कावळा म्हटला की 'पिंडाला कावळा शिवला का ?' हा एकच प्रश्न बऱ्याचवेळा मनात उभा राहतो.त्या समजाचे मूळ कावळ्यांच्या मेंदूचा वेगवान दिशादर्शक निर्णयक्षमतेशी आहे.योग्य ती दिशा ओळखून त्यानुसार निर्णय घेण्यासाठी कावळ्यांना अवघ्या २३५ मिलिसेकंदांचा,म्हणजेच सेकंदाच्या जवळपास पाव भागाचा वेळ लागतो.
आपल्या पूर्वजांना कावळ्याच्या या क्षमतेची कल्पना होती.
पण मग याचा संबंध पिंडाला कावळा शिवण्यासोबत कसा जोडला गेला ?
आपल्या पारंपारिक समजानुसार मृत व्यक्तिचा आत्मा काही दिवस दिशेचे ज्ञान नसल्यामुळे इथेच घुटमळत राहतो. कावळ्याला त्याचा मोबदला म्हणजे अन्न (भाताचा पिंड) दिल्यावर तो मृताच्या आत्म्याला योग्य दिशेने घेऊन जातो. आजच्या भाषेत कावळा 'नेव्हिगेटरचे ' काम करतो.
पाश्चिमात्य इतिहास बघितला तर युरोपातील स्कँडिनेव्हियाचे (आजचे डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन) समुद्रमार्गे प्रवास करणारे व्हायकिंग्ज (Vikings) दिशाभूल होऊ नये किंवा झाल्यास योग्य तो मार्ग मिळावा म्हणून कावळ्याचा वापर करायचे. व्हायकिंग्जचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी लुटारू असा आहे पण ते केवळ लुटारू नव्हते, तर कुशल खलाशी, व्यापारी, संशोधक आणि वसाहती स्थापन करणारे साहसी दर्यावर्दीही होते.
आधुनिक होकायंत्र किंवा जीपीएस उपलब्ध नसलेल्या त्या काळात व्हायकिंग्ज आपल्या लांब पल्ल्याच्या समुद्रप्रवासात जहाजांवर पिंजऱ्यात कावळे आणि रेव्हन(डोमकावळा) घेऊन जात असत. समुद्रात दिशा चुकल्यास किंवा खराब हवामानामुळे जमीन दिसेनाशी झाल्यास खलाशी पिंजऱ्यातील पक्ष्याला मोकळे सोडत. हे पक्षी जवळच्या जमिनीच्या दिशेने उडतात, या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा उपयोग करून खलाशी त्यांच्या उड्डाणाच्या दिशेने जहाजाचा मार्ग ठरवत असत.
जहाजाच्या डोलकाठीच्या सर्वांत वरच्या भागात या पक्ष्यांना ठेवण्यासाठी पिंजरा असे. या जागेला 'क्रोज नेस्ट' (Crow's Nest) असे नाव पडले.आजही जहाजावरील उंच निरीक्षणस्थळासाठी हा शब्द वापरला जातो.







