एव्हरेस्टच्या शिखरावर रचलं गेलेलं 'पांढरं' कारस्थान: असा झाला १६५ कोटींचा विमा घोटाळा
१६५ कोटी रुपये!! हिमालयाच्या कुशीत, जिथे माणूस स्वतःला शोधायला आणि निसर्गाशी नातं जोडायला जातो, तिथे एवढ्या अवाढव्य रकमेचा 'खेळ' खेळला गेला. हा आकडा ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील, पण यामागचं सत्य त्याहूनही भयानक आहे.एव्हरेस्ट चढणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. या स्वप्नासाठी लोक आयुष्यभराची पुंजी खर्च करतात. पण नेपाळमध्ये याच स्वप्नाचा बाजार मांडला गेला. एका बाजूला बर्फाची पांढरी शुभ्र शिखरे आणि दुसऱ्या बाजूला 'बेकिंग सोडा' वापरून रचलेलं काळं कारस्थान, अशी ही धक्कादायक गोष्ट आहे.
हा सगळा प्रकार नेमका कसा घडायचा? जेव्हा एखादा पर्यटक ट्रेकिंगसाठी नेपाळमध्ये येतो, तेव्हा तो तिथल्या शेर्पांवर आणि ट्रेकिंग एजन्सीवर आंधळा विश्वास ठेवतो. पण याच विश्वासाला तडा गेला. काही एजन्सीजनी चक्क पर्यटकांच्या जेवणात किंवा पाण्यात गुपचूप 'बेकिंग सोडा' मिसळायला सुरुवात केली.बेकिंग सोडा शरीरात गेल्यावर पर्यटकांना मळमळणे, उलट्या होणे आणि पोटात प्रचंड दुखणे असे त्रास सुरू व्हायचे. उंचावर असल्यामुळे पर्यटकाला वाटायचं की आपल्याला 'अॅल्टिट्यूड सिकनेस' (उंचीचा त्रास)Altitude Sickness झाला आहे. बिचारा पर्यटक घाबरून मदतीसाठी ओरडायचा.इथूनच खऱ्या घोटाळ्याला सुरुवात व्हायची. तो पर्यटक आजारी पडताच, आधीच सेट ठरलेले हेलिकॉप्टर पायलट तिथे पोहोचायचे. त्याला तातडीने काठमांडूच्या एका खास रुग्णालयात नेलं जायचं. तिथे डॉक्टरही या टोळीत सामील असायचे. साध्या उपचारांचे अव्वाच्या सव्वा बिल बनवले जायचे.
विमा कंपन्यांकडून पैसे उकळण्यासाठी हे सगळं नाटक रचलं जायचं. एका हेलिकॉप्टरच्या फेरीचे आणि हॉस्पिटलच्या बिलाचे मिळून लाखो रुपये विमा कंपनीकडून वसूल केले जायचे. ही रक्कम मग ट्रेकिंग एजन्सी, पायलट आणि हॉस्पिटल यांच्यात वाटली जायची.अजून पुढे ऐका, हा काही छोटा-मोठा प्रकार नव्हता. नेपाळ पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, तब्बल ३२ जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काठमांडू जिल्हा न्यायालयात हे प्रकरण पोहोचलं असून यात मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या मालकांचाही समावेश आहे.मार्च २०२६ च्या सुरुवातीला यातील ९ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं, तर २३ जण अजूनही फरार आहेत. 'ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट'ने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ज्या शेर्पांना आपण हिमालयाचे रक्षक मानतो, त्यांच्यातील काही काळ्या मेंढ्यांमुळे संपूर्ण नेपाळच्या पर्यटनावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही साहसी सहलीला जाल, तेव्हा तुमचं जेवण आणि पाणी यावर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे, हे या घटनेवरून सिद्ध होतं. पण प्रश्न उरतोच, जिथे निसर्ग इतका भव्य आहे, तिथे माणसाचं मन इतकं कोतं कसं होऊ शकतं?तुम्ही कधी अशा प्रकारच्या फसवणुकीबद्दल ऐकलं आहे का, जिथे विश्वासाचाच घात झाला असेल?







