मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

काय आहेत 'रेअर अर्थ मेटल्स' आणि जगाला त्यांची गरज का आहे?

4 मिनिट वाचन

आधुनिक गॅजेट्स आणि चिप्ससाठी आवश्यक असलेल्या रेअर अर्थ मेटल्सचे महत्त्व आणि जागतिक राजकारणातील त्यांची भूमिका यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

शेअर करा:
काय आहेत 'रेअर अर्थ मेटल्स' आणि जगाला त्यांची गरज का आहे?

तांबं,सोनं,चांदी,ॲल्युमिनियम हे धातू आपल्या ओळखीचे आहेत पण नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर ' रेअर अर्थ मेटल' हा विषय चर्चेला आला आहे.काय आहेत हे धातू ? या धातूंची सगळेच देश का चर्चा करत आहेत ? या धातूंच्या सोन्यासारख्या विटा मिळत असतील तर भाव भडकण्यापूर्वीच गुंतवणूक करायची का ? फारच महाग असतीअल तर काही तोळे घेऊन काही दागिने वगैरे करायचे का ?आपल्या देशात या खाणी असतील तर त्या कंपनीचे शेअर घ्यावे का ? असे अनेक प्रश्न मनात आलेच असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवू या !

पिरिऑडिक टेबलमधल्या १७ घटकांना रेअर अर्थ मेटल्स म्हटलं जातं. हे म्हणजे —
स्कँडियम, इट्रियम, लॅन्थेनम, सीरियम, प्रेसीओडिमियम, निओडिमियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, एर्बियम, थूलियम, येटरबियम आणि लुटेटियम. या सर्वांचा वापर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणातील छोट्या सर्किट्समध्ये होतो.

भारताकडे या अर्थ एलिमेंट्सचा जगातला चौथा सर्वात मोठा साठा आहे तरीही आपण देशांतर्गत उत्पादन वाढवण्याऐवजी आयातीलाच प्राधान्य देतो — आणि यामागे खास कारण आहे.
भारतात या रेअर अर्थ एलिमेंट्सना “अणु खनिज” (Atomic Minerals) असा दर्जा दिला आहे.कारण हे खनिज पृथ्वीच्या त्या स्तरांमध्ये आढळतात, जिथे थोरियम आणि युरेनियम सुद्धा सापडतात. थोरियम आणि युरेनियम हे रेडिओॲक्टिव्ह खनिज आहेत — म्हणजे त्यांचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यात केला जाऊ शकतो.याच कारणामुळे भारतात या खनिजांच्या खाणकामाचा अधिकार फक्त दोन सरकारी कंपन्यांकडे आहे —
इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL) आणि केरल मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेड (KMML).
आता विचार करा — फक्त दोन कंपन्या संपूर्ण देशाचा पुरवठा कितपत करू शकतील?
उत्पादन क्षमता मर्यादित आहे, आणि तांत्रिक संसाधनेही कमी आहेत.
म्हणूनच भारत या दुर्मीळ घटकांच्या पुरवठ्यासाठी आजही मोठ्या प्रमाणावर आयातीनं अवलंबून आहे.

रेअर अर्थ मेटलच्या उत्पादनाबाबत भारतातही अचानक चर्चा सुरू झाली आहे. कारण या घटकांचा वापर अनेक अत्यावश्यक वस्तूंमध्ये आणि तंत्रज्ञानात होतो. उदाहरणार्थ — सेल्युलर फोन, कॉम्प्युटर हार्ड ड्राइव्हस्, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनं, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स आणि टीव्ही — या सगळ्यात हे घटक महत्त्वाचे आहेत.संरक्षण क्षेत्रातदेखील त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो — इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, गाइडन्स सिस्टिम्स, लेझर्स, रडार आणि सोनार सिस्टिम्स यांमध्ये हे अत्यावश्यक असतात.

वजनाच्या दृष्टीने पाहता हे घटक अतिशय सूक्ष्म प्रमाणात वापरले जातात पण त्याशिवाय वर लिहिलेली उत्पादनं काम करूच शकत नाहीत.
जशी-जशी तंत्रज्ञान प्रगत होत आहे, तशी या घटकांची मागणी आणखी वाढणार आहे.
जपानमध्ये तर या घटकांना “सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी” — म्हणजेच तंत्रज्ञानाची बीजे — असंही म्हटलं जातं.हे घटक पृथ्वीमधून काढण्यापासून ते त्यांच्या पुरवठ्यापर्यंतच्या स्पर्धेत अमेरिका आणि चीन दोघेही पूर्ण ताकदीने उतरले आहेत.

अमेरिकेचं ऊर्जा विभाग (Department of Energy) या घटकांना “टेक्नॉलॉजी मेटल्स” असं नाव देतं.
संरक्षण क्षेत्रातील गरजा पाहता, अमेरिका स्वतःकडे नव्या रेअर अर्थ एक्स्ट्रॅक्शन युनिट्सना परवानगी देत आहे. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशांनी या घटकांचं उत्पादन वाढावावं हे चीनला अजिबात नको आहे की— कारण त्यामुळे त्याचं वर्चस्व कमी होईल.

अमेरिकेने काही कंपन्यांना या घटकांचे उत्खनन करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट्स सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर
काहीच दिवसात ट्विटर आणि फेसबुकवर काही बनावट खाते सक्रिय झाली — जी या प्रोसेसिंग युनिट्सविरुद्ध लोकांना भडकवण्याचं काम करू लागली.एका सायबर सिक्युरिटी कंपनीला यात काही संशयास्पद गोष्ट जाणवली.तपास केला तेव्हा समजलं की या बनावट खात्यांचे संबंध चीनशी आहेत.हीच ती खाती होती जी याआधी चिनी सरकारच्या विरोधकांवर टीका करणारी होती.
जरी या अकाउंट्सच्या प्रचाराचा अमेरिकन नागरिकांवर फारसा परिणाम झाला नाही,तरीही ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही —
कारण ती दाखवते की या रेअर अर्थ एलिमेंट्सवरील वर्चस्व टिकवण्यासाठी चीन किती आक्रमक आणि धोरणी आहे.
आपलं प्रभुत्व कायम राखण्यासाठी चीन कोणत्याही टोकाला जाऊ शकतो,हे यावरून स्पष्ट दिसतं.

(रेअर अर्थ मेटल्स- हा लेखाचा विषय वाचकांना आवडला तर या विषयाची आणखी खोलवर माहिती देणारे लेख बोभाटा नक्कीच प्रकाशित करेल).

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६