मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुलांच्या विष्ठेवर ऑटिझमचे संशोधन: एक अनोखा वैज्ञानिक प्रयोग!

6 मिनिट वाचन

लहान मुलांच्या विष्ठेतील सूक्ष्मजीवांचा वापर करून ऑटिझमवर उपचार शोधण्यासाठी हैदराबादमध्ये सुरू असलेले अनोखे संशोधन.

शेअर करा:
मुलांच्या विष्ठेवर ऑटिझमचे संशोधन: एक अनोखा वैज्ञानिक प्रयोग!

तुमच्या बाळाची 'शी' आम्हाला द्या आणि महिना रुपये २०००० पर्यंत 'प्रोत्साहन रक्कम ' मिळवा.कालच पेपरातली ही जाहिरात वाचली. जाहिरात वाचल्यावर आधी ' यक्क... ' असाच शब्द बाहेर पडला.नंतर काही वेळानी पुन्हा एकदा जाहिरात वाचली आणि लक्षात आलं की हा एक वैज्ञानीक प्रयोग आहे.त्यानंतर अधिक माहितीसाठी त्या कंपनीची वेब साईट चाळली आणि असं कळलं की लहान मुलांच्या 'ऑटिस्टिक' म्हणजे स्वमग्नता या विकारावर ही कंपनी उपयुक्त संशोधन करते आहे. आता हाच विषय आपण समजून घेऊ या !

पहिला प्रश्न : ऑटिझम म्हणजे नेमकं काय ?

ऑटिझम म्हणजे Autism Spectrum Disorder (ASD)—मेंदूच्या विकासाशी संबंधित एक अवस्था. यात मुलाच्या संवाद करण्याची पद्धत, सामाजिक संबंध, वर्तन आणि आजूबाजूच्या जगाचा अनुभव घेण्याची पद्धत इतर मुलांपेक्षा वेगळी असते.

काही मुलांना बोलण्यात किंवा भावना व्यक्त करण्यात अडचण येते; काही मुलं एखाद्या विशिष्ट विषयात विलक्षण रस दाखवतात; तर काहींना आवाज, प्रकाश, स्पर्श किंवा बदल सहन करण्यात संवेदनशीलता जाणवू शकते.

महत्त्वाचं म्हणजे ऑटिझम हा आजार किंवा पालकांच्या संगोपनातील चूक नाही.ऑटिस्टिक मुलाची वैशिष्ट्ये, क्षमता आणि गरजा वेगवेगळ्या असतात.

ऑटिझम समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे—“तो वेगळा आहे” एवढ्यावर न थांबता, “तो जगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो” हे समजून घेणे.

घरातलं एखादं तीन-चार वर्षांचं मूल नुकतंच उठलं आहे. आई त्याला नाश्ता देते. मूल खेळतं, धावतं, हसतं… आणि काही वेळाने अगदी सहजपणे टॉयलेटमध्ये जातं. रोजच्या आयुष्यातली ही साधीशी गोष्ट.पण आता वैद्यकीय संशोधनाच्या प्रयोगशाळेत याच प्रक्रियेकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जात आहे.

कारण त्या छोट्याशा शरीरातून बाहेर पडणाऱ्या 'शी 'मध्ये असतात अब्जावधी सूक्ष्मजीव—बॅक्टेरिया,त्यांचे जनुकीय घटक आणि इतर सूक्ष्मजीव. त्यांची 'शी' काही रुग्णांसाठी वैद्यकीय संशोधनाची महत्त्वाची सामग्री ठरू शकते.

म्हणूनच हैद्राबादच्या Resplice Institute कडून ३ ते १२ वर्षे वयोगटातील निरोगी मुलांच्या स्टूलच्या नमुन्यांसाठी दात्यांचा शोध घेतला जात आहे. पात्र दात्यांच्या कुटुंबांना महिन्याला २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिलं जाऊ शकतं, अशी माहिती संस्थेने दिली आहे.

हे ऐकायला ऐकायला विचित्र वाटतं. “त्या" सॅम्पलसाठी पैसे?” पण या मागे आहे आधुनिक वैद्यकातील एक वेगाने विकसित होत असलेलं क्षेत्र—Faecal Microbiota Transplantation अर्थात FMT.फीकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन

FMT म्हणजे साध्या भाषेत, निरोगी आणि काळजीपूर्वक तपासलेल्या दात्याकडून मिळालेल्या स्टूलमधील उपयुक्त सूक्ष्मजीव प्रक्रिया करून दुसऱ्या व्यक्तीच्या पचनसंस्थेत पोहोचवण्याची पद्धत.उद्देश स्टूल पोहोचवणे हा नसतो; उद्देश असतो बिघडलेलं gut microbiome पुन्हा संतुलित करण्याचा प्रयत्न करणे.

आपल्या आतड्यांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव राहतात. त्यांना एकत्रितपणे gut microbiome म्हटलं जातं. पचनक्रिया, प्रतिकारशक्ती आणि शरीरातील विविध जैवरासायनिक प्रक्रियांशी त्यांचा संबंध आहे.

विशिष्ट परिस्थितींमध्ये FMT हा उपचाराचा किंवा संशोधनाचा विषय बनतो.अनेक आजारांसाठी, विशेषतः न्यूरोलॉजिकल किंवा वर्तणुकीशी संबंधित स्थितींसाठी, त्याची परिणामकारकता अजून संशोधनाच्या टप्प्यात आहे. आणि इथेच येतो gut-brain axis—आतडं आणि मेंदू यांच्यातील गुंतागुंतीचा संवाद.

आतडं आणि मेंदूचा संवाद: संशोधकांना गेल्या काही वर्षांत प्रश्न पडू लागला—आतड्यातील सूक्ष्मजीव आणि मेंदूच्या कार्यामध्ये काही संबंध आहे का?

ऑटिझम स्पेक्ट्रमवरील काही मुलांमध्ये बद्धकोष्ठता, अतिसार, पोटफुगी, अन्नाविषयी संवेदनशीलता यांसारख्या gastrointestinal समस्या दिसतात. त्यामुळे gut microbiome आणि autism यांच्यातील संभाव्य संबंधाचा अभ्यास जगभर सुरू आहे.

Resplice Institute स्वतःला भारतातील पहिल्या stool bank च्या उपक्रमाशी जोडते आणि डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांच्या नेतृत्वाखाली ऑटिझमवरील FMT संशोधन करत असल्याचे सांगते. संस्थेच्या माहितीनुसार, त्यांचा FMT clinical trial ICMR-अनुमोदित आहे. ICMRच्या २०२५ च्या संशोधन प्रस्तावांच्या यादीतही ऑटिझममधील FMTचा ट्रायल प्रोजेक्ट नोंदलेला आहे.मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते ती अशी की FMT म्हणजे ऑटिझमवर सिद्ध झालेला उपचार नाही.

काही अभ्यासांमध्ये आणि प्राथमिक निरीक्षणांमध्ये आतड्यातातील होणारी पचन प्रक्रिया आणि तसेच काही 'सर्वसाधारण वर्तणूक' यातील संबंध.दिसल्याचे नमूद झाले आहे. पण तज्ज्ञ अजून मोठ्या, काटेकोर आणि दीर्घकालीन clinical trials ची आवश्यकता आहे असे सांगतात.२०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका placebo-controlled अभ्यासात काही सामाजिक कार्यक्षमतेशी संबंधित फरक आढळले, परंतु या क्षेत्रातील पुरावे अजून विकसित होत आहेत.

मग मुलांचाच विचार का?

लहान, निरोगी मुलांचं gut microbiome तुलनेने विविध आणि सक्रिय असू शकतं. त्यांच्या आहार, औषधोपचार आणि जीवनशैलीचा दीर्घकालीन परिणाम प्रौढांच्या तुलनेत वेगळा असतो. त्यामुळे संशोधनासाठी विशिष्ट निकष पूर्ण करणारे बालदाते उपयुक्त ठरू शकतात.

पण,निरोगी दिसणं आणि असणं यामधील फरक स्पष्ट व्हावा म्हणून दात्यांची वैद्यकीय तपासणी, रक्त आणि स्टूल चाचण्या, संसर्गजन्य जंतूंची तपासणी, औषधांचा इतिहास, आहार आणि शौचाच्या सवयी यांसारख्या अनेक बाबी तपासल्या जातात. कारण एका व्यक्तीकडून दुसऱ्याच्या शरीरात सूक्ष्मजीव पोहोचवण्यामध्ये संभाव्य संसर्ग आणि इतर धोके असू शकतात.

आणि मग येतो २० हजार रुपयांचा प्रश्न…

मुलाच्या स्टूलसाठी महिन्याला ₹२० हजार मिळणार म्हटल्यावर पालकांच्या मनात उत्सुकता निर्माण होणं साहजिक आहे. पण इथे पैसा आणि वैद्यकीय संशोधन यांच्यातील सीमा अत्यंत महत्त्वाची आहे.

मानधन हे कुटुंबाचा वेळ, वारंवार होणाऱ्या तपासण्या, आहाराचे नियम आणि नमुने देण्याची जबाबदारी यासाठी असू शकते. मात्र पैशासाठी मुलाच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, ही मूलभूत नैतिक अट असली पाहिजे.

पालकांची संमती, मुलाची सुरक्षितता, गोपनीयता, स्वतंत्र नैतिक समितीची देखरेख, संभाव्य धोके स्पष्टपणे सांगणे आणि कोणत्याही टप्प्यावर सहभाग सोडण्याची मुभा—या गोष्टी अशा संशोधनात अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

कारण शेवटी ही कथा विष्ठेची नाही; मानवी शरीरातल्या अदृश्य जगाची आहे.

उद्या कदाचित डॉक्टर एखाद्या आजाराकडे केवळ हृदय, फुफ्फुस किंवा मेंदूचा आजार म्हणून पाहणार नाहीत. ते रुग्णाच्या शरीरात राहणाऱ्या असंख्य सूक्ष्मजीवांकडेही पाहतील.आज घरात अगदी सहज घडणाऱ्या एका छोट्याशा प्रक्रियेकडे विज्ञान वेगळ्या नजरेने पाहत असेल.

म्हणूनच एका निरोगी मुलाच्या शरीरातून बाहेर पडलेली गोष्ट… दुसऱ्या एखाद्या मुलाच्या शरीरात आरोग्याचं नवं संतुलन निर्माण करण्याची गुरुकिल्ली ठरू शकते का?या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज प्रयोगशाळा कामाला लागली आहे.

( मुलांमध्ये असणारा ऑटिझम या विकाराची लक्षणे आम्ही कमेंतमध्ये देत आहोत)

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६