक्रिया.

शेअर करा:
आखाती युध्द आणि शेजारच्या काकूंचा 'सिलेंडर' प्लॅन!

कल्पना करा, टीव्हीवर 'ब्रेकिंग न्यूज'चा लाल पट्टा धावतोय, दुबई-अबू धाबीवर क्षेपणास्त्रं पडल्याच्या बातम्या येत आहेत आणि इकडे आपल्या गल्लीतल्या कट्ट्यावर मात्र वेगळंच 'स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग' सुरू आहे. जागतिक राजकारण एका बाजूला आणि आपल्या लोकांचे तर्क-वितर्क दुसऱ्या बाजूला! आखाती देशात ठिणगी पडली की आपल्याकडे पेटणारे हे 'वैचारिक बॉम्ब' नेमके कसे असतात, ते एकदा बघाच.

# १. ज्योतिषीकाकांचा 'चंद्रग्रहण' पॅटर्न:
शेजारचे ज्योतिषीकाका गेल्या सहा महिन्यांपासून वधु-वर सूचक मंडळाच्या जाहिरातींऐवजी आकाशाकडे बघून सुस्कारे सोडत होते. आता युद्ध सुरू झाल्याची बातमी येताच, उद्या सकाळी ते गल्लीतल्या प्रत्येक माणसाला अडवून एकच वाक्य म्हणणार - "बघा, बघा, मी सांगत होतो ना? चंद्रग्रहणाच्या आसपास काहीतरी मोsठ्ठी गडबड होणार, हे मी आधीच लिहून ठेवलं होतं!" ग्रहांच्या हालचाली आणि इराणची क्षेपणास्त्रं यांचा काय संबंध आहे, हे फक्त काकांनाच माहिती. पण त्यांच्या चेहऱ्यावर 'मी आधीच सांगितलं होतं' असा जो काही विजयी भाव असतो, त्यापुढे पेंटागॉनचे अधिकारीही फिके पडतील.

# २. सिलेंडरवाल्या काकू आणि 'झोम्याटीण' शेजारीण:
बातम्यांमध्ये तेलाच्या किमती वाढणार हे ऐकताच घरातल्या गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे. काकू फोनवर कोणाशीतरी कुजबुजतायत, "मी तर बाई कालच दोन सिलेंडर मागवून ठेवलेत आणि लागलंच तर एक एक्स्ट्रा आहेच शेजारणीचं!" आता यात गंमत अशी की, त्या शेजारणीला 'झोम्याटीण' (झोमॅटोवरून जेवण मागवणारी) असं पदवीदानही काकूंनीच केलंय. "नाहीतरी लागतंय कशाला तिला गॅस, दिवसभर तर त्या झोमॅटोवाल्याचेच डबे येतात तिच्याकडे!" युद्ध तिकडे आखातात होतंय, पण इकडे सिलेंडरच्या साठवणुकीवरून शीतयुद्ध सुरू झालंय.

# ३. एपस्टिन बॉम्ब आणि सार्वजनिक प्रवक्ता:
आपल्या गल्लीत एक असा माणूस असतो ज्याला जगातील सर्व गुप्त संघटनांची माहिती असते. सध्या ते 'सार्वजनिक प्रवक्ता' म्हणून मिरवतायत. त्यांचं म्हणणं साधं आहे, "जो अ‍ॅटमबॉम्बला घाबरत नाय, तो एपस्टिन बाँबला घाबरतो!" सध्याच्या बातम्यांमध्ये जे 'एपस्टिन फाईल्स'चे धमाके होतायत, त्याने मोठ्या नेत्यांची झोप उडाली आहे, असं त्यांचं ठाम मत. क्षेपणास्त्रांपेक्षा या फाईल्समध्ये कोणाकोणाची नावं आहेत, याचीच चर्चा गल्लीतल्या पारावर जास्त रंगतेय. ही गोष्ट इथे संपत नाही, युद्धाच्या धुरापेक्षा स्कँडलचा धूर जास्त डोळ्यात जातोय, हेच खरं!

# ४. 'पेट्रोल' फ्री तत्वज्ञान आणि नोबेल पुरस्कार:
गल्लीतल्या तरुणांचा एक वेगळाच गट आहे, जो एकदम निवांत असतो. पेट्रोलच्या किमती वाढणार म्हटल्यावर एखादा हुशार मित्र म्हणतोच, "आपण लक्की आहोत भावा - आपण काय पेट्रोल पीत नाय!" आता गाडीत पेट्रोल लागतं हे विसरून तो माणूस ज्या आत्मविश्वासाने हे बोलतो, ते पाहून डोकं खाजवावंसं वाटतं. बरं, एवढ्यावरच थांबतील तर ते भारतीय कसले? "पण मी काय बोलतो, देऊन टाकायचा ना त्याला एकदाचा नोबेल शांतता पुरस्कार! सगळ्या भानगडीच बंद झाल्या असत्या!" एखाद्याला मेडल दिलं की तो युद्ध थांबवेल, इतका निरागस (किंवा घातक) विश्वास फक्त आपल्याकडेच पाहायला मिळतो.

ऐका तर, जगभरात काय चाललंय यापेक्षा आपल्या शेजारी काय 'प्लॅनिंग' होतंय, यातच खरी गंमत असते. युद्धाच्या बातम्या तर येतच राहतील, पण या गल्लीतल्या चर्चा कधीच थांबणार नाहीत. तुमच्याही बिल्डिंगमध्ये असे 'तज्ज्ञ' असतीलच ना?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गूगलला टक्कर देणारा भारतीय तरुण: अरविंद श्रीनिवास आणि पर्प्लेक्सिटी
विज्ञान

गूगलला टक्कर देणारा भारतीय तरुण: अरविंद श्रीनिवास आणि पर्प्लेक्सिटी

सर्च रिझल्ट्सच्या जागी थेट अचूक उत्तरे देणारे 'पर्प्लेक्सिटी एआय' उभारणाऱ्या अरविंद श्रीनिवास यांची यशोगाथा.

१० ऑगस्ट, २०२६

एन.के.पी. साळवेंनी असा उतरवला इंग्रजांचा माज आणि भारतात आणला वर्ल्ड कप!
क्रीडा

एन.के.पी. साळवेंनी असा उतरवला इंग्रजांचा माज आणि भारतात आणला वर्ल्ड कप!

१९८३ च्या वर्ल्ड कप फायनलवेळी झालेल्या एका अपमानाचा बदला एन.के.पी. साळवेंनी कसा घेतला, याची ही रंजक कथा.

९ मार्च, २०२६

एका डोळ्याने पाहिलेलं आयएएसचं स्वप्न: कॅन्सर आणि यूपीएससीविरुद्ध संजय डहरियाचा लढा
लाइफस्टाइल

एका डोळ्याने पाहिलेलं आयएएसचं स्वप्न: कॅन्सर आणि यूपीएससीविरुद्ध संजय डहरियाचा लढा

पॅरोटिड कॅन्सरशी झुंज देत, चार शस्त्रक्रिया सहन करत तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या संजय डहरियाची गाथा.

३० जून, २०२६