काल एक ओळखीचे कवी भेटले. त्यांच्या डोळ्यात पावसाचे ढग जमा झालेले बघून मलाच दया आली आणि मी म्हटलं 'काय हो, वैशाखात श्रावणधारा ? असं म्हटल्यावर त्यांच्या धरणाचा बांधच फुटला आणि ते म्हणाले 'अहो कालच एक मित्र भेटला आणि म्हणाला,आता तुमचे दिवस संपले.दर पावसाळ्यात तुम्ही साधारण १८० पावसाळी शब्द जमा करता आणि आमच्या डोक्यावर चार कविता थापता. आता हेच तुमचे १८० पावसाळी शब्द आमची चॅट जीपीटी वापरेल आणि १६ कविता डिलिव्हर करेल.
मी तेव्हा फार काही बोलू शकलो नाही पण कदाचित येत्या काळात माणसाचं मन असं वाचता आलं तर ?
हा प्रश्न अर्थातच मलाच नाही जगातल्या लाखो लोकांना पडला असेल.
तेच ढग येतात तोच पाऊस पडतो किंवा पडत नाही तरीही दरवर्षी पावसाच्या नव्या कविता येतात कशा ?
त्यातल्या त्यात सहज सोपं उत्तर म्हटलं तर असं आहे की मानवी मनाच्या भावना आकड्यात मोजता येत नाहीत. संख्येच्या ओळीत मांडता येत नाहीत.शेकडेवारीत सांगता येत नाहीत.अमुक एका संख्याप्रणालीचे उत्तर म्हणूनही व्यक्त करता येत नाहीत. आता बघा एक सोपा सिक्वेन्स घेऊ या. तरुण+मुलगा+मुलगी+आकर्षण+विरोध+विरह+धडपड+मिलन +मृत्यू अशी ओळ मांडली तर :
एक दुजे के लिए (१९८१) पासून कयामत से कयामत तक (१९८८) आणि २०१६ चा 'सैराट'पर्यंत सगळं काही एकच आहे.
मग हे सगळेच चित्रपट सुपर हिट का झाले ? कारण एकच आहे भावनांचा खेळ आकड्यात शाबित करता येत नाही.
आणि हेच न सुटणारं गणित जमेल तसं सोडवत आपण काहीतरी विकायचा प्रयत्न करत असतो.आपल्याला इतकंच आतापर्यंत कळलं आहे काही सामाजिक भावनांचा आलेख आपण सहज मांडू शकतो असा आपला समज आहे.
बस्स ! 'माल बेचनेके लिए इतना काफी है'
पुन्हा एक उदाहरण घेऊ या !
१ जन्म +भूक+आई+स्त्री + ममता इतकं एकत्र केलं की बेबी फूड विकता येतं.
२भूक+आई + पत्नी +स्त्री+ प्रेम+स्वाद अशी ठिपक्यांची रांगोळी जोडली की कोणताही 'आटा' विकता येतो .
३ भूक+ तारुण्य+स्वाद+स्वातंत्र्य हे एकत्र केले की बर्गर विकता येतो.
विचार केला तर हे फारच बटबटीत वाटतं पण असं करून 'ब्रँड' विकता येतो का ?
किंवा आपल्या मानवी भावना इतक्या सहज साचेबध्द करता येतात का ?
उत्तर अर्थातच नाही असेच आहे. प्रत्येक जिवंत पेशीत तयार होणार्या भावनांना इतके थर असतात की त्याची मोजणी शक्यच नसते.
म्हणूनच ब्रँड काही मनात शिल्लक राहतात -काही मनात नाहीसे होतात- काही मनात विरतात !







