मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हिऱ्यांना पैलू पाडणारा लेझर, एक दिवस हृदयापर्यंत पोहोचला!

4 मिनिट वाचन

सुरतमध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी वापरले जाणारे लेझर कटिंग तंत्रज्ञान हृदयविकारावरील स्टेंट बनवण्यासाठी कसे वापरले गेले, याची रंजक कहाणी.

शेअर करा:
हिऱ्यांना पैलू पाडणारा लेझर, एक दिवस हृदयापर्यंत पोहोचला!

युरोपातल्या ॲंटवर्पमधून कच्चे हिरे भारतात सुरतला येतात.इथे त्यांना पैलू पाडले की 'हिरा' तयार होतो.पैलू पाडणं ही एक कला आहे.सर्वसामान्यांच्या भाषेत या तंत्राला 'घिसाई' (म्हणजे घासणं) म्हणतात.या तंत्रावर हुकुमत आहे सुरत शहराची.आंतरराष्ट्रीय बाजारात या पैलू पाडण्याच्या व्यवसायात सुरतची 'मोनोपली' आहे असंही म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट अगदी स्पष्ट असते—अचूकतेला पर्याय नसतो.

हिऱ्याला आकार देताना चूक काही मायक्रॉनची असली, तरी त्याची किंमत बदलू शकते.पण मायक्रॉन म्हणजे किती? मायक्रॉन म्हणजे किती? एक मायक्रॉन म्हणजे ०.००१ मिलिमीटर. अगदी सहज समजून घ्यायचे तर डोक्यावरचा एक केस म्हणजे साधारण ५० ते १०० मायक्रॉन !! थोडक्यात, हिऱ्याच्या कटिंगमध्ये काही मायक्रॉनची चूकसुद्धा महत्त्वाची ठरू शकते.

इतक्या सूक्ष्म पातळीवर अचूकता साधण्याची कला पुढे हृदयातील स्टेंट बनवताना उपयोगी पडेल हे एकेकाळी कोणाला स्वप्नातही कळले नव्हते.

१९९०च्या दशकाच्या सुरुवातीला धीरजलाल कोटाडिया यांनी सुरतच्या डायमंड उद्योगासाठी स्वयंचलित लेझर-कटिंग मशीन तयार करण्यास सुरुवात केली.त्यांचे काम होते—हिऱ्याला अधिक अचूकपणे कापणे.

पण त्याच लेझरमध्ये एक दिवस त्यांना दुसरी शक्यता दिसली.या तंत्राचा वापर हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान म्हणजे हृदयविकारात वापरल्या जाणाऱ्या 'स्टेंट'साठी करता येईल.

त्या काळात भारतात हृदयविकारावरील उपचार महाग होते.हृदयाला रक्त पुरवणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिनीला कोरोनरी आर्टरी म्हणतात. या रक्तवाहिनीत अडथळा म्हणजे ' ब्लॉकेज' आलं की हार्ट अटॅक येतो. उपाय एकच असतो तो म्हणजे या रक्तवाहिनीत 'स्टेंट' घाऊन रक्रप्रवाहाचा मार्ग मोकळा करणे.त्याकाळी कोरोनरी स्टेंटसाठी देशाला मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत होते.

स्टेंट म्हणजे काय? एका अतिशय बारीक धातूच्या नळीवर केलेले सूक्ष्म,जाळीसारखे कट्स. कोटाडिया यांनी मात्र समस्या वेगळ्या नजरेने पाहिली.त्यांच्या लक्षात आलं की हे तर त्यांच्या कंपनीला आधीपासून येत होते—मायक्रॉनच्या अचूकतेने लेझरने कटिंग करणे.

फरक एवढाच होता की आतापर्यंत लेझर हिऱ्यांसाठी काम करत होता.आतातेच लेझर मानवी शरीरासाठी काम करणार होते

कल्पना ऐकायला सोपी होती. प्रत्यक्षात मात्र ती अत्यंत कठीण होती. स्टेंटचा प्रत्येक कट, त्याची मजबुती, लवचिकता, शरीरातील सुरक्षितता—सगळे काही अचूक असणे गरजेचे होते.त्यामुळे काही दिवसांत किंवा काही महिन्यांत हा बदल झाला नाही.वर्षानुवर्षे संशोधन झाले. प्रयोग झाले. अपयश आले. पुन्हा प्रयत्न झाले.एका छोट्या टीमने डायमंड-कटिंगमधून मिळालेल्या ज्ञानाला वैद्यकीय अभियांत्रिकीशी जोडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.आणि २००० मध्ये मूळ कंपनीने वैद्यकीय उपकरणांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. पुढे याच प्रयत्नातून Sahajanand Medical Technologies उभी राहिली.कोटाडियांच्या कंपनीत हळूहळू भारतात स्वदेशी स्टेंट तयार होऊ लागले.

याचा अर्थ फक्त एक नवे उत्पादन तयार झाले असा नव्हता.हृदयावरील उपचार अधिक परवडणारे करण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल टाकले होते.या भारतीय स्टेंटची किंमत परदेशी स्टेंटच्या फक्त २०% आहे.

एकेकाळी सुरतच्या हिऱ्यांना अचूक आकार देण्यासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांना आधार देत होते.

विचार करा...ज्या हातांनी हिऱ्यांची किंमत वाढवण्यासाठी अचूकता शिकली, त्याच अचूकतेने पुढे एखाद्या माणसाचे आयुष्य वाचवण्यास मदत केली.हीच या कथेची खरी प्रेरणा आहे.आपल्याकडे असलेले कौशल्य नेहमी त्याच कामासाठी वापरले गेले पाहिजे, असे नाही.कधी कधी एका समस्येवर उत्तर शोधताना विकसित केलेले तंत्रज्ञान दुसऱ्याच क्षेत्रात क्रांती घडवू शकते.

कोटाडिया यांनी लेझर बदलला नाही.त्यांनी लेझरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.आणि म्हणूनच ही कथा हिऱ्यांची नाही. ही कथा आहे दृष्टीची.सुरतच्या हिऱ्यांपासून सुरू झालेला तो लेझरचा प्रवास अखेर माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचला तो असा !

हिऱ्याला चमक देणारी अचूकता, एक दिवस जीवनाला आशा देऊ लागली.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६