मेरा भारत महान : पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक परिचित गृहस्थ सपत्नीक भारतात आले होते.वय बहात्तर वर्षे ! गेली चाळीस वर्षे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात वास्तव्य असलेले हे गृहस्थ तेथील एका प्रसिद्ध हॉटेल चेन मध्ये चांगल्या पदावर अजूनही कार्यरत आहेत. त्यांची सुविद्य पत्नी सुद्धा एका फार्मसी कंपनीत काम करते. साधारण दर दोन-तीन वर्षांनी त्यांची भारतभेट असतेच असते. यावेळी भारतात आल्यावर लगेचच त्यांनी यूपीआय डाऊनलोड करून घेतले आणि त्यांच्या येथील एका बँक अकाउंटला लिंक केले. यूपीआय प्रणाली त्यांना इतकी आवडली की काही विचारू नका. अशी प्रणाली अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा नाही हे त्यांनी मला आवर्जून सांगितले. " कोणतेही पेमेंट करताना आमच्या यांना पाकिटात तेवढे पैसे असताना सुद्धा यूपीआयने देण्याची अगदी घाई असते ... " त्यांच्या मिसेस हसत हसत मला सांगत होत्या. त्यावर ते गृहस्थ हसून मला म्हणाले, " यानंतर मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे तो खरा मजेशीर आहे ... "
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पहात ते पुढे म्हणाले, " मुंबईत लॅण्ड झाल्यावर पुण्यात येण्यासाठी आम्ही उबर बुक केली होती. त्या उबरचा ड्रायव्हर एक मध्यमवयीन राजस्थानी इसम होता. 'हर्षवर्धन राठोड' या नावाचा हा ड्रायव्हर चांगलाच बोलका होता. पुण्यात येताना रात्र होती तरीही आम्ही टक्क जागेच होतो. येताना या राठोडने आमच्याशी खूप गप्पा मारल्या. त्याने त्याच्या गावाविषयी, तेथील लोकांविषयी खूप काही माहिती दिली. आम्हाला राजस्थानला भेट देण्याचे निमंत्रणही दिले. " सर तुम्हाला कुठे जायचे असेल तर मला माझ्या नंबर वर फोन करा. उबर पेक्षा मला जास्त पैसे मिळतील आणि तुम्हालाही स्वस्त पडेल ..." त्याने त्याचा मोबाईल नंबर देत आम्हाला सांगितले.
त्यानंतर दोन दिवसांनी आम्हाला नाशिक जवळील आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला जायचे होते म्हणून त्याला फोन केला. गडी लगेच हजर झाला. आमची ही ट्रीप सुद्धा छान झाली. कुलदैवताचे यथासांग दर्शन झाल्यावर राठोडने आम्हाला दुपारच्या जेवणासाठी चांगले हॉटेलही दाखविले. पहाटे लवकर निघून आम्ही रात्री उशिरा पुण्यात पोहोचलो. प्रवासात राठोडशी खूप गप्पा झाल्या. यादरम्यान त्याने सांगितले की लवकरच तो हा उबरचा धंदा बंद करून कायमचा राजस्थानात जाणार आहे. रोजगाराच्या खूप चांगल्या संधी आता तेथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या गावची सरपंचाची निवडणूक तो लढवणार होता तसेच त्याच्या मुलीचे गावातल्याच मुलाबरोबर ठरलेले लग्नही लवकरच उरकण्याचाही त्याचा विचार होता. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन दिवसभरच्या प्रवासाने दमलेले आम्ही पुण्यातील घरी परतलो. राठोडचे टॅक्सी भाडे ४८०० झाले होते. मी ते लगेच यूपीआय ने त्याच्या अकाउंटला पाठवले आणि त्याचा निरोप घेऊन आम्हीं घरात शिरलो. थोडेफार खाऊन आम्ही झोपी गेलो. साधारण तासाभराने फोन वाजला म्हणून मी झोपेतच तो उचलला. फोनवर राठोड होता. " सर तुम्ही मला चुकून जास्त पेमेंट पाठवले आहे. मी तुम्हाला जास्तीचे पैसे लगेच परत पाठवतो." तो म्हणाला. "अरे राठोड ... जास्तीचे पैसे तुझ्या मुलीला आमच्याकडून लग्नाची भेट आहे असे समज ... परत पैसे पाठवू नकोस. " मी त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन झोपेतच म्हणालो.
" सर एवढी भेट तर माझा सख्खा भाऊ सुद्धा माझ्या मुलीला देणार नाही. तुमच्या चांगुलपणाबद्दल धन्यवाद ! मी पैसे परत करतो." एवढे बोलून त्याने फोन ठेवला. मीही फोन बाजूला ठेवून झोपेच्या आधीन झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायकोने चहा पिताना विचारले," रात्री उशिरा फोन कोणाचा होता हो ?"
" अग तो राठोड टॅक्सी ड्रायव्हर होता ... मी चुकून त्याला जास्तीचे पेमेंट केले होते ते परत करण्यासाठी त्याने फोन केला होता. तुझ्या मुलीच्या लग्नातील आहेर आहे असं समज म्हटलं तरी ऐकेना ..." हसत मी म्हणालो.
" किती जास्त पैसे दिले होते तुम्ही ?" बायकोने विचारले. मी फोन उघडून चेक केले आणि उडालोच ... राठोड ने मला त्रेचाळीस हजार दोनशे रुपये परत पाठवले होते.
बापरे !! म्हणजे मी ४८०० च्या ऐवजी चुकून त्याला ४८००० पाठवले होते.क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला .. मी राहिलेले पैसे तुझ्या मुलीला भेट म्हणून ठेव असे सांगत असून सुद्धा हर्षवर्धन राठोडने जास्तीचे सर्व पैसे परत पाठवले होते ...
ना ओळख ना पाळख !! मी आलेलो अमेरिकेतून ... जेमतेम पंधरा-वीस दिवसांचा भारतात मुक्काम ... ....कुठे शोधणार होतो मी त्याला ?
तो आरामात पैसे हडप करू शकत होता ...
कदाचित त्याला जास्तीचे पेमेंट झाले आहे ही गोष्ट लगेच माझ्या लक्षातही आली नसती पण त्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले. गेल्या चाळीस वर्षात अमेरिकेत शाळेतील वर्गमित्रांवर बंदुकीच्या गोळ्या चालवणारी छोटी मुले सुद्धा बघितली आहेत आणि येथे कधीतरी येणाऱ्या आमच्यासारख्या देशबंधूंवर अपार प्रेम करणारी आपली अनोळखी माणसे सुद्धा बघितली आहेत आणि म्हणूनच आम्हाला भारतीय आवडतात ..."
ते बोलायचे थांबले काही वेळ शांतता पसरली. पुन्हा खाकरून ते म्हणाले,
" या प्रसंगामुळे माझ्या बायकोचा कायमचे अमेरिकेत राहण्याचा निर्णय मात्र डळमळीत झाला. आता कदाचित आम्ही येत्या काही वर्षात भारतात कायमचे राहायला येऊ ... अमेरिकेला गुडबाय करून ... "
" मेरा भारत महान " या सर्वश्रुत ऊक्तीचे जिवंत उदाहरण आज मी त्यांच्या तोंडून अनुभवले होते.
©️ मिलिंद अष्टपुत्रे
तळटीप :- सत्यप्रसंगावर आधारित






